सोसायट्यांची सुरक्षितता : पहिले पाऊल
कर्वेनगर, वारजे, कोथरूड भागातील रहिवासी वाढत्या चोऱ्या, घरफोड्या यामुळे त्रस्त झाले आहेत. सिंहगड रस्त्यावरील "पुलोद्यान परिसर नागरी कृती समिती'ने सुरक्षिततेबाबत घेतलेला पुढाकार कोथरूड भागातील रहिवाशांना प्रेरणादायी ठरू शकतो. वीटभट्टी परिसरातील 18 सोसायट्यांतील सुमारे 650 सदनिकाधारक एकत्र येऊन त्यांनी गस्तयोजना राबविली आहे. त्याबद्दल थोडेसे....
मंगेश कोळपकर
सिंहगड रस्ता परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून घरफोड्या, चोऱ्या यांची संख्या वाढती आहे. त्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. या भागातील रहिवाशांचे दुर्दैव म्हणजे राजाराम पुलापर्यंतची हद्द शहर पोलिसांची येते, तर त्यापुढे जिल्हा पोलिसांची हद्द आहे. त्यामुळे दत्तवाडी व अभिरुची या दोन पोलिस चौक्यांवर रहिवाशांची भिस्त आहे. स्वारगेट पोलिस ठाण्यातील मनुष्यबळाची अवस्था थोडीफार चांगली आहे; परंतु अभिरुची पोलिस चौकीत मनुष्यबळाची अक्षरश: वानवा आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी जादा मनुष्यबळ पुरविण्याचे आश्वासन महिन्यापूर्वी दिले होते; परंतु या भागात दत्तवाडी पोलिस ठाणे प्रस्तावित असल्यामुळे ते मागे पडले आहे.
वीटभट्टी ते राजाराम पुलापर्यंत सुमारे 25 सोसायट्या असून, तीन झोपडपट्ट्या आहेत. काही सोसायट्यांनी सुरक्षारक्षक नियुक्त केले; परंतु ते पुरेसे ठरले नाहीत. अखेर हा प्रश्न तडीस नेण्याचा त्यांनी निर्धार केला.
त्यांनी कृती समिती स्थापन केली. तिच्या माध्यमातून अध्यक्ष नाना काळे, निमंत्रक प्रा. राम डिंबळे, सुरेश थोरात यांनी सरिता एलिगन्स, शुक्रतारा अपार्टमेंट, अवंती, अपूर्वाई, वृंदावन, औदुंबर, अद्वैत, सिल्व्हेनिया वूड्स, त्रिमूर्ती, पारिजात, श्रवण, सरिता विहार, प्रज्ञानगड, आदीश्री, श्वेतांबरी, नीलांबरी, कादंबरी आदी सोसायट्यांतील रहिवाशांशी संपर्क साधला. सुरक्षिततेचे महत्त्व त्यांना पटवून दिले. प्रत्येक सदनिकाधारकाकडून त्यासाठी दरमहा पन्नास रुपये आकारण्याचा निर्णय झाला. त्यानुसार समितीकडे 18 सोसायट्यांची सुमारे सहा महिन्यांची रक्कम गोळा झाली. सुरक्षारक्षक हे केवळ रखवालदार नकोत, यावर त्यांचे एकमत झाले. त्यांनी सध्या दोन सशस्त्र आणि सुमारे 18 साधे सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत. सशस्त्र सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्यात येणार आहे, असे श्री. डिंबळे यांनी सांगितले. सुरक्षारक्षक सक्षम असावेत, यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष पुरविले आहे.
सुरक्षारक्षकांकडे समितीने प्रत्येक इमारतीमधील तळमजल्यावरील रहिवाशांचे दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. गस्त घालताना सर्व रक्षकांचा समन्वय असेल, याची काळजी घेण्यात आली आहे. आपत्तीच्या वेळी एखाद्या रक्षकाने शिटी वाजवली तरी आसपासचे रक्षक तेथे धावतील, अशी रचना करण्यात आली आहे. वीटभट्टी, तेथील अंतर्गत रस्ते व मुठा नदीचा परिसर, येथे सध्या ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ""शनिवारी मध्यरात्री एका इमारतीच्या आवारात एक मोटार आली. त्यातून चौघे जण उतरले. त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्यामुळे काही नागरिकांनी, सुरक्षारक्षकांनी आरडाओरडा केला. त्यामुळे त्यांना पळून जावे लागले,'' असा अनुभव श्री. डिंबळे यांनी सांगितला.
पोलिसांनी सुरक्षारक्षकांना सूचना दिल्या असून, आपत्तीच्या वेळी संपर्क साधण्यासाठी अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांकही दिले आहेत. कृती समिती केवळ सुरक्षिततेच्या प्रश्नावर काम करीत नाही, तर सिंहगड रस्ता आता सिमेंटचा झाला आहे. त्यामुळे त्यावरून वाहने भरधाव जातात व त्यामुळेच अनेकदा या रस्त्यावर अपघात होतात. म्हणून तेथे गतिरोधक असावेत, वाहतूक नियंत्रक दिवे उभारावेत, यासाठीही समितीचे प्रयत्न सुरू आहेत.
कृती समितीच्या कामकाजाबद्दल काही माहिती हवी असल्यास इच्छुकांना प्रा. राम डिंबळे यांच्याशी 9372481503 या क्रमांकावर संपर्क साधावा.
.....................................................................................
कर्वेनगर परिसरात गेल्या सोमवारी मध्यरात्री 12 सदनिका चोरट्यांनी फोडल्या. एकाच वेळी अनेक सदनिकांमध्ये चोरी होण्याची या परिसरातील ही सलग तिसरी घटना. वारजे, कोथरूड भागातील काही सोसायट्यांतील रहिवाशांनी पुढाकार घेऊन सुरक्षारक्षकांच्या मदतीने गस्त योजना सुरू केली आहे; परंतु पुरेसे संघटित प्रयत्न नसल्यामुळे त्या फारशा यशस्वी झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर कोथरूड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गौतम देशमुख म्हणाले, ""पोलिस ठाण्याच्या अंतर्गत सात पोलिस चौक्या येतात. प्रत्येक चौकीच्या परिसरात त्या भागात सामाजिक कामे करणाऱ्या मंडळांशी संपर्क साधण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यांचे किमान दहा कार्यकर्ते, त्यांच्या मदतीला दोन पोलिस कर्मचारी देण्याचा प्रस्ताव आहे. कार्यकर्ते उपलब्ध झाले नाहीत तरी सुरक्षारक्षकांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न आहे; परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे अनेक सोसायट्यांचे पदाधिकारी पुढाकार घेण्यास इच्छुक नाहीत. प्रत्येक सोसायटीला पोलिस संरक्षण देणे शनाही, हे त्यांनीही समजून घ्यायला हवे.''
.....................................................................................
0 comments:
Post a Comment