व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>
Showing posts with label PMT. Show all posts
Showing posts with label PMT. Show all posts

पीएमपीच्या भाड्यात प्रत्येक टप्प्याला रुपयाने वाढ

पीएमपी गाड्यांच्या पहिल्या दोन किलोमीटर प्रवासासाठी भाड्यात वाढ करण्यात येणार नाही. त्यानंतर प्रत्येक टप्प्याला एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी येत्या रविवारपासून (ता. २१) करण्यात येणार आहे. सध्या पहिल्या दोन किलोमीटर प्रवासासाठी तीन रुपये भाडे आकारण्यात येते. ते कायम ठेवण्यात आले आहे. चार किलोमीटरसाठी पाच रुपयांऐवजी सहा रुपये, सहा किलोमीटरसाठी सहा रुपयांऐवजी सात रुपये भाडे आकारण्यात येईल. १८ ते २६ किलोमीटरदरम्यान सध्याच्या भाडेदरात दोन रुपयांनी, तर २६ ते ३० किलोमीटरदरम्यान सध्याच्या भाडेदरात तीन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ३० ते ३४ किलोमीटरदरम्यान सध्याच्या भाडेदरात चार रुपयांनी, तर ३४ किलोमीटरदरम्यान सध्याच्या भाडेदरात पाच रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

डिझेलची दरवाढ झाल्याने, जुलैमध्ये प्रशासनाने भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. प्रत्येक टप्प्यासाठी एक रुपया भाडेवाढ करावी, असे पीएमपी प्रशासनाने प्रस्तावित केले होते. एक दिवसीय सवलतीचा दोन्ही महापालिका हद्दीबाहेरील पासचा दर सध्या ४५ रुपये असून, तो ६० रुपये करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

त्या व्यतिरिक्त विविध अटी पीएमपीला घालण्यात आल्या आहेत.'' देखभाल दुरुस्तीचे नियोजन नीट करण्यात यावे, कमी उत्पन्नाच्या मार्गाचे सर्वेक्षण करून तेथे नवीन वेळापत्रक तयार करावे, सेवकांच्या कंत्राटी पद्धती व नियुक्‍त्यांवर निर्बंध घालावेत, चालक व वाहक यांच्या व्यतिरिक्त अन्य सेवकांच्या नियुक्‍त्या करण्यात येऊ नयेत, अतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करावी, बसमार्गांचे फेरनियोजन करावे, दरवाढीनंतर तीन महिन्यांनी आर्थिक परिस्थितीचा आढावा प्राधिकरणाला सादर करावा, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

प्रवासी भाडेवाढीस मान्यता देताना प्राधिकरणाने पीएमटीला काही अटी घातल्या आहेत. त्यातील भाडेवाढीची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल. मात्र, प्रवाशांच्या हितासाठीच्या या अटींना फाटा मिळू शकतो. आता या अटींची पूर्तता होतेय की नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी केवळ प्रवाशांचीच आहे. आपल्या काय वाटते?

प्रवासी बसच्या प्रतीक्षेत;"एमडीं'ना मात्र "होंडा सिटी'!

पीएमपीचा कारभारः कामगार वर्गातही नाराजी

पुणेकरांचे बसअभावी हाल होत असताना, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) व्यवस्थापकीय संचालकांच्या सेवेत आज "होंडा सिटी' ही आलिशान गाडी दाखल झाली. तोट्यात असलेल्या पीएमटीला नफ्यात आणून प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात आली; परंतु संचालकांच्या मनमौजी कारभाराबद्दल कामगारांकडून मात्र संताप व्यक्त केला जात आहे.

पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना 45 हजार रुपये वाहनभत्ता आणि 25 हजार रुपये मानधन देण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यावरून उठलेले वादळ शमत नाही, तोच पीएमपीच्या व्यवस्थापकांच्या सेवेत दाखल होत असलेल्या या गाडीची चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकारचा प्रवासी कर थकविणाऱ्या पीएमपीने मात्र "साहेबां'साठी लाखो रुपयांची "कॅश' मोजून खास ही गाडी खरेदी केली आहे. साहेबांची ही "सवारी' दाखल होणार असल्यामुळे कामगारांचे लक्ष लागले होते, तर दुसरीकडे मुख्य कार्यालयापासून काही अंतरावरच असलेल्या बसथांब्यावर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांचीही गर्दी होती.

प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमटी आणि पीसीएमटीचे विलीनीकरण करून कंपनी स्थापन करण्यात आली. त्यास एक वर्ष होत आले. अद्यापही प्रवाशांना मिळणाऱ्या कोणत्याही सुविधेत वाढ झालेली नाही. कंपनी स्थापन झाल्यानंतर करण्यात आलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. बस कमी पडत असल्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना कसरत करावी लागते, असे चित्र एकीकडे दिसत असताना दुसरीकडे मात्र अधिकारी स्वत:च्या सेवेसाठी आलिशान गाड्या घेत आहे, अशी चर्चा कामगारांमध्ये दबक्‍या आवाज सुरू होती.