व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>
Showing posts with label cultural. Show all posts
Showing posts with label cultural. Show all posts

आदिवासी बालविवाह रोखण्यास सरकारचा पुढाकार

50 लाखांची तरतूदः जोडप्यांना दहा हजार रुपयांची
मदतआदिवासी समाजातील बालविवाह पद्धतीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने यंदा सुमारे पन्नास लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या "अनुसूचित जमाती कन्यादान योजने'अंतर्गत घोडेगाव प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रासाठी सुमारे पाचशे विवाहांना मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील या योजनेसाठी पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली व नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्थांनाही दहा हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

""अनुसूचित जमातींमध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात; त्यामुळे बालविवाह प्रतिबंधक व हुंडा प्रतिबंधक कायद्याबाबत या समाजात जागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारची ही योजना फायदेशीर आहे. मात्र, तिला योग्य प्रतिसाद मिळत नाही. आदिवासी समाजात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रकल्प कार्यालयातर्फे विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे.

आदिवासी समाजातील बालविवाह पद्धतीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने उचललेली पावले निश्‍चितच कौतुकास्पद आहेत. या योजनेला उशीरा आलेले शहाणपण असे म्हणता येईल. पण, योजनेची अंमलबजावणी प्रत्यक्षात किती होते, हेही पाहायला हवे. तसे झाल्यास आदिवासींमधील अनेक अनिष्ट रुढीपरंपरांना छेद जावून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.

पेशवाईच्या स्मृती जपणाऱ्याशनिवारवाड्याची दयनीय अवस्था





हिंदुस्थानच्या राजकारणात दरारा निर्माण करून अटकेपार मराठी साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या पेशवाईच्या स्मृती जपणारा शनिवारवाडा सध्या दयनीय अवस्थेत आहे. पुण्याचे भूषण म्हणून गौरविल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूची अवशेषांची नियमित आणि नियोजित देखभाल नसल्यामुळे रया गेली आहे.
वाड्याचा मुख्य दिल्ली दरवाजा, तटबंदी, बुरूज, आतील विविध वास्तूंची जोती, कारंज्याचे अवशेष पाहता येतात. या अवशेषांची माहिती देणारे फलकही पूर्णपणे वाचता न येण्याच्या स्थितीत आहेत. मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर दरवाजावरचे लाकडी छत जाळ्या जळमटांनी भरले आहे. भिंतींवर असणारे गणपती आणि विष्णू या देवतांची चित्रे येत्या काही काळात ओळखू येणार नाहीत एवढे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. आतील वास्तूंची जोतीही काळवंडली आहे. वाड्याचे मुख्य आकर्षण असणारी कारंजी अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. कारंज्यांच्या हौदात साठलेले अस्वच्छ पाणी, तुटलेले लाकडी कठडे असे चित्र सर्वत्रच आहे.

मुख्य दरवाजा वगळता इतर साऱ्याच ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, कागद, अन्नपदार्थ याशिवाय नारायण दरवाजा आणि मस्तानी दरवाजा या ठिकाणी लोकांनी केलेल्या अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरली आहे. वाड्याच्या दक्षिण तटाचे काही काम झाले असले, तरी पावसाळ्यातील पाणी झिरपून तेथे आलेली ओल कायम आहे. वाड्याच्या पूर्व आणि पश्‍चिम बाजूचे तट आणि बुरूजही जीर्ण अवस्थेत आहेत.

पुरातत्त्व विभाग म्हणते.
शनिवारवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात आहे. नगारखान्याचा छज्जा, वाड्यातील पाण्याची पारंपरिक व्यवस्था, कारंजी यांची कामे सुरू असून, निधीच्या उपलब्धतेनुसार ती पूर्ण होणार असल्याचे केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या पुणे विभागाचे कॉन्झर्वेशन असिस्टंट बी. बी. जंगले यांनी सांगितले. ""वाड्यात नियमितपणे सफाईसाठी पाच कामगार आहेत. मात्र, भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असल्याने कायमस्वरूपी स्वच्छता राखण्यासाठी त्यांनीही सहकार्य करायला हवे,'' असेही ते म्हणाले.
पुरातत्व खात्याची पर्यटकांकडून असलेली सहकार्याची अपेक्षा रास्त असली, तरी सफाई कामगारांकडून नियमितपणे वाड्यातील स्वच्छता होते की नाही, याची दखल विभागाकडून घेतली जाते का, हे मात्र कळलेले नाही. त्यामुळे केवळ पर्यटकांच्या माथी खापर पोडणे योग्य नाही. शिवाय सफाईचा मुद्दा तात्पुरता बाजूला ठेवला, तरी कारंजी आणि इतर वास्तूच्या डागडुजीचा वेगही तपासणे आवश्‍यक आहे. वाडयाची दयनीय अवस्था होईपर्यंत हे खाते काय करत होते? हा ही मोठा प्रश्‍न आहे.

हॅलो.....टीन एजर्स...!

दहावीची शाळा सुरू होते, आता फुलपॅंट घालून शाळेत जायचं, म्हणून मुलांना आनंद होतो. मुलगी असेल तर स्वत:कडे जरा जास्तच लक्ष देऊ लागते. एखादीला वाटतं, आपण खूप मोठं व्हावं, आयुष्यात खूप काही मिळवावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. टीन एजमधलं जगच वेगळं असतं.

लहान असताना वाटतं, कधी मोठे होणारं? प्रत्येक गोष्ट शिकत ती आपणच करावी असं वाटतं राहतं. बघता-बघता जाणतेपणाचा टप्पा येतो, आणि वाटू लागतं, अरे, आपण मोठे झालो, वयात आलो.....मनातून खूप आनंद होत असतो. आपण करतो तेच बरोबर आहे, लोकांनी आता आपल्याला शिकवू नये असं वाटतं. आठवी-नववी किंवा अगदी दहावीत असतो आपण.....

या टीन एजमध्ये. मोठ्यांना वाटतं, हुरूप आहेत. पण तसं म्हणणंही तेव्हा नको वाटतं. घरातल्यांबरोबर रमण्याऐवजी मित्र-मैत्रिणीत जास्त रमायला होतं. क्‍लासमध्ये गेल्यानंतर एखादीला वाटतं, अरे तो आपला मित्र होईल का? त्याच्याशी बोलावं का? पण कधी शिक्षकांची तर कधी आई-वडिलांची भीती वाटते. मग, बरेचदा सगळ्या भावना मनात राहतात.अलीकडं असं म्हटलं जातं, की या वयात मुला-मुलींना खूप जपावं लागतं. आई-वडिलांनी त्यांच्याशी मित्र-मैत्रिणीसारखं राहावं लागतं. त्यांना घरात मोकळेपणा द्यावा लागतो आणि हो! हे सगळं देताना आई-वडील असण्याचं कर्तव्यही पार पाडावंच लागतं. पण आजच्या मुला-मुलींना नेमकं उलटं वाटतं. शाळा किंवा कॉलेज, क्‍लास, इतर ऍक्‍टिव्हिटी सगळं करायचं तर गाडी, मोबाईलसारखी साधनं हवीत.

टीन एज म्हणजे आयुष्यातील महत्त्वाचं वळणच आहे. लहानपण संपलेलं असतं. मोठेपण येत असलं तरी जबाबदारीची फारशी जाणीव नसते. मागं एका जाहिरातीत असं म्हटलं होतं, "बीत गये दीन बचपन के आये नही दीन शादीके...

'अशाच वयाच्या वेगळ्या टप्प्यातल्या मुलींची आजची स्थिती काय आहे, हे जाणून घेणार आहे, "सकाळ'चं "तनिष्का' हे मासिक. तुम्हाला या टीन एज बद्दल किंवा टीन एज मधल्या मुलींना जपण्याबद्दल काय वाटतं? तुम्हीही काही अनुभवलं असेल, अनुभवत असाल, किंवा अनुभवणार असाल....हे अनुभवणं शेअर करा आमच्याशी...अन्‌ ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी येथे क्‍लिक करा

परदेशी पाहुणे सात वर्षांत दुपटीने वाढले

पुण्यात येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या संख्येत गेल्या सात वर्षांत दुपटीने वाढ झाली आहे. त्यात शिक्षणाबरोबरच आता सेवा व उद्योग क्षेत्रातील व्यक्तींचाही सहभाग वाढता असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे.

परदेशातून पुण्यात येणाऱ्यांमध्ये परंपरेने विद्यार्थ्यांचा सर्वाधिक भरणा आहे. मात्र, त्याखालोखाल सेवा व उद्योग क्षेत्रांतील व्यक्ती वाढत्या संख्येने शहरात येत आहेत. त्यानंतर पर्यटन किंवा अन्य प्रकारच्या कारणांसाठी परदेशी नागरिकांचे शहरात येतात. सात वर्षांपूर्वी शहरात दोन हजार 578 परदेशी व्यक्ती आल्याची पोलिसांकडील नोंद आहे. मात्र, आता ही संख्या या वर्षी सहा हजारपर्यंत पोचली आहे. मात्र, प्रत्यक्षात ही संख्या त्याहून अधिक असल्याचा अंदाज आहे.

2005 मध्ये पाच हजार 525 परदेशी व्यक्ती आल्या होत्या. त्यात तीन हजार 784 विद्यार्थी, 283 पर्यटक व एक हजार 458 इतर कारणांसाठी आलेल्या व्यक्ती होत्या. इतर कारणांसाठी आलेल्यांत प्रामुख्याने सेवा व उद्योग क्षेत्रांतील व्यक्तींचा समावेश आहे. गेल्या वर्षीही सुमारे 1200 परदेशी नागरिक व्यावसायिक कारणासाठी शहरात आल्या होत्या. सेवा व उद्योग क्षेत्रातील व्यक्ती प्रामुख्याने "शॉर्ट टूर'वर येतात. त्यामुळे त्यांची नोंदणी पोलिसांकडे होतेच असे नाही. मात्र, अशा व्यक्तींची संख्या 60 टक्‍क्‍यांहून अधिक असून, ती वाढत असल्याचे निरीक्षण पोलिस आयुक्त जयंत उमराणीकर यांनी नोंदविले.

शहरात 15 दिवसांहून अधिक कालावधीसाठी येणाऱ्या परदेशातील नागरिकांना पोलिसांकडे नोंदणी करण्याचा नियम आहे. सुमारे 90 टक्के परदेशी नागरिकांची पोलिसांकडे नोंदणी होते, असा दावा पोलिस आयुक्त जयंत उमराणीकर यांनी केला.

परदेशी नागरिकांचे पुण्यामध्ये येण्याचे वाढते प्रमाण शहराच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनाच्यादृष्टीने योग्य वाटते का? आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा...!