व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

बेवडा आहे; पण तेवढा नाही!

माझं नाव नितीन. मी एक दारुड्या आहे किंवा I am Nitin. I am alcoholic. शब्द कितीही बदलले, तरीही ते ऐकायला, वाचायला आणि लिहायलाही विचित्र, अवघड वाटतील.
मलाही ते मान्य करायला खूप अवघड होते. एखादी चांगली गोष्ट लगेच मान्य होते. तो हुशार आहे, तो छान पोहतो, तो आज्ञाधारक आहे, वगैरे वगैरे; पण कटू सत्य पचायला जड जाते.
मी माझी खरी गोष्ट सांगणार आहे. मी सदाशिव पेठेत राहायला होतो. घरचे वातावरण पुढारलेले होते. कडक नियम, बंधने, सोवळे-ओवळे नव्हते. माझे लहानपण लाडात गेले. आई-वडिलांनी कुठलीही झळ पोहोचू दिली नाही. धाकटा असल्याने खूप लाडका होतो. सर्व वस्तू दोघांना (भावांना) एकदमच घ्यायचे. माझा स्वभाव हट्टी आणि धूर्त. कोणाकडे, कधी आणि कसा हट्ट करायचा हे अचूक हेरत असे.
घर-शाळा-घर असे दिवस जात होते. चांगला खेळाडूही होतो. माझ्या घरी पत्त्यांचा सोशल क्‍लब होता. पत्ते, नॉनव्हेज, सिगारेट, मद्य निषिद्ध नव्हते. पाचवीत असताना पहिल्यांदा बिअरची चव चाखली. सहावीत सिगारेट ओढली. वाईट सवयी, गोष्टींचे मला आकर्षण होते. सिगारेटचे घरी कळल्यावर शिक्षा झाली. त्यानंतर चोरून ओढू लागलो.
जसा एका दिवसात लहानाचा मोठा झालो नाही, तसा एकदम मद्यपीही झालो नाही. माझे व्यसन हळूहळू; पण निश्‍चितपणे वाढत होते. मला वाटे माझा "कोटा' (स्टॅमिना) जास्त आहे.
घरात चोऱ्या सुरू झाल्या. वाईट सवयींचा अतिरेक होता. चांगल्या गोष्टींमध्ये सातत्य नव्हते. वृत्ती धरसोडीची. कष्टांचा अभाव, खोटेपणा, चालढकल, सत्यापासून दूर पळायची वृत्ती, सहजतेने सगळे काही मिळावे ही इच्छा. दिवस जात होते. माझ्या प्रत्येक इच्छेला घरचे प्रतिसाद देत होते. इच्छा जॉकी होण्याची, केटरर होण्याची, व्हेटर्नरी डॉक्‍टर होण्याची, इलेक्‍ट्रिशियन होण्याची, हॉटेल काढण्याची, बिल्डर होण्याची आणि पोल्ट्री काढण्याचीही!
आई-वडिलांनी कष्टाने मिळविलेला वाडा विकून माझ्या हातात बरेच पैसे आले. त्यावेळी जिच्यासोबत फिरत होतो, त्या मुलीशी लग्नही झाले.
पैसे आल्यावर अनेक व्यवसाय केले. ते सारे बुडाले. बायको हे सगळे सहन करत होती. व्यसने वाढतच होती. कर्जे काढत होतो. चांगले मित्र, नातेवाईक दुरावले. माझी बायको हे सारे कुठे बोलू शकत नव्हती. तिची आतल्याआत ओढाताण होत होती. माझे वाढते व्यसन पाहून तिची काळजी वाढत होती. काय उपाय करावेत, हे कळत नव्हते. ती गांगरून गेली. त्याविषयी आमच्यात चार भिंतीत चर्चा व्हायची. कधी चिडून, कधी अबोला धरून, कधी रुसून तर कधी प्रेमाने; पण सारे व्यर्थ होते.
या सर्वांचा अतिरेक झाला. शेवटी अर्थार्जनाचे कोणतेही साधन नसताना आणि पदरी लहान मुलगी असतानाही तिने मन घट्ट करून मला घराबाहेर काढण्याचा कठोर निर्णय घेतला आणि अमलातही आणला.
तो दिवस होता 21 मार्च 2004. हा माझा पुनर्जन्म होता, असं मला आज निश्‍चितपणे वाटतं. माझा मित्र AA , "अल्कोहोलिक ऍनानिमस'चा सभासद आहे, हे माझ्याकडून कधीतरी बायकोला समजलं होतं. तिनं त्याच्याशी संपर्क साधला. त्यानं मला AAचा संदेश दिला.
मी AAच्या सभेला हजर राहिलो. तिथं माझं प्रेमानं, आपुलकीनं स्वागत झालं. त्यांनी मला इतिहास विचारला नाही. फक्त अतिरिक्त मद्यपान हा प्रॉब्लेम असेल, तर तू योग्य जागी आणि योग्य वेळी आला आहेस, अशी खात्री दिली. आज तुझ्याकडे जे आहे, ते शंभर टक्के जाणार नाही. जे पूर्वी गमावलंस ते परत येईल याची खात्री नाही; पण यापुढचं आयुष्य शांततेत जाईल, अशी त्यांची गॅरंटी होती.
मी पहिल्या दिवसापासूनच तिथं रमलो.
रमला तो मद्यापासून दूर थांबला!
AAमध्ये मला कानमंत्र मिळाला, "फक्त आजचा दिवस.' कारण मी भूतकाळ बदलू शकत नाही, भविष्यकाळ माहीत नाही. माझ्या हातात फक्त आजचा दिवस आहे. तो नीट सांभाळायचा. तिथे मला जिवाभावाचे मित्र मिळाले. सर्वांची वेदना सारखीच होती. एक एक दिवस सभेला जाता जाता आठवडा, महिना, वर्षे उलटली. मद्यापासून दूर झाल्यावर वास्तवता पाहून हादरून गेलो; पण सभेचा आधार, मित्रांचे अनुभव या जोरावर परिस्थितीशी जुळवून घेऊ शकलो. अशीच एक दिवस सिगारेट थांबली.
हळूहळू विश्‍वास परत येऊ लागला. व्यवसायात लक्ष घालू लागलो. कष्टांची तयारी झाली. प्रामाणिकपणा वाढला. मला माझी खरी लायकी, खरी कुवत कळली. मी ती मान्य केली.
माझ्यातले दोष कळू लागले. ते कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू लागलो. घर, व्यवसाय, AA अशा त्रिकोणात वावरतो. निसरड्या जागी (बार, पार्ट्या) जात नाही.
अल्कोहोलिक ऍनानिमसच्या सभांचे, तिथल्या बांधवांचे, त्यांच्या अनुभव कथनांचे, अनेक अनुभवसिद्ध पुस्तकांचे माझ्यावर उपकार आहेत. त्याची मला जाणीव आहे. मला जे काही मोफत, कुठलाही खर्च न करता मिळाले आहे, ते माझ्यासारख्या बांधवांना मिळावे, म्हणून हा छोटा प्रयत्न. यश मिळेल का नाही, हे सांगता येत नाही; पण प्रयत्न सोडू नका, ही शिकवण मनात रुजली आहे.
मी माझ्या बायकोचा, मुलीचा आभारी आहे. तिनं मला घराबाहेर काढलं नसतं आणि AAचा संदेश दिला नसता, तर आज मी तसाच व्यसनी असतो. वेडा झालो असतो किंवा मेलो असतो.

भारतात पन्नाशीत पोचलेली अल्कोहोलिक ऍनानिमस (AA) ही संघटना पुण्यातही जोमानं काम करत आहे. व्यसनमुक्तीचं ध्येय असलेल्या या संस्थेची एक जनजागरण सभा आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संध्याकाळी सहा ते आठ वाजता होणार आहे. एका "नितीन'नं त्याची खरीखुरी गोष्ट सांगितली आहे.
आपल्या आजूबाजूला असे नितीन असतील तर त्यांनाही हा मार्ग दाखवायला हवा...


संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्‍लिक करा.

एखादा बळी गेल्यावरच काम होणार का?



वाढती वाहतूक आणि पादचाऱ्यांची सुरक्षितता, या गोष्टींचा विचार करून विविध ठिकाणी भुयारी मार्ग किंवा फ्लायओव्हर बांधण्यात येतात. आपण मागे याच ब्लॉगवर अशा सुविधांचा कितीसा वापर होतो, याविषयावर चर्चा केली होती. असे असले, तरी ज्या ठिकाणी त्यांचा वापर निश्‍चित होईल, नव्हे या सुविधा आवश्‍यकच आहेत, तेथे मात्र ही कामे रखडलेली दिसतात. उदाहरणच द्यायचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) येथील रस्त्याचे देता येईल. प्रचंड ट्रॅफिकमधून जीव मुठीत घेऊन हा रस्ता क्रॉस करावा लागतो. त्या रस्त्यावर भुयारी मार्ग मंजूर झाला आहे. नुसता मंजूरच नाही, तर तिथले भूमिपूजनही झाले आहे. तरीही रस्ता रखडला तो रखडलाच.
काय करावं अशा वेळी? ही फिल्म पाहिली, की तिथला धोका जाणवतो. तो जसा आपल्याला जाणवतो, तसाच प्रशासनालाही जाणवत असेल. तरीही ही मंडळी गप्प का? एखादा बळी गेल्यावरच हे काम पूर्ण होणार आहे का?

"मृत्यूनंतर तरी नागरिकांना न्याय द्या'

महानगरपालिका ही नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असते. ही सेवा चांगल्या प्रकारे मिळण्यासाठी नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात एकमेळ असला पाहिजे. नगरसेवकांचा प्रशासनावर वचक असायला हवा. काल झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनीच "मृत्यू' दाखला देताना होणारी पिळवणूक सभेसमोर मांडली आणि प्रशासनाला धारेवर धरले. यात उघडकीला आलेली बाब म्हणजे या नागरी सुविधा केंद्राद्वारे आकारले जाणारे शुल्क कंत्राटदाराला मिळते, तरीही सुविधा मिळतच नाही. महिना उलटून गेला तरी दाखले मिळत नाही, या विभागातील संगणक सदैव नादुरुस्त असतात. रेकॉर्ड बुक फाडण्यात आले आहे. पूर्वी मोफत असूनही वेळेवर दाखले मिळत. आता वीस रुपये आकारूनही खूप विलंब लागतो. असे वेगवेगळे आरोप नगरसेवकांनीच केले आहेत.

काय म्हणावे या मंडळींना? कंत्राटदारावर लक्ष ठेवण्याचे काम कोणाचे? कंत्राटदार सेवा देत नसेल तर दोष कोणाचा? या बाबतीत नक्की चुकतेय तरी कोणाचे? नगरसेवकांचे की प्रशासनाचे? "जिवंतपणी आपण चांगल्या सुविधा देऊ शकत नाही,' हे मान्य करणाऱ्या नगरसेवकांचे कौतुक करावे, की....?

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्‍लिक करा.

बांधकाम व्यावसायिकाने उडवल्या झोपा

विमाननगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाने बांधकामाचा पाया खोदण्यासाठी दिवसरात्र स्फोटकांचा वापर सुरू केला असून, या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांची झोप उडाली आहे.
स्फोटकांच्या वापरामुळे परिसरातील इमारतींना धोका होण्याची भीती व्यक्त केली असतानाही, महापालिका कोणतीही ठाम भूमिका घेत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून विमाननगर येथे एका बांधकाम व्यावसायिकाकडून स्फोटकांचा वापर होत असल्याची तक्रार महापालिका व पोलिस आयुक्तालयाकडे नागरिकांनी केली होती. तेवढ्यापुरता खोदकामात स्फोटकांचा वापर थांबविण्यात आला होता; पण मागील दोन दिवसांपासून स्फोटकांचा पुन्हा वापर सुरू केल्याने नागरिकांनी पुन्हा महापालिकेकडे तक्रार केली आहे. स्फोटकांचा वापर खोदकामात होत असल्याने स्फोटानंतर मोठाले दगडही रस्त्यावर पडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

याबाबत महापालिकेचे शहर सहअभियंता लंके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी स्फोटकांचा वापर करू नये व नागरिकांना त्रास होईल, असे काम करू नये असे बांधकाम व्यावसायिकाला कळविले असल्याचे सांगितले. महापालिकेने संबंधितांवर कायदेशीर कारवाई मात्र केलेली नाही; केवळ तोंडी सूचना दिल्याचे त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

ही एक बातमी आहे. "त्यात काय एवढे,' असं म्हणून सोडून द्यायची नक्कीच नाही. प्रशासन आणि बिल्डर एक झाले, तर नागरिकांची झोप उडते, असंच ही बातमी सांगते. अशा परिस्थितीत नागरिकांनी करावं तरी काय?

कृपया.. आमचा वापर करा!

महापालिकेने आम्हाला कचरापेट्या द्याव्यात, रस्ता ओलांडायला पूल, पादचारी मार्गांची गरज आहे, रस्त्यावरच्या दिव्यांचे काय झाले, अशा अनेक मागण्या सतत होत असतात. प्राथमिक सुविधांसाठी सतत टीकाही केली जाते; पण ज्यांना या सुविधा मिळाल्या आहेत, ती मंडळी खरंच त्यांचा वापर करतात का?



शहराच्या विकास आराखड्यात महापालिका सर्वांत प्रथम नागरिकांना मूलभूत सुविधा कशा मिळतील, याचा विचार करीत असते. दर वर्षी यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूदही केली जाते; पण नियोजनानुसार कित्येक वेळा अंमलबजावणी होत नाही. अनेक कामे वर्षानुवर्षे अर्धवट राहिलेली आढळून येतात. वाहनतळ, पादचारी मार्ग, बसथांबे, कचरापेट्या, रस्त्यावरील दिवे, पोलिस चौक्‍यांना सर्वाधिक मागणी असते. त्यानुसार महापालिका टप्प्याटप्प्याने या सुविधा पुरविण्याचे कामही करीत आहे; मात्र ज्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत, ते नागरिक त्यांचा उपभोग घेतात का, हा खरा प्रश्‍न आहे.
पुण्यात अशा अनेक सुविधा आढळून येतात, ज्या खास नागरिकांच्या मागणीमुळे उपलब्ध करण्यात आल्या आहेत आणि त्यांचा वापर केला जात नाही. अलीकडचेच उदाहरण घ्यायचे झाले, तर जिल्हा परिषद आणि शासकीय मध्यवर्ती इमारत यांच्या मधील रस्त्यावरून नागरिकांना रस्ता ओलांडता येणे अवघड असल्याने "पादचारी पूल' बांधण्यात आला होता; पण नागरिक त्याचा वापरच करीत नसल्याने तो पूल काढण्यात आला.
कोथरूड, शिवाजीनगर आणि पाषाण या भागातील अशा काही सेवा "सकाळ'ने शोधल्या आहेत.
नळस्टॉप :
नागरिक आणि सायकलस्वारांसाठी "पादचारी मार्ग' बांधण्यात आले आहेत; पण नागरिक त्यावरून न जाता रस्त्यावरून चालतात. त्यामुळे मोकळी जागा दिसली, की लगेचच त्याचा वापर "पार्किंग'साठी करायची सवय असलेले गाडीस्वार या पादचारी मार्गांचा वापर "वाहनतळा'साठी करीत आहेत.
एसएनडीटी "पादचारी पूल' :
कोथरूड डेपो, स्टॅंड, वारजे माळवाडीकडे जाण्यासाठी एसएनडीटी चौक हा अतिशय रहदारीचा रस्ता आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या गाड्यांमुळे पादचाऱ्यांना रस्ता सहजासहजी रस्ता ओलांडता येत नाही. म्हणून येथे पादचारी पूल उभारण्यात आला; मात्र "शॉर्टकट' बघणारे नागरिक याचा वापर न करता जीव मुठीत धरून हा रस्ता ओलांडताना दिसतात.
भोसले भुयारी मार्ग :
जंगली महाराज रस्त्यावरील भोसले भुयारी मार्गाचीही स्थिती काही वेगळी नाही. पादचारी जमिनी खालून नव्हे, तर रहदारीच्या रस्त्यावरून जात असल्याने भुयारी मार्गाचा वापरच होत नाही. पाऊस, ऊन आणि थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी योग्य जागा आहे म्हणून भिकारी मात्र भुयारी मार्गामध्ये राहायला येतात.
भुजबळ बाग :
नागरिकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे कचरा पेट्या! रोजचा कचरा कोठे टाकायचा? सोसायटी, कॉलनीजवळ कचरापेटी नाही, रस्त्यावर टाकणे योग्य नसते, अशी टीका ते करतात; पण कित्येक नागरिकांना कचरापेट्या उपलब्ध करून दिल्या असल्या, तरी ते वापरत नाहीत. कचरापेटीच्या बाजूला कचरा टाकतात. याशिवाय झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता न ओलांडणे, बसथांब्यावर न थांबता रस्त्यावर उभे राहणे, निर्माल्याच्या पेट्यांचा वापर न करणे अशी अनेक उदाहरणे या भागांत आढळून येत आहेत.

- चैत्राली चांदोरकर

सोसायट्यांची सुरक्षितता : पहिले पाऊल


कर्वेनगर, वारजे, कोथरूड भागातील रहिवासी वाढत्या चोऱ्या, घरफोड्या यामुळे त्रस्त झाले आहेत. सिंहगड रस्त्यावरील "पुलोद्यान परिसर नागरी कृती समिती'ने सुरक्षिततेबाबत घेतलेला पुढाकार कोथरूड भागातील रहिवाशांना प्रेरणादायी ठरू शकतो. वीटभट्टी परिसरातील 18 सोसायट्यांतील सुमारे 650 सदनिकाधारक एकत्र येऊन त्यांनी गस्तयोजना राबविली आहे. त्याबद्दल थोडेसे....
मंगेश कोळपकर


सिंहगड रस्ता परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून घरफोड्या, चोऱ्या यांची संख्या वाढती आहे. त्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. या भागातील रहिवाशांचे दुर्दैव म्हणजे राजाराम पुलापर्यंतची हद्द शहर पोलिसांची येते, तर त्यापुढे जिल्हा पोलिसांची हद्द आहे. त्यामुळे दत्तवाडी व अभिरुची या दोन पोलिस चौक्‍यांवर रहिवाशांची भिस्त आहे. स्वारगेट पोलिस ठाण्यातील मनुष्यबळाची अवस्था थोडीफार चांगली आहे; परंतु अभिरुची पोलिस चौकीत मनुष्यबळाची अक्षरश: वानवा आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी जादा मनुष्यबळ पुरविण्याचे आश्‍वासन महिन्यापूर्वी दिले होते; परंतु या भागात दत्तवाडी पोलिस ठाणे प्रस्तावित असल्यामुळे ते मागे पडले आहे.
वीटभट्टी ते राजाराम पुलापर्यंत सुमारे 25 सोसायट्या असून, तीन झोपडपट्ट्या आहेत. काही सोसायट्यांनी सुरक्षारक्षक नियुक्त केले; परंतु ते पुरेसे ठरले नाहीत. अखेर हा प्रश्‍न तडीस नेण्याचा त्यांनी निर्धार केला.
त्यांनी कृती समिती स्थापन केली. तिच्या माध्यमातून अध्यक्ष नाना काळे, निमंत्रक प्रा. राम डिंबळे, सुरेश थोरात यांनी सरिता एलिगन्स, शुक्रतारा अपार्टमेंट, अवंती, अपूर्वाई, वृंदावन, औदुंबर, अद्वैत, सिल्व्हेनिया वूड्‌स, त्रिमूर्ती, पारिजात, श्रवण, सरिता विहार, प्रज्ञानगड, आदीश्री, श्‍वेतांबरी, नीलांबरी, कादंबरी आदी सोसायट्यांतील रहिवाशांशी संपर्क साधला. सुरक्षिततेचे महत्त्व त्यांना पटवून दिले. प्रत्येक सदनिकाधारकाकडून त्यासाठी दरमहा पन्नास रुपये आकारण्याचा निर्णय झाला. त्यानुसार समितीकडे 18 सोसायट्यांची सुमारे सहा महिन्यांची रक्कम गोळा झाली. सुरक्षारक्षक हे केवळ रखवालदार नकोत, यावर त्यांचे एकमत झाले. त्यांनी सध्या दोन सशस्त्र आणि सुमारे 18 साधे सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत. सशस्त्र सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्यात येणार आहे, असे श्री. डिंबळे यांनी सांगितले. सुरक्षारक्षक सक्षम असावेत, यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष पुरविले आहे.
सुरक्षारक्षकांकडे समितीने प्रत्येक इमारतीमधील तळमजल्यावरील रहिवाशांचे दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. गस्त घालताना सर्व रक्षकांचा समन्वय असेल, याची काळजी घेण्यात आली आहे. आपत्तीच्या वेळी एखाद्या रक्षकाने शिटी वाजवली तरी आसपासचे रक्षक तेथे धावतील, अशी रचना करण्यात आली आहे. वीटभट्टी, तेथील अंतर्गत रस्ते व मुठा नदीचा परिसर, येथे सध्या ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ""शनिवारी मध्यरात्री एका इमारतीच्या आवारात एक मोटार आली. त्यातून चौघे जण उतरले. त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्यामुळे काही नागरिकांनी, सुरक्षारक्षकांनी आरडाओरडा केला. त्यामुळे त्यांना पळून जावे लागले,'' असा अनुभव श्री. डिंबळे यांनी सांगितला.
पोलिसांनी सुरक्षारक्षकांना सूचना दिल्या असून, आपत्तीच्या वेळी संपर्क साधण्यासाठी अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांकही दिले आहेत. कृती समिती केवळ सुरक्षिततेच्या प्रश्‍नावर काम करीत नाही, तर सिंहगड रस्ता आता सिमेंटचा झाला आहे. त्यामुळे त्यावरून वाहने भरधाव जातात व त्यामुळेच अनेकदा या रस्त्यावर अपघात होतात. म्हणून तेथे गतिरोधक असावेत, वाहतूक नियंत्रक दिवे उभारावेत, यासाठीही समितीचे प्रयत्न सुरू आहेत.
कृती समितीच्या कामकाजाबद्दल काही माहिती हवी असल्यास इच्छुकांना प्रा. राम डिंबळे यांच्याशी 9372481503 या क्रमांकावर संपर्क साधावा.
.....................................................................................
कर्वेनगर परिसरात गेल्या सोमवारी मध्यरात्री 12 सदनिका चोरट्यांनी फोडल्या. एकाच वेळी अनेक सदनिकांमध्ये चोरी होण्याची या परिसरातील ही सलग तिसरी घटना. वारजे, कोथरूड भागातील काही सोसायट्यांतील रहिवाशांनी पुढाकार घेऊन सुरक्षारक्षकांच्या मदतीने गस्त योजना सुरू केली आहे; परंतु पुरेसे संघटित प्रयत्न नसल्यामुळे त्या फारशा यशस्वी झालेल्या नाहीत. या पार्श्‍वभूमीवर कोथरूड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गौतम देशमुख म्हणाले, ""पोलिस ठाण्याच्या अंतर्गत सात पोलिस चौक्‍या येतात. प्रत्येक चौकीच्या परिसरात त्या भागात सामाजिक कामे करणाऱ्या मंडळांशी संपर्क साधण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यांचे किमान दहा कार्यकर्ते, त्यांच्या मदतीला दोन पोलिस कर्मचारी देण्याचा प्रस्ताव आहे. कार्यकर्ते उपलब्ध झाले नाहीत तरी सुरक्षारक्षकांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न आहे; परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे अनेक सोसायट्यांचे पदाधिकारी पुढाकार घेण्यास इच्छुक नाहीत. प्रत्येक सोसायटीला पोलिस संरक्षण देणे शनाही, हे त्यांनीही समजून घ्यायला हवे.''
.....................................................................................

असे आहे बजेट... (सिंहगड रोड विभाग)

काही दिवसांपूर्वी आपण कोथरूड परिसरासाठी असलेले बजेट पाहिले होते. हे बजेट आहे गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वेगाने विकसित झालेल्या सिंहगड रस्ता परिसराचे. येथील प्रभागांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सुमारे साडेसात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामधील सर्वाधिक तरतूद रस्त्यांच्या कामांसाठी आहे. या भागासाठी मोठी योजना सुचविण्यात आली नसली, तरी विठ्ठलवाडी येथील मैलापाणी शुद्धीकरण केंद्र पूर्ण करण्याच्या आणि बीआरटीच्या कामासाठी भरीव तरतूद आहे. आपल्या भागासाठीच्या तरतुदी आपल्याला माहित असाव्यात, त्याकडे लक्ष देता यावे, यासाठीचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला काय वाटते? बजेट माहिती असल्यामुळे काही फरक पडेल का?

* देखभाल दुरुस्तीसह सुमारे साडेसात कोटी
* रस्त्यांच्या कामांसाठी सर्वाधिक तरतूद
* अस्तित्वातील सुविधांच्या देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे तीन कोटी
* पर्यायी रस्ता विकास करण्यासाठी तरतूद नाही
* नागरिकांनी सुचविलेल्या कामांसाठी दीड कोटी
* स्वारगेट ते धायरीगाव बीआरटी प्रकल्पासाठी तरतूद
* विठ्ठलवाडी येथील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भरीव तरतूद
* पु. ल. देशपांडे उद्यानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तरतूद
* उद्यानाशेजारी व्यायामशाळा आणि जलतरण तलावासाठी पंधरा लाख
* आनंदनगर-हिंगणे खुर्द येथे उद्यानासाठी आठ लाख
* आनंद नगर चौक ते हिंगणे चौक क्रॉस पुलासाठी बारा लाख
* वडगाव बुद्रुक या ठिकाणी भाजी मंडई, दवाखाना आणि सांस्कृतिक भवनासाठी 45 लाख


नियोजन नसल्यामुळे या भागाला काहीसे बकाल स्वरूप येऊ लागले आहे. या भागासाठी सिंहगड रस्ता हा एकमेव रस्ता असून, त्याला पर्यायी रस्ता नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यायी रस्त्यांबरोबरच कोणत्याही मोठ्या प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आलेली नाही. याउलट या भागातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, धोकादायक खांब हलविणे आणि नवीन ठिकाणी प्रकाश व्यवस्था निर्माण करणे, आदी कामांसाठी भरीव तरतूद आहे. पायाभूत सुविधांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सुमारे तीन कोटी रुपयांची तरतूद आहे.
या भागातील रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे पावणेतीन कोटी रुपये, विजेचे खांब बसविणे आणि धोकादायक खांब हलविण्याच्या कामांसाठी साडेआठ कोटी रुपये, नागरिकांनी सुचविलेल्या कामासाठी सुमारे दीड कोटी रुपये, तर गलिच्छ वस्ती निर्मूलन विभागातील कामांसाठी एक कोटी 43 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भाजीमंडई आणि पावसाळी गटारांच्या कामांसाठी ही तरतूद आहे.
याशिवाय जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनर्निर्माण योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारकडून महापालिकेस निधी प्राप्त होणार आहे. या निधीतून विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगतच्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. तर स्वारगेट ते धायरीगाव दरम्यान बीआरटीचा प्रकल्प राबविण्यासाठी सुमारे एक कोटी 81 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय पु. ल. देशपांडे उद्यानाचा दुसरा टप्पा विकसित करण्यासाठीही या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

शहरात पुन्हा घरफोड्या

आपल्या सुरक्षित गणल्या गेलेल्या शहरात सध्या चोऱ्या आणि घरफोड्यांचं सत्र सुरू आहे. गस्तीपथक, पत्रकांमार्फत जागृती अशा पोलिसांच्या उपायांना हे चोरटे चक्क वाकुल्या दाखवत आहेत. काल कर्वेनगर भागातले मकरंद दत्तात्रेय सहस्रबुद्धे आणि सुभाष शिवराम वैद्य यांचे फ्लॅट भरदिवसा फोडले. आतापर्यंत सुमारे 23 फ्लॅट फोडले गेले आहेत.

सहस्रबुद्धे हे दुपारी साडेतीनच्या सुमारास सदनिकेला कुलूप लावून बाहेर गेले होते. चोरट्यांनी अवघ्या 40 मिनिटांच्या कालावधीत त्यांच्या घरातील साडेअठरा हजार रुपयांची रआणि सोन्या-चांदीचे दागिने असा 47 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला, तसेच वैद्य यांच्या घरीही दुपारी एक ते चारच्या दरम्यान चोरी झाली. या वेळी सोन्या-चांदीचे दागिने आणि साडेतेरा हजार रुपयांची रोख रचोरण्यात आली.
कोथरूड, कर्वेनगर परिसरात 7 ऑगस्ट रोजी दहा फ्लॅट फोडले होते, तर बंडगार्डन येथील अतुल सोसायटीत 8 ऑगस्टला सात फ्लॅट फोडण्यात आले. हडपसर, कोथरूड आणि स्वारगेट भागातील 10 ऑगस्टला दुपारच्या वेळी तीन फ्लॅट फोडले होते. कर्वेनगर परिसरात या आधीही फ्लॅट फोडण्याचे प्रकार घडलेले आहेत. पोलिसांच्या सुमार तपासामुळे घरफोड्यांना एक प्रकारे पाठबळ मिळत आहे. घर बंद ठेवून बाहेर पडावे की नाही, अशी भीती रहिवाशांमध्ये आहे. या भागात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोड्यांचा अद्यापि तपास लागलेला नाही.
या बाबत आपण काही करू शकतो का? आपणच पोलिस ही भूमिका बजावता येईल का? शेजाऱ्यांना सांगून बाहेर पडणे, असे काही उपाय करता येतील का?

वाहत्या मुठेत रिक्षा स्वच्छता...

वाहत्या गंगेत हात धुणं, ही म्हण आपल्याकडे चांगलीच प्रचलित आहे. गंगेत नाही; पण दुधडी भरून वाहणाऱ्या मुठेत रिक्षा धुवून पुण्यातल्या रिक्षावाल्यांनी या म्हणीचा व्यावहारिक उपयोग सिद्ध केलाय.

समस्या मोठी.... उपाय मात्र आहेत!

सिंहगड रस्त्याचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच संतोष हॉलच्या चौकात ट्रॅफिकचे वाईट हाल असतात. या भागात राहणारे पारिजात तीरमारे यांनी येथील समस्या आणि त्यावर त्यांना सुचणारे उपाय आपल्यासमोर मांडले आहेत.



सिंहगडाकडे जाणाऱ्यांनी वर दिलेल्या नकाशातील रस्त्याचा वापर केल्यास मुख्य रस्त्याचा बराच ताण कमी होण्यास मदत होईल.

समस्या
विठ्ठलवाडीच्या पुढे वाहतुकीची कोंडी वारंवार होते. हिंगणे खुर्द, आनंदनगर, वडगाव बुद्रुक, माणिकबाग, वडगाव धायरी येथे सतत वाहतूक ठप्प होते. सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता नाही, त्यामुळे मुख्य रस्त्यावर अवलंबून राहावे लागते. या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करू शकणाऱ्या विठ्ठलवाडी ते सनसिटी या पर्यायी रस्त्याचे काम सुरू असले, तरी ते पूर्ण होण्यास काही कालावधी जावा लागणार आहे. सिंहगड रस्त्यावरचा ताण दिवसेंदिवस वाढतच आहे. या रस्त्यावरील सर्वात जास्त वर्दळीचा चौक आनंदनगरमधील सनसिटीकडे जाणारा आहे. या चौकात असलेली कमान काढल्यामुळे रस्त्याची रुंदी सहा फुटांनी वाढली. या चौकातील पार्किंग बद्दल अनेकदा तक्रारी करून झाल्या आहेत. पण प्रशासन काहीच कारवाई करत नसल्यामुळे समस्या वाढतच चालली आहे. त्यातच चौकातील दुकानांमध्ये आलेले ग्राहकही रस्त्यावर वाहन उभे करतात. रिक्षावाले मनमानीकरीत प्रवासी घेत उभे राहतात व वाहतुकीचा गोंधळ उडतो. संतोष हॉलसमोरील सनसिटीकडे जाणाऱ्या गल्ली छोटी आहे. त्यातच तिथे मोठ्या सोसायट्या झाल्या आहेत. त्यामुळे एखादे मोठे वाहन या गल्लीत वळत असेल, तर ते वळताना वाहतुकीच्या प्रवाहात मध्येच अडकते. त्या वेळी इतर वाहनेही पुढे दामटली जात असल्याने वाहतूक रखडते. एकाच वेळी सगळीकडून वाहतूक सुरू असल्याने ही कोंडी वाढत जाते.

उपाय

सनसिटीकडे जाताना सुरवातीलाच असलेले अनधिकृत पार्किंग बंद करून रस्ता रुंद करावा. मुख्य चौकामध्ये 15 मीटरच्या आत कोणतेही अतिक्रमण, भाजी विक्रेते वा रिक्षा स्टॅंड असू नये. चौक मोकळा असावा. विशेषत: संतोष हॉलच्या चौकातील सर्व अडथळे दूर केले पाहिजेत.
चौकादरम्यान भाजी, फळविक्रेते, फेरीवाले बसतात. त्यातच पार्किंगही असल्याने रस्ता पुन्हा अरुंद होतो. रस्ता चांगल्या स्थितीत असल्याने वाहनांचे वेग जास्त असतात, मात्र त्याला शिस्त नावालाही नसते. हात अथवा इंडिकेटर न दाखवता वळणे, दुचाकीवर तिघांनी बसणे, सिग्नल न पाळणे आणि उलट्या दिशेने वाहन चालविणे हे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. सिग्नल पूर्णवेळ चालू ठेवून चौकात पोलिस ठेवल्यास समस्या सुटू शकते.
रस्ता रुंद झाल्यानंतर लोकांच्या मानसिकतेमध्ये जो फरक पडायला हवा होता, तो पडलेला नाही. स्वयंशिस्त पाळणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे आणि वाहनचालकांना त्याचाच विसर पडला आहे. आता शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम उघडणे गरजेचे आहे. प्रत्येक चौकात एक वाहतूक पोलिस आणि नियम तोडल्यास जबरी दंड सुरू व्हायलाच हवा, आठवड्यातून दोन-तीन वेळा नो पार्किंगझोनमधील वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा नियम तोडणारा एखादा कोणा निरपराध्याचे प्राण घेऊन जाईल. त्यामुळे स्वयंशिस्तीला पर्याय नाही.

चूक नेमकी कोणाची ?



स्थळ कर्वे रस्ता -

सायंकाळी साडेपाच-पावणेसहाचा सुमार। कर्वे रस्त्यावरील महर्षी कर्वे दूरध्वनी केंद्रासमोरचे ठिकाण। एका वृद्ध जोडप्याला रस्ता ओलांडायचा आहे... एका विद्यार्थिनीने त्यांना रस्ता ओलांडायला मदत केली। .......दुभाजक ओलांडून आजोबा दुभाजकाला चिकटूनच पुढील रस्ता रिकामा होण्याच्या प्रतीक्षेत उभे होते... तोच एक मोटार त्यांच्या जवळून गेली आणि बिचकल्याने आजोबांचा तोल गेला। दुभाजकाला अडखळून ते मागे कोसळले।



आघात आणि आधार

सुदैवाने त्या वेळी तेथून एकही वाहन जात नव्हते। इतर विद्यार्थ्यांनी लगेचच त्यांना उठण्यासाठी मदत केली। पुण्यातील रस्ते ओलांडणेही किती जिकिरीचे झाले आहे, याबाबतची छायाचित्रे घेण्यासाठीच "सकाळ'चे छायाचित्रकार मंदार देशपांडे तेथे गेले होते। हे दांपत्य "धक्‍क्‍या'तून सावरल्यावर देशपांडे यांनी त्यांना घरी जाण्यासाठी रिक्षाही करून दिली।


चूक नेमकी कोणाची?

वृद्ध नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, एवढीही काळजी न घेणाऱ्या महापालिकेची...अशी सोय नसतानाही तो ओलांडू पाहणाऱ्या आजोबांची, की रस्ता ओंलाडण्यासाठी उभ्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची पर्वा नसलेल्या अतिघाईतील वाहनांची...?

बोजवारा



कोट्यवधी रुपये खर्चून मोठमोठाले पूल बांधूनही वाहतुकीचा उडालेला बोजवारा क्वचितच पाहायला मिळतो. मात्र, पुणे विद्यापीठ चौकात वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. रुंद पूल, अरुंद रस्ते आणि बंद पडलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते आहे. अशा या बेशिस्त वाहतुकीपुढे पोलिसही हतबल झाले असून, नागरिकांनीही महापालिकेपुढे हात टेकले आहेत. आता तुम्हीच सांगा काय करायचं विद्यापीठ चौकातील वाहतूक सुधारण्यासाठी???

हॅपी फ्रेंडशिप डे...!!!

ये दोस्ती हम नहीं छोडेंगे... असे म्हणत मैत्रीच्या आणाभाका घेणाऱ्या तरुण- तरुणींच्या उत्साहाला उधाण आलं असणार नाही का? आहो का, काय विचारताय. गेल्या महिनाभरापासून ते ज्या दिवसाची प्रतिक्षा करताहेत, तो दिवस काही तासांवर येऊन ठेपलाय. मैत्रीदिन अर्थातच फ्रेंडशिप डे. एव्हाना आपल्या प्रिय मित्र- मैत्रिणीसाठी फ्रेंडशिप बॅंड, एखादं भेटकार्ड अन्‌ भेटवस्तूही खरेदी केली गेली असेल, नाही का? तर मग सांगा तरी तुम्ही काय केली खरेदीत ते...

असे आहे बजेट!

महापालिकेचा अर्थसंकल्प नुकताच मंजूर झाला आहे. शहराच्या विकासासाठी, पायाभूत सुविधांसाठी यामध्ये तरतुदी असतात. आपल्या भागातील कोणत्या कामांसाठी किती तरतुद आहे, कोणकोणती कामे होणार आहे, याबाबत नागरिकांना फारशी माहिती नसते. ती माहिती देण्याचा हा एक प्रयत्न आहे. या माहितीचा उपयोग आपल्याला होणाऱ्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठीही होईल. आज आपण बाणेर, बावधन, कोथरूड, औंध आणि पाषाण भागातील तरतुदींची माहिती पाहूया. ही माहिती वाचून तुमची मतेही नक्की कळवा.

ठळक तरतुदी

बाणेर, औंध आणि कचरा डेपो या ठिकाणी अग्निशामक केंद्र
पाषाण तलावाचे सुशोभीकरण
कर्वे रस्ता, पौड रस्ता आणि बाणेर रस्त्यावर बीआरटी
बाणेर-पाषाण परिसरातील डोंगरमाथ्यावर "जैवविविधता पार्क' विकसित करण्यासाठी तरतूद
गांधी भवन, चांदणी चौक, बाणेर या ठिकाणी नवीन पाणी साठवण टाक्‍यांसाठी तरतूद
बाणेर या ठिकाणी नदीकाठावर मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी तरतूद
या सर्व परिसरातील रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे पाच कोटी रुपयांची तरतूद
या परिसरातील नाला चॅनेलायझिंग आणि पावसाळी गटारांच्या कामांसाठी मोठी तरतूद
सुतारवाडी-महादेव मंदिरालगत व्यायामशाळा आणि पोहण्याचा तलावासाठी 12 लाख
सुतारवाडी ते पाषाण रस्त्यावर राम नदीवर पूल बांधण्यासाठी 12 लाख
पाषाण सर्व्हे नं 140/6 या ठिकाणी उद्यान विकसित करणे 11 लाख
कस्तुरबा वसाहत या ठिकाणी महिलासाठी उद्योग हॉल बांधण्यासाठी 10 लाख

बाणेर, बावधन, कोथरूड, औंध, पाषाण हा भाग अत्यंत वेगाने विकसित होत आहे; मात्र वेगवान विकासाच्या तुलनेत येथील पायाभूत सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात या भागासाठी रस्ते, पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन टाकी, अग्निशामक केंद्र आणि रस्त्यावरील धोकादायक विजेचे खांब हलविण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. या शिवाय जवाहरलाल नेहरू रोजगार योजनेअंतर्गत कर्वे रस्त्यावर बीआरटी आणि पाषाण तलावाच्या सुशोभीकरणाची योजना अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत. बाणेर आणि पाषाण परिसरातील तीनशे हेक्‍टर डोंगरमाथ्यावर "जैवविविधता पार्क' विकसित करण्यात येणार आहे.
शहराच्या हद्दीबाहेर असलेला हा भाग दहा वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झाला. अल्पावधीतच या भागाला कॉंक्रीटच्या जंगलाचे स्वरूप आले. त्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्यात महापालिकेला यश आले नाही. वेगाने विकसित होत असल्यामुळे त्याचा ताण येथील नागरी सुविधांवर येऊ लागला आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या, अपुरा पाणीपुरवठा, अरुंद रस्ते आदी सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दीड वर्षापूर्वी या भागातील पाण्याचा प्रश्‍न गंभीर होता; मात्र वारजे जलशुद्धीकरण केंद्र सुरू झाल्यामुळे तो काही प्रमाणात कमी झाला आहे, तरी देखील अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून आजही केल्या जात आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात या भागात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
वारजे-कर्वेनगर आणि औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील 18 प्रभागांमध्ये हा सर्व परिसर विखुरलेला आहे. मोरे विद्यालय, रामबाग कॉलनी, किष्किंधानगर, रामकृष्ण परमहंसनगर, वेद भवन, महात्मा सोसायटी-कोथरूड, वनाज कंपनी, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, आयडियल कॉलनी या नऊ प्रभागांत सुमारे 112 विकासकामांसाठी सव्वासहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये रस्त्यांच्या कामासाठी दीड कोटी, ड्रेनेजच्या कामासाठी 78 लाख, पाणीपुरवठ्याच्या लाइन टाकण्यासाठी एक कोटी, तर रस्त्यावरील धोकादायक विजेचे खांब हलविण्यासाठी 67 लाख रुपयांची तरतूद आहे. दवाखाने, समाजमंदिर, ग्रंथालय आणि अभ्यासिका आदी कामांसाठी 77 लाखांची तरतूद आहे, तर औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या औंध गाव, बाणेर बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण, राजभवन, पुणे विद्यापीठ आदी नऊ प्रभागांतील कामांसाठी सुमारे पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. औंध भागातून जाणाऱ्या नाल्याचे चॅनलायझिंग करण्यासाठी व पावसाळी गटारे करण्यासाठी वीस लाख रुपये, औंध गाव या ठिकाणी नाट्यगृह उभारण्यासाठी वीस लाख, सुतारवाडी परिसरात पावसाळी गटारे करण्यासाठी सुमारे 45 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या परिसरातील धोकादायक विजेचे खांब हलविण्यासाठी वीस लाख, अशा विविध कामांसाठी सुमारे दहा ते पंधरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भागातील सर्वाधिक साडेतीन कोटी रुपयांची तरतूद रस्त्यांच्या कामांसाठी करण्यात आली आहे.
कर्वे रस्ता, पौड रस्ता आणि बाणेर या भागात बीआरटी सुरू करण्यासाठी; तसेच पाषाण येथील तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली, तर बाणेर या ठिकाणी नदीपात्रात 20 एमएलडी क्षमतेचे मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय औंध, कचरा डेपो आणि वारजे या तिन्ही ठिकाणी अग्निशामक केंद्र उभारणे, गांधी भवन, चांदणी चौक, बाणेर या ठिकाणी नव्याने पाण्याच्या साठवण टाक्‍या बांधणे आदी कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे.

शाळा, वाहतूक कोंडी आणि तुमच्या-आमच्या मुलांची सुरक्षितता



पुण्याच्या सर्वच उपनगरांमध्ये वाहतुकीची समस्या तीव्र आहे. या पार्श्‍वभूमीवर वेगाने विकसित झालेल्या कोथरूड, सिंहगड रस्ता व सातारा रस्ता परिसरातील शाळांच्या परिसरातही वाहतुकीची प्रचंड कोंडी असते. या कोंडीकडे लक्ष देणे आणि तातडीने उपाययोजना करणे, हे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्‍यक आहे. आपण साऱ्यांनी मिळून उपाय शोधले पाहिजेत आणि त्याचा पाठपुरावाही केला पाहिजे. तुमच्या आमच्या मुलांच्या सुरक्षिततेचा हा मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे त्याकडे त्याच संवेदनशीलतेने पाहिले जायला हवे.

खाली सातारा रोड परिसरातील उदाहरणे आहेत. आपल्याही परिसरात अशी कोंडी होत असेल, त्यावर तुम्हाला उपाय सुचत असतील, तर तुमच्या कॉमेंटचे स्वागत आहे. अधिक माहिती किंवा फोटो द्यायचे असतील तर आम्हाला sakaalpapers@gmail.com या ऍड्रेसवर मेल करा...

वाहतुकीचा प्रश्‍न उपनगरांमध्ये सुरू झालेल्या शाळांच्या परिसरात प्रामुख्याने जाणवतो. लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी येणाऱ्या रिक्षा तसेच इतर वाहने, पालकांची खासगी वाहने आणि त्या परिसरातील रहिवाशांची ये-जा यामुळे कमी जास्त प्रमाणात सर्वच शाळांपुढे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्‍न भेडसावतो. प्रत्येक शाळा आपल्या पातळीवर यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असली, तरी दिवसेंदिवस हा प्रश्‍न उग्र रूप धारण करीत आहे.
सातारा रस्त्यावरील धनकवडी येथील ज्ञानांकूर स्कूलच्या मुख्याध्यापिका मालिनी रावळिया म्हणाल्या, ""शाळेच्या आवारात पालक किंवा रिक्षावाले काका यांच्या वाहनांना परवानगी नाही. शाळा सुटण्याआधी रिक्षावाले काकांनी आवारात यावे, मुलांना मोजून घ्यावे, त्यांची दप्तरे न विसरता घ्यावीत आणि बाहेर रिक्षा लावलेल्या ठिकाणी मुलांना घेऊन जावे या शिस्तीचे पालन आमच्याकडे होते. पालकांनाही प्रवेशद्वाराच्या आत प्रवेश दिला जात नाही. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी गर्दी होणार नाही याची काळजी सेवक घेत असतात. त्यामुळे गर्दी आणि गोंधळ टाळण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. शाळेत सुमारे सहाशे मुले आहेत. बहुतांश मुले रिक्षासारख्या वाहनांनी येतात. रिक्षाचालकही शाळेने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत असतात.''
धनकवडी गावातील शाळांबाबतही हीच प्रमुख समस्या जाणवते. या भागातील अनेक शाळा अरुंद गल्ल्यांमध्ये असल्याने, शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी वाहतुकीची कोंडी होत असते. यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न काही शाळांच्या पातळीवर होत असतात; मात्र या सर्वांवर उपाय आहे तो प्रत्येकाच्या स्वयंशिस्तीचा.

हे सर्व टाळण्यासाठी......
पालकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत
मुलांनाही नियमांची जाणीव करून द्यावी
पार्किंगची व्यवस्था शाळांनी करून देण्याची गरज
शाळांच्या पातळीवर निरंतर समुपदेशनाची गरज
मुलाला सोडण्यासाठी गेल्यानंतर शाळेच्या दारासमोरच वाहने नेऊ नका
रिक्षावाले काकांनीही नियम पाळणे अपेक्षित

शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी जशी शाळांची आहे, त्याचप्रमाणे पालकांनीही काही गोष्टी पाळायला हव्यात. मुलांना शाळेत सोडताना वाहन लावण्यासाठी ठरवून दिलेल्या जागेतच वाहने लावावीत. गर्दी होईल, इतरांना अडचण होईल, अशा रीतीने वाहने उभी करू नयेत. मुलाला सोडण्यासाठी त्याच्या वर्गापर्यंत न जाता शाळेने केलेल्या सूचनेप्रमाणे त्या जागेवर सोडावे. मुलाला सोडल्यानंतर तिथेच उभे न राहता पटकन निघून जावे. यांसारख्या छोट्या गोष्टी पाळल्या, तरी शाळांच्या परिसरातील वाहतूक अधिक सुसह्य होऊन त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाच होईल.