व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

माणिकडोह ः बिबट्यांचे "दयामरण केंद्र'?

निसर्गाकडे कधी? दोन-तीन वर्षे लांबलेली सक्तीची "कैद' भोगण्याची वेळ


खूप लांबत चाललेले निर्णय आणि हतबल प्रशासन, त्रस्त झालेले नागरिक आणि सुस्त होत चाललेले बिबटे... जुन्नरजवळच्या माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात याहून फारशी वेगळी स्थिती नाही. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला शक्‍यतो आठवडाभरात पुन्हा जंगलात अर्थात नैसर्गिक वातावरणात सोडून द्यावे, अशी अपेक्षा आहे; पण अनेक पद्धतींच्या अडचणींमुळे या केंद्रात तीन-तीन वर्षांपासून हे बिबटे "कैद' आहेत.


माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात सध्या 22 बिबटे "आश्रित' आहेत. राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना पकडण्यात आले आहे. कुणाला नागरी वसाहतींमधून, तर कुणाला गावकुसाबाहेरच्या वस्तीवर पिंजऱ्यात अडकविण्यात आले आहे. गरज पडली तर औषधोपचार, तपासणी, माहिती संकलन आणि तात्पुरत्या निवाऱ्यासाठी या बिबट्यांना माणिकडोह केंद्रात आणले जाते; पण त्यांना पुन्हा जंगलात सोडण्याबाबत कसलेच आदेश नसल्यामुळे या बिबट्यांना सक्तीची कैद भोगावी लागत आहे.


या 22 बिबट्यांपैकी पुणे जिल्ह्यात पकडण्यात आलेली एक मादी, 15 मे 2003 रोजी केंद्रात दाखल झाली. ही येथील सर्वांत जुनी. त्याशिवाय मार्च 2005 ते एप्रिल 2006 या काळात नाशिकहून अकरा, दोन ऑगस्ट 2004 या एकाच दिवशी बोरिवलीहून नऊ, तर धुळे प्रादेशिक विभागातूनही एक मादी 26 डिसेंबर 2004 रोजी या केंद्रात दाखल झाली. एकूण संख्येपैकी सध्या 17 माद्या, तर 5 नर या केंद्रात आहेत.


प्राणी म्हणून बिबट्यांची नैसर्गिक जडणघडण पिंजऱ्यात राहण्याने बिघडत असते. तीन-तीन वर्षे पिंजऱ्यात राहिल्याने, पुन्हा जंगलात परत जाणे आणि जिवंत राहणे त्यांना शक्‍य आहे का, हाच मोठा प्रश्‍न आहे.


उपवनसंरक्षक एस. बी. शेळके यांनीही ही गोष्ट मान्य केली. निवारा केंद्रातील बिबट्यांना पुन्हा जंगलात सोडण्यासाठी अनेकदा पाठपुरावा केला आहे; त्याला वरिष्ठांकडून संमती मिळालेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली. बिबट्यांना जंगलात सोडण्याबाबत प्रशासनही हतबल आहे.


बिबट्यांचा वावर मानवी वस्तीत वाढत आहे. पुरेसे भक्ष्य मिळेल अशा वनक्षेत्राची चणचण आहेच. बिबट्यांना जंगलात सोडले तरी ते मानवी वस्तीत येणार नाहीत, असे कोणीही सांगू शकत नाही. आठवडाभर पिंजऱ्यात राहणे एक वेळ ठीक आहे; पण अनेक अडचणींमुळे बिबट्यांना जंगलात सोडता येत नसेल, तर "निवारा केंद्र' या नावाखाली सरकारी पाहुणचार घेणाऱ्या या बिबट्यांसाठी हे वेगळ्या पद्धतीचे आणि अघोषित दयामरणच.

0 comments:

Post a Comment