व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>
Showing posts with label state government. Show all posts
Showing posts with label state government. Show all posts

बालकुपोषितांच्या मृत्यूस शासकीय अनास्थाच जबाबदार

बालकुपोषितांच्या मृत्यूस शासकीय अनास्थाच जबाबदार औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या,देशातील प्रगत राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यात कुपोषणामुळे पाचशेहून अधिक बालकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील सामाजिक विषमता अधोरेखित करणारी, तसेच सरकारी यंत्रणांची या प्रश्‍नाविषयी असलेली अनास्था दर्शविणारी ही आकडेवारी आहे.

राज्यात 2003-04 या वर्षात कुपोषणामुळे 8321 एवढे बालमृत्यू झाले. तर, 2004-05 आणि 2005-06 या वर्षांत ही आकडेवारी अनुक्रमे 8003 आणि 7700 होती. केवळ 15 जिल्ह्यांतल्या दुर्गम भागातील आहे, म्हणजे केवळ निम्म्या महाराष्ट्रतली ही आकडेवारी असून आजही मृत्यूचे प्रमाण फारसे बदललेले नाहीत. (सरकार दरबारी जरी हे प्रमाण कमी झाल्याची नोंद असली तरी!) असे असूनही या कुपोषणाच्या समस्येकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून काहीच किलोमीटरील ठाणे जिल्ह्यांतील आदिवासी पाड्यांवरही कुपोषणाचे प्रमाण गंभीर आहे.

मेळघाट हा अमरावती जिल्ह्यांतला अतिदुर्गम भाग आहे. तसेच तो अतिदारिद्रय अडाणीपणा, अंधश्रद्धेने ग्रासलेला आहे. शेती आणि इतर प्राथमिक उद्योगांवरच येथील लोक अवलंबून आहेत. आरोग्याचे प्रश्‍न येथे गंभीर आहेत पण त्यांतील गांभीर्य ना इथल्या लोकांना जाणवतं ना सरकारला.

गेल्या पाच महिन्यांत मेळघाटमध्ये कुपोषणामुळे मृत्यू झालेल्या मुलांची संख्या 176 इतकी आहे. ऑगस्ट महिन्यात कुपोषणामुळे 57 बालकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीतही मेळघाटमधील आरोग्यकेंद्रांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. बऱ्याचदा येथील आरोग्य सेवकांनाही अतिकुपोषितांचे निदान (ग्रेड 3 किंवा 4) करता येत नाही. साहजिकच त्यामुळे त्याच्यावर योग्य उपचार होत नाहीत. या भागात डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग त्यांच्या "सर्च' या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. मात्र एकटे डॉ. बंग या समस्येचे निवारण करू शकत नाहीत.

मेळघाट हा आदिवासी भाग आहे, त्यामुळे इथे असे प्रश्‍न निर्माण होणारच असा विचार करून जर या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करू नका. ठाण्यामध्ये गेल्या तीन महिन्यात कुपोषणाने 274 बालकांचा बळी घेतला आहे. मात्र हे मृत्यू न्यूमोनिया आणि अन्य आजाराने झाल्याचे शासनाने म्हटले आहे. मात्र तरीही ठाण्यातील परिस्थिती बरीच सुधारली आहे, असे म्हणावे लागेल. कारण दोन वर्षांपूर्वी याच कालावधीत कुपोषणामुळे मृत्यू झालेल्या मुलांचा आकडा 412 होता.

महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या डॉ. अभय बंग समितीने दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात कुपोषणामुळे दरवर्षी एक लाख 60 हजार बालकांचा मृत्यू होत असल्याचे म्हटले होते. हा अहवाल 2004 मध्ये प्रकाशित झाला होता आणि शासनाने तो स्वीकारलाही होता. इतकेच नाही, तर त्यानंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दलवीर भंडारी यांनी या प्रश्‍नी हलगर्जीपणा केल्यावरून सरकारला धारेवरही धरले होते. या सर्वांचा परिपाक म्हणून तरी चार वर्षांत "सरकारी उपाययोजनां'मुळे कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण कमी होणे अपेक्षित होते. मात्र वरील आकडेवारी विचारात घेतली तर असे काही झालेले दिसत नाही.

अनेक स्वयंसेवी संस्था कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत असताना शासनाकडून मात्र अनास्थाच दाखविली जात आहे. ही अनास्था आणखी किती बालकांचा बळी घेणार आहे, हे शासनच सांगू शकेल. नाही का? आपल्याला काय वाटते?

चारचाकी वाहनधारकांवर लावणार "ग्रीन टॅक्‍स' - वनमंत्री

राज्याला प्रदूषण मुक्त करून वनसंपदा वाढविण्यासाठी लागणारा खर्च म्हणून राज्यातील चारचाकी वाहनधारकांवर दरवर्षी ५०० रुपये प्रमाणे "ग्रीन टॅक्‍स' वसूल करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव वनविभागाने तयार केला आहे. लवकरच मंत्रिमंडळामुळे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे प्रत्येक राज्यात ३३ टक्के वनसंपदा असणे आवश्‍यक आहे. मात्र राज्यात २०.१३ टक्के वनक्षेत्र आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्‍यामुळे सामान्य लोकांपासून, तर विविध संघटनांचे लक्ष वनखात्याकडे लागले आहे, असे सांगून श्री. पाचपुते म्हणाले, राज्यातील वनक्षेत्र वाढविण्याची आवश्‍यकता आहे. राज्यात १ कोटी २२ लाख चार चाकी वाहने आहेत. वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. वनक्षेत्र वाढविण्यासाठी वनखात्याच्या तिजोरीत हवा तेवढा पैसा नाही. त्यामुळे महसूल वाढवून वनक्षेत्र वाढविण्यासाठी टॅक्‍सरूपात आलेल्या पैशांचा उपयोग करता येईल. प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येत आहे. प्रादेशिक परिवहन विभागामार्फत वसुली करण्यात येईल.

वन कायद्याने मांडलेला हा प्रस्ताव आपल्याला योग्य वाटतो का?

फिटनेस'बाबत अद्याप अनास्थाच!

पोलिस महासंचालक ः "फिट' संख्या दहा टक्के वाढविणार

राज्यातील "फिट' पोलिसांची संख्या यंदा दहा टक्‍क्‍यांनी वाढविण्याचा निर्णय पोलिस महासंचालक अनामी रॉय यांनी घेतला असला, तरी पुणे पोलिसांमध्ये अद्याप त्याबाबत अनुत्सुकताच आहे. सहा हजार पोलिसांपैकी अवघे तेराशे जणच दरमहा 250 रुपये "फिटनेस' भत्ता घेत आहेत.

तीस वर्षांवरील पोलिसांनी तंदुरुस्ती राखावी, यासाठी राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी त्यांच्यासाठी खास प्रोत्साहनपर योजना आखली. त्यानुसार त्यांना दरमहा 250 रुपये भत्ता देण्यात येतो. पोलिस कर्मचारी व फौजदार ते निरीक्षक दर्जाच्या अधिकारी या योजनेत भाग घेऊ शकतात.

शहरात सुमारे साडेपाच हजार कर्मचारी व पाचशे अधिकारी आहेत. त्यातील 1265 कर्मचारी व 68 अधिकाऱ्यांना हा भत्ता मिळत आहे. उर्वरित पोलिसांनी हा भत्ता घेण्यास अनुत्सुकता दर्शविली आहे. केवळ पुण्यातच नव्हे, तर राज्यात सर्वत्र "असाच' प्रतिसाद या योजनेला मिळत आहे. त्यामुळे महासंचालक रॉय यांनी या योजनेत यंदा विशेष लक्ष घातले आहे. प्रत्येक आयुक्तालय अथवा अधीक्षक कार्यालयाने त्यांच्याकडे गेल्या वर्षी भत्ता घेतलेल्या पोलिसांच्या संख्येत यंदा किमान दहा टक्‍क्‍यांनी वाढ करावी, असे परिपत्रक काढले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी संबंधित प्रमुखांनी विशेष लक्ष द्यावे, असेही त्यात म्हटले आहे.

मुळातच पोलिसांच्या ठायी शारीरिक तंदुरुस्तीबाबत इच्छाशक्तीचा अभाव असेल, तर भत्ता वाढवूनही त्यात काही फरक पडेल असे वाटत नाही. त्यामुळे भत्ता वाढवून सरकारने बोजा वाढविण्याऐवजी सक्ती करावी... आपल्याला काय वाटते याविषयी..मग आवश्‍य लिहा..

आदिवासी बालविवाह रोखण्यास सरकारचा पुढाकार

50 लाखांची तरतूदः जोडप्यांना दहा हजार रुपयांची
मदतआदिवासी समाजातील बालविवाह पद्धतीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने यंदा सुमारे पन्नास लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या "अनुसूचित जमाती कन्यादान योजने'अंतर्गत घोडेगाव प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रासाठी सुमारे पाचशे विवाहांना मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील या योजनेसाठी पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली व नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्थांनाही दहा हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

""अनुसूचित जमातींमध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात; त्यामुळे बालविवाह प्रतिबंधक व हुंडा प्रतिबंधक कायद्याबाबत या समाजात जागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारची ही योजना फायदेशीर आहे. मात्र, तिला योग्य प्रतिसाद मिळत नाही. आदिवासी समाजात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रकल्प कार्यालयातर्फे विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे.

आदिवासी समाजातील बालविवाह पद्धतीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने उचललेली पावले निश्‍चितच कौतुकास्पद आहेत. या योजनेला उशीरा आलेले शहाणपण असे म्हणता येईल. पण, योजनेची अंमलबजावणी प्रत्यक्षात किती होते, हेही पाहायला हवे. तसे झाल्यास आदिवासींमधील अनेक अनिष्ट रुढीपरंपरांना छेद जावून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.