
मुलांना खड्ड्यातील पाण्यात का पोहावे लागते....?

पालिका उत्तर देईल काय?नागरिकांच्या पैशाच्या जोरावर पालिकेने लाखो रुपये खर्च करून मुलांसाठी जलतरण तलाव उभारला असेल आणि तो अजूनही मुलांना खुला करून मिळाला नसेल, तर मुलांनी पोहायचे कोठे? याचे उत्तर आज येरवडा येथे जलवाहिनी फुटून खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहोणाऱ्या मुलांनी दिले... पण याच परिसरात जलतरण तलाव असूनही मुलांना या खड्ड्यात का पोहावे लागते, याचे उत्तर पालिकेला देता देईल का? विश्रांतवाडी येथील जलतरण तलावाचे उद्घाटन होऊन वर्ष उलटले तरीही अजूनही तो बंदच आहे.
लोहगाव विमानतळ रस्त्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयासमोर काम सुरू आहे. आज दुपारी एकच्या सुमारास रस्त्यावरील खड्ड्यात जलवाहिनी फुटल्याने सुमारे दहा फूट उंचीचे कारंजे उडायला सुरवात झाली. नुकतीच शाळा सुटली होती. उन्हेही तापली होती. शाळेतील मुलांना या कारंज्यात सूर मारण्याची लहर आली अन् एकापाठोपाठ असंख्य शाळकरी व परिसरातील मुले या खड्ड्यात उतरली. मुलांनी चिंब भिजण्याचा आनंद लुटला. मुलांचे पाण्यातील खेळणे पाहून, रस्त्याने ये-जा करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरही हास्य उमटले.
विश्रांतवाडी रस्त्यावर जुना प्रभाग क्रमांक 9 गोल्फ क्लब येथे लाखो रुपये खर्च करून पालिकेने अत्याधुनिक व्यायामशाळा, जलतरण तलाव व योगा हॉल उभारला आहे. 8 डिसेंबर 2006 रोजी पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी व आमदार चंद्रकांत छाजेड यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले, असे येथे उभारण्यात आलेल्या कोनशिलेवर म्हटले आहे. उद्घाटन झाले म्हणजे नेत्यांची जबाबदारी संपते, हे एक वेळ नागरिक ऐकतील; पण पालिकेनेच पुढाकार घेऊन इमारत उभारली म्हणजे नागरिक तिचा लाभ घेत आहेत, असे पालिका जणू गृहीतच धरते. हा जलतरण तलाव कोणी तरी तात्पुरता सुरू केला होता; पण तो पुन्हा बंद झाला. जलतरण तलाव अजूनही पालिकेने ताब्यात घेतला नसल्याचेही समजते. हा तलाव सुरू असता तर रस्त्यातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहोण्याची वेळ या मुलांवर आलीच नसती.
0 comments:
Post a Comment