व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>
Showing posts with label Raj Thakre. Show all posts
Showing posts with label Raj Thakre. Show all posts

रामविलास पासवान यांचा सल्ला योग्य म्हणावा का?

एकीकडे राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन सर्व नेते मंडळी, शासन आणि पोलिसांवर टीका करत असताना दुसरीकडे दिल्लीमध्ये मात्र बिहार आणि उत्तर भारतीय नेत्यांनी राज ठाकरेंवर तोफ डागली. रामविलास पासवान यांनी राज यांच्याविरुद्धच्या मागण्यांचा पुनरुच्चार केला. ठाकरे यांनी भावना भडकविणारे राजकारण करण्यापेक्षा विकासाचे राजकारण करावे, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या आधारे त्यांच्याविरुद्ध कारवाई, राहुल राज मृत्यूप्रकारणी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधिशांकडून चौकशी आणि न्यायालयाच्या अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करून ठाकरे यांना झारखंड पोलिसांच्या ताब्यात देणे, या मागण्या कायम असल्याचेही त्यांनी सांगितले.

काही उत्तर भारतीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या विरोधातही भूमिका घेतली. तर,राज यांच्यावरकरावाई करण्याबाबत राज्य सरकारने अक्षम्य ढिलाई दाखविली आहे, अशा शब्दात पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी महाराष्ट्र सरकारचा समाचार घेतला.

उत्तर भारतीय नेत्यांनी राज ठाकरे आणि महाराष्ट्राच्या विरोधात दंड थोपटले असले, तरी अद्यापही महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये एकवाक्‍यता दिसत नाही. राज्यातील नेते संघटित झाल्यास उत्तर भारतीयांना महाराष्ट्राच्या विरोधात बोलण्यावर वचक बसेल. आपल्याला काय वाटते?

पुन्हा एकदा "राज'कीय वादळ?

राहुल राज या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबई पोलिसांची विशेष परवानगी घेऊन वांद्रयात पत्रकार परिषद घेऊन शासन, पोलिस आणि राजकीय नेत्यांना टीकेचे लक्ष्य केले. सरकार बदलत असतात. आज तुमची वेळ आहे. उद्या माझी येईल, असा धमकीवजा इशारा त्यांनी अप्रत्यक्षरीत्या आर. आर. पाटील आणि विलासराव देशमुख यांना दिला. संवेदनशील परिस्थितीत नेत्यांनी सुरक्षा वाढविली जात असताना, माझी मात्र सुरक्षा का काढून घेण्यात आली, असा खडा सवालही त्यांनी या वेळी विचारला. त्याचबरोबर त्यांनी छट पूजा, लालू प्रसाद यादव यांबाबत बिनधास्त मतं नोंदविली.

भाषणावर बंदी असताना राज ठाकरे यांना पत्रकार परिषदेला परवानगी देण्यात आली. पत्रकार परिषदेत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर काही कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यावर राज यांनी, टाळ्या काय वाजवताय, ही पत्रकार परिषद आहे, जाहीर सभा नाही, अशी कानउघाडणी केली.

राज यांनी पत्रकार परिषदेत अनेक संवेदनशील मुद्‌द्‌याला हात घातला. सध्याची परिस्थिती लक्षात घेता राज यांना पत्रकार परिषद घेण्यास परवानगी देणे योग्य आहे का? या परिषदेमुळे वातावरण पुन्हा गढूळ होण्याची शक्‍यता पोलिसांना वाटली नाही का?

बच्चन यांच्या माफीपूवर्वी घडले पडद्यामागचे नाट्य

जया बच्चन यांच्या वादग्रस्त वक्‍तव्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी जाहीरपणे मागितलेली माफी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मान्य केली असली तरीही गेल्या ४८ तासांत पडद्यामागे वेगळे नाट्य घडल्याची चर्चा आहे.

जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर मनसेने बच्चन कुटुंबीयांवर बहिष्कार टाकल्यानंतर प्रचंड वादळ उठले. बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर महाराष्ट्राची व मुंबईची जाहीर माफी मागितली. बच्चन यांनी ब्लॉगवर मागितलेली माफी पुरेशी ठरेल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत होती; पण राज ठाकरे यांना जाहीर माफी हवी होती. जर मराठी माणसाचा जाहीर अपमान होत असेल तर माफीसुद्धा जाहीर हवी, ही त्यांची भूमिका होती. राज ठाकरे यांच्या ठाम भूमिकेमुळे अमिताभ बच्चनही पेचात पडले. त्यांनी थेट शिवसेनाप्रमुखांना साकडे घालण्याची तयारी केली. मातोश्री निवासस्थानी शिवसेनाप्रमुखांची भेट घेऊन त्यांनी आता मार्ग काढावा, अशी कळकळीची विनंती बच्चन यांच्याकडून केली जाणार होती; पण सध्याच्या वातावरणात ही भेट योग्य ठरणार नाही, असा संदेश मातोश्रीवरून आल्यामुळे अमिताभ बच्चन मातोश्रीवर गेले नाहीत. फक्त बच्चन व शिवसेनाप्रमुखांचे दूरध्वनीवर बोलणे झाले. या वेळी बच्चन यांनी त्यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर बच्चन यांची पत्रकार परिषद झाली, असे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

बच्चन यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर राज ठाकरे आपली भूमिका उद्या मांडणार असल्याचे तातडीचे निरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रसिद्धिमाध्यमांना धाडण्यात आले. पण राज ठाकरे यांच्यावर भाषणबंदी असल्यामुळे ते आपली भूमिका कशी मांडणार याबाबतही खुद्द मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये साशंकता होती. अखेर राज ठाकरे यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी पोलिस आयुक्त हसन गफुर यांच्याकडे परवानगी मागितली. त्यानंतर आमदार बाळा नांदगावकर यांच्या मध्यस्थीने राज ठाकरे व उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्याशीही चर्चा झाली व त्यामध्ये राजकीय तोडगा निघाल्याचे सांगण्यात येते. पण सकाळी आयुक्त गफुर यांनी राज ठाकरे यांना परवानगी नाकारली. कारण त्यांच्यावरील भाषणबंदी ही सहायक पोलिस आयुक्त यांच्या अधिकार क्षेत्रातील आहे, त्यामुळे त्यांच्याकडेच परवानगी मागावी, असे सांगितले. त्यानंतर राज ठाकरे यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त भांगे यांच्याकडे केवळ पत्रकार परिषदेसाठी लेखी परवानगी मागितली. त्यामुळे भांगे यांनी राज ठाकरे यांना पत्रकार परिषदेची परवानगी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. आर.आर. यांचाही फोन तत्पूर्वी गणपती व रमजानचे सण ध्यानात घेता व कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती ध्यानात घेता उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी आज सकाळी राज ठाकरे यांना फोन केला व पत्रकार परिषदेत आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करण्याची सूचना केल्याचे विश्‍वसनीयरीत्या समजते.

बच्चन कुटुंबियांना माफ केल्याची घोषणा करण्यासाठी राज ठाकरे यांनी एवढा अट्टाहास का केला? असा कोणता दबाव त्यांच्यावर आला असेल? या प्रकरणामागे नक्की काय झाले असेल.