व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

सत्यम चा फुगा फुटला

देशातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी गणल्या गेलेल्या "सत्यम कॉम्प्युटर्स' कंपनीच्या अध्यक्षांनीच कंपनीची आर्थिक स्थिती अवाच्या सव्वा फुगवून आर्थिक भरभराटीचा फुगा आणला होता, असे बुधवारी स्पष्ट झाले.

वर्षानुवर्षे केलेल्या या गैरप्रकाराची कबुली देऊन, अध्यक्ष रामलिंग राजू यांनी पदाचा राजीनामा दिला. राजू यांचे बंधू व कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. रामा राजू यांनीही पदाचा राजीनामा दिला. देशाच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील हा सर्वांत मोठा गैरप्रकार मानला जात असून, कंपनीच्या ५३ हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्यही त्यामुळे धोक्‍यात आले आहे.त्यातून भारताची कॉर्पोरेट आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील उज्ज्वल प्रतिमाही डागाळली जाण्याची शक्‍यता आहे.

नीतिमत्ता, कॉर्पोरेट व्यवस्थापन, हिशेब आणि व्यवसाय सेवा यांबाबतची विश्‍वासार्हताही धोक्‍यात येणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि गैरप्रकाराच्या सूत्रधारांवर कडक कारवाई होईल, अशी घोषणा कॉर्पोरेट व्यवहार मंत्री आणि सेबी यांनी केली.

हा प्रकार उघड झाल्यानंतर "सेबी'ने कंपनीच्या शेअरची खरेदी, विक्री किंवा अन्य सर्व व्यवहारांची सत्यता तपासून पाहण्याचे आदेश दिले. कंपनीच्या हिशेब नोंदींची तपासणीही होणार आहे. हे सर्व प्रकरण गंभीर गैरप्रकार तपास कार्यालयाकडे सुपूर्त करण्यात येणार आहे.

दोषींवर कारवाई होईल तेव्हा होईल, पण या गैरव्यवहारमुळे ५३ हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्‍यात आले त्याचे काय? "सत्यम'सारखे गैरव्यवहार रोखण्यासाठी कोणते उपाय योजावेत, या बद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा...

जागतिक मंदीची झळ भारताला जाणवणार नाही

""भारतातील आर्थिक आणि बॅंकिंग क्षेत्रातील विविध निर्बंधांमुळे या जागतिक मंदीची झळ भारताला विशेष जाणवणार नाही; पण यातून आर्थिक उपाययोजनांच्या काटेकोर अंमलबजावणीचा धडा आपण घ्यायला पाहिजे,''

""नफ्याचा अतिरेकी हव्यास, नियमांचे उल्लंघन यामुळे हे संकट उद्‌भवले. भावी पिढी यापासून योग्य धडा घेईल, अशी अपेक्षा आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेत "शैक्षणिक विकास' महत्त्वाचा मानला गेला आहे. त्यामुळे देशाचे भविष्य असलेली तरुण पिढी सक्षम बनेल आणि भावी आर्थिक संकटापासून देशाला वाचवू शकेल.''

या मंदीचा परिणाम आपल्यालाही जाणवत असेल. या परिस्थितीत आपण कशाप्रकारे वागले पाहिजे. आपल्या सूचना आणि मते आम्हाला कळवा...

कसाबचा जबाब

२६ नोव्हेंबर हा दिवस देशातला विशेषत: महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती विसरू शकणार नाही. काही मूठभर अतिरेक्‍यांनी या दिवशी मुंबईवर चाल करून अवघ्या देशवासियांना वेठिस धरलं. सीएसटी, हॉटेल ताज, ओबेरॉय आणि त्यापाठोपाठ नरीमन हाऊसलाही हल्ल्याचं लक्ष्य केलं. भारतीय नागरिकांबरोबर काही परदेशी नागरिकांना ओलिस ठेवून अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. ७० तासांच्या कारवाईदरम्यान केवळ एका अतिरेक्‍याला पकडणं शक्‍य झालं. मोहम्मद अजमल कसाब हा तो अतिरेकी. त्यानं गुरुवारी पोलिसांना कबुलीजबाब दिला. आपण तो ई- सकाळवर वाचलाच असेल. हा सर्व कबुलीजबाब वाचल्यानंतर तुमच्या मनात स्पंदनं उत्पन्न झाले असतील. भावनांचा कल्लोळ निर्माण झाला असेल. एवढ्या कबुलीजबाबनंतर पोलिसांनी आणि भारताने कोणतही कारवाई करावी, असे वाटते? पुणे प्रतिबिंब आणि सकाळ ब्लॉगवर नक्की लिहा...

राणेंचे बंड बदलणार पुण्याचे संदर्भ

माजी महसूलमंत्री नारायण राणे यांनी कॉंग्रेसमध्ये बंडाचा झेंडा उभारल्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर काय होणार हे येत्या काळामध्ये स्पष्ट होणार असले, तरीही पुणे शहराचे राजकारण मात्र त्यामुळे ढवळून निघाले आहे.


राणेसमर्थक विनायक निम्हण त्यांच्याबरोबरच कॉंग्रेसबाहेर पडण्याची चिन्हे निर्माण झाल्याने त्यांच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्यांनी पुन्हा जोर धरला आहे. इतकेच नव्हे, तर त्याचा परिणाम शहराच्या चार विधानसभा मतदारसंघांवर थेट होणार आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले विनायक निम्हण यांचा लौकिक राणे यांचे कट्टर समर्थक असाच आहे. निम्हण अजूनही तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेत असले, तरीही ते मनाने राणे यांच्याबरोबरच कॉंग्रेसवासीय झाले होते.


राणे यांच्या या नव्या पवित्र्यामुळे पुन्हा एकदा सर्वच समीकरणे बदलणार आहेत. निम्हण हे आता कॉंग्रेस किंवा शिवसेना या दोन्ही पक्षांचे उमेदवार नसणार, हे जवळजवळ निश्‍चित झाल्याने अनेकांनी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. हा मतदारसंघ मूळचा आपलाच असल्याचा दावा चंद्रकांत छाजेड करू शकतील, किंवा गेल्या वेळचे राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल भोसले हे देखील आपला दावा सांगू शकतील. शिवाजीनगर राष्ट्रवादीकडे आल्यास कोथरूड कॉंग्रेसकडे जाणार. त्यामुळे कॉंग्रेसच्या दीपक मानकर यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, कॉंग्रेसमधील इतर इच्छुकही कामास लागले आहेत.

साहजिकच पुण्यातील आठही मतदारसंघांची स्थिती ही एखाद्या "तुकडे जोडून चित्र पूर्ण करा' या कोड्याप्रमाणे झाली असून, शिवाजीनगरमध्ये निम्हण घेणार असलेली भूमिका यामध्ये निर्णायक ठरणार आहे.

कॉंग्रेसमधून निलंबित केलेले नारायण राणे गुरुवारी कणकवली येथे येऊन आपल्या पुढील राजकीय वाटचालीची घोषणा करणार आहेत.

तुम्हाला काय वाटते? राणे यांची घोषणा काय असेल? अन्‌ तुम्हाला काय वाटते, त्यांची वाटचाल कशी असावी?