व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>
Showing posts with label vehicle. Show all posts
Showing posts with label vehicle. Show all posts

येत्या वर्षभरात पुण्यात आणखी ३५ हजार मोटारी?

दुचाकी घ्यायची की मोटार, असा पर्याय टाटा कंपनीच्या एक लाख रुपयांच्या मोटारीमुळे ग्राहकांना मिळणार आहे. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाने (असोचेम) केलेल्या पाहणीत, दुचाकी वाहनांची २५ टक्के बाजारपेठ ही मोटार काबीज करेल, असे दिसून आले आहे. ....

पुण्यातील दुचाकींच्या एवढ्या ग्राहकांनी या मोटारीला पसंती दिल्यास वर्षभरात आणखी सुमारे ३५ हजार मोटारी शहरातील रस्त्यांवरून धावू लागतील.


जगातील वाहनउद्योगाचे लक्ष वेधून घेतलेल्या टाटा कंपनीच्या एक लाखाच्या मोटारीचे दर्शन गुरुवारी दिल्लीतील "ऑटो एक्‍स्पो' प्रदर्शनात झाले. टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे स्वप्न या मोटारीमुळे साकारले. देशातील मध्यम व कनिष्ठ मध्यम वर्गाच्या स्वत:च्या मोटारीची स्वप्नपूर्ती या मोटारीमुळे शक्‍य होईल. त्यामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात कसे असेल, या उत्सुकतेपोटी त्यांचेही डोळे या मोटारीकडे होते.

"टाटा मोटर्स'चे पुण्यातील वितरक बी. यू. भंडारी आणि पंडित ऑटोमोटिव्ह यांच्या शोरूममध्ये दिवाळीपासूनच या मोटारींची विचारपूस ग्राहकांकडून होत आहे. माध्यमांमधून या मोटारीची चर्चा होऊ लागल्यावर मोटारीची माहिती घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. उद्या प्रदर्शनात "दर्शन' देणारी ही मोटार विक्रीसाठी येत्या जूनपर्यंत उपलब्ध होईल, असे सांगण्यात येत आहे. या मोटारीची चाचणी गेल्या काही महिन्यांपासून पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग व कात्रज घाटात करण्यात आली. मात्र, मोटारीची ओळख गुलदस्तात ठेवण्यासाठी त्यावर आवरणे घालून चाचणी झाली. ६६० सीसी क्षमतेची ही मोटार प्रतिस्पर्धी कंपनीच्या आठशे सीसी मोटारीची बरोबरी करणारी आहे, असे सांगण्यात आले.

पुण्यातील वाहनांची संख्या १५ लाख, तर पिंपरी-चिंचवडमधील वाहनांची संख्या पाच लाखांवर पोचली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या वर्षभरात दीड लाख दुचाकी वाहनांची नोंद झाली. "असोचेम'च्या पाहणीनुसार, यातील २५ टक्के वाटा या मोटारीला मिळाल्यास वर्षभरात ३५ हजार मोटारी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये धावताना दिसतील. या मोटारीच्या माध्यमातून साकारणारे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही रक्कम जादा मोजावी लागल्यास त्याचीही तयारी पाहणीतील ९० टक्के जणांनी दाखविली आहे.

आता, प्रश्न फक्त इतकाच आहे, की आपले रस्ते इतक्या मोटारी सामावून घेण्याइतके सक्षम आहेत का...?
-- मनीष कांबळे