व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

प्रेमळ आजींना देवानेही बनविले शेजारी

सकाळी जरा लवकरच, अवेळी फोन वाजला.. अन्‌ मन जरा साशंकतेने घेरले... फोन ही सध्या सर्वसामान्य बाब झाली असली तरी असा अवेळी येणारा फोन मनामध्ये लगेचच शंकेची पाल चुकचुकून जातो. फोन घेतला.. पूर्वी सोसायटीत शेजारी राहणाऱ्या एक अत्यंत प्रेमळ काकू... भागवत काकू (सुनीता पंडित भागवत) स्वर्गवासी झाल्याचा फोन होता. तशा वयाने सत्तरीच्या पुढच्या असणाऱ्या; पण तब्येतीने अगदी चांगल्या असल्याने त्यांच्या अचानक जाण्याचे खूप दुःख झाले... आजूबाजूच्या सर्वांच्याच हृदयात शेजारधर्माने प्रेमाचे स्थान मिळवलेल्या काकूंना त्यांच्या स्वतःच्या हृदयाने मात्र जीवनाच्या सायंकाळी अचानक धोका दिला होता. "शेजारधर्म म्हणजे काय' याचे अगदी कुणीही श्रीगणेशापासूनचे धडे ज्यांच्याकडून गिरवावेत अशा या भागवत काकू... अत्यंत प्रेमळ... गोड बोलणे... कधी कुणालाही दुखावणार नाहीत...! या जगात अवतीभवती खूप लोकं असतात; पण खऱ्या भेटीगाठी फारच थोड्यांशी पडतात... याचे मूर्तिमंत उदाहरणच जणू.. अगदी साध्या.

त्या गेल्याचा फोन ऐकला अन्‌ मन भूतकाळात गेले... काकूंचा बोलका स्वभाव...! प्रेमाने त्या व्यक्तीची अन्‌ घरातल्या सर्वांची चौकशी त्या आवर्जून करायच्या. म्हणूनच की काय, लांब राहायला गेल्यावरही मला त्या सोसायटीच्या जवळपास गेले तरी त्यांना भेटायची आवर्जून ओढ लागलेली असायची....! खिडकीतून लांबवर आपल्या प्रेमळ कटाक्षाने भागवत काकू जणू व्यक्तीच्या काळजाचा अचूक ठाव घ्यायच्या... चेहऱ्याचे जणू वाचनच त्या करायच्या..! आपल्या मनातील भाव मनकवडेपणाने ओळखून त्यांचा प्रश्‍न असायचा..! कोणीही येणारा-जाणारा मग मन मोकळे करणार नाही, असे होणारच नाही. मग नुसते मन मोकळे होणे नसे; तर छोट्या-मोठ्या अडचणींवर सल्लाही तयार असायचा..! कुणाच्याही मनावरचा भार, मोकळेपणाने त्याचे बोलणे ऐकून हलका करून नकळतपणे त्या व्यक्तीला काळजीमधून मुक्त करायच्या. दुसऱ्याच्या आनंदाचे कौतुकही इतके असायचे, की कुणीही त्यांना आपला अगदी छोट्यातला छोटा आनंद सांगितल्यावाचून राहत नसे. अरे, बोलून तर सर्वच जण दुःखात सहभागी होतात; पण दुसऱ्याच्या आनंदात आनंद मनापासून मानणाऱ्या भागवत काकूंसारख्या विरळाच म्हणाव्या लागतील. अन्‌ या साऱ्या गोष्टी व्हायच्या अगदी सहजपणे. असा हा शेजार नक्कीच अगदी जवळच्या एखाद्या नातेवाइकासारखा वाटायचा. आमच्या दोघींच्या वयामध्ये तसे बरेच अंतर होते; परंतु त्या मला कायम एखाद्या जवळच्या मैत्रिणीप्रमाणेच वाटायच्या. भागवत काकूंबरोबर "शेअर' केलेल्या छोट्या-छोट्या आनंदाच्या क्षणांचा मागोवा माझ्या मनाने लगेचच घेतला. कधी संकटसमयी धीर दिलेलाही स्मरल्यावाचून राहिला नाही. तोंडामध्ये जसा बोलण्यात गोडवा; त्याप्रमाणेच सुगरणही असलेल्या भागवत काकू घरी येणाऱ्याच्या हातावर काही ठेवल्यावाचून राहत नसत. यासाठी वेगवेगळ्या वड्या ही तर त्यांची खासियतच मानली जायची.

गृहलक्ष्मी म्हणजे काय ते काकूंकडे बोट दाखवून सांगावे. सोसायटीतील कुणासाठीही केळवण, डोहाळजेवण, माहेरवाशिणीला निरोप समारंभ त्या आवर्जून करायच्या. "जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला..!' याची अनुभूती आली. ओळखीच्या प्रत्येक अंतःकरणाला चुटपुट लावणाऱ्या.. शेजारधर्माने प्रिय झालेल्या... तसेच अनेकांना आपल्या प्रेमळ वागण्या-बोलण्याने आपलेसे केलेल्या भागवत काकू देवाच्या शेजारी कायमस्वरूपी वास्तव्यास गेल्या... भागवत काकूंसारखे शेजारी बांधतात शेजाऱ्यांच्या मनात कायमस्वरूपी प्रेमाचे घर..!

सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या "ई- सकाळ'च्या वाचक कल्पना धर्माधिकारी यांनी लिहिलेला लेख आम्ही या "ब्लॉगवर' देत आहोत. "सकाळ'च्या "पुणे प्रतिबिंब' पुरवणीमध्ये शनिवारी प्रसिद्ध झालेला त्यांचा लेख त्यांना "ई- सकाळ'वर पाहता आला नाही. त्यामुळे त्यांच्या आग्रहास्तव आम्ही ब्लॉगच्या माध्यमातून देत आहोत. आपल्याही अशा समस्या असतील, तर आम्हाला नक्की कळवा...

4 comments:

 1. Anonymous said...
   

  Lekh khoopach chchan aahe. Kalpana Dharmadhikari yaani US madhech rahun aase chchan likhaN karave.

 2. Mamta said...
   

  Bhagwat Kaku yaanche wyaktimatwa doLya samor ubhe rahate. Changla shejari milNe hi khoop nashibachi baab aahe. Sou Kalpana Dharmadhikari yanni sarva changlya shejaryanche manogatach ithe mandle aahe. Mala aasha aahe ki tyanna US madhe paN aasech shejari bhetatil.

 3. Abhijeet said...
   

  Manuskiche and kritatneche changle udaran.

 4. Anonymous said...
   

  dar band chya sadhyachya jamanyat shejari ha khar tar motha paharekari v sobati asato.... pan swata madhye magan asalelya lokana shejaryache mahatwa kalat nahi....

Post a Comment