व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>
Showing posts with label steet child. Show all posts
Showing posts with label steet child. Show all posts

पुण्यातील "बालपण' - पाचशे मुले रोज रस्त्यावर

गोडगोजिऱ्या मुलांच्या सान्निध्यात बालदिन साजरा केला जात असताना पुण्यासारख्या शहरात रस्त्यावरच्या मुलांचा प्रश्‍न गांभीर्याने उभा ठाकला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.
आशाकिरण या सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून, शहरात चार ते १५ वयोगटातील पाचशे मुले दररोज रस्त्यावर असतात, हे वास्तव समोर आले आहे.

रस्त्यावर राहणाऱ्या चारशे मुलांच्या अभ्यासांतर्गत संस्थेने या मुलांचे प्रमाण, त्याचे स्वरूप, कारणे, वयोगट, लिंगभाव, स्थलांतर, शिक्षण, वर्तन, रोजचे उत्पन्न, व्यसने, सवयी, व्याधी आदी बाबींवर भर दिला आहे. त्यासाठी स्वारगेट, पुणे स्टेशन, महापालिका भवन, शिवाजीनगर, हडपसर, बिबवेवाडी, गुलटेकडी, डेक्कन, पर्वती, सारसबाग, भवानी पेठ अशा अकरा परिसरांतील मुलांची निवड केली.

या सर्वेक्षणानुसार चार ते १५ या वयोगटातील ५०० मुले दररोज पुण्यात रस्त्यांवर आढळून येतात. त्यापैकी ७२ टक्के मुले, तर २८ टक्के मुली असतात. विविध शहरांमध्ये स्थलांतरित होणाऱ्या मुलांचे प्रमाणही मोठे असून, एकूण मुलांपैकी भीक मागणाऱ्या मुलांचे प्रमाण ५५ टक्के आहे. रोज ५० ते तीनशे रुपयांचे उत्पन्न मिळविणाऱ्या मुलांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ५० टक्के आहे; तर २५० रुपये उत्पन्न मिळविणाऱ्या मुलांचे प्रमाण सर्वांत कमी शून्य पूर्णांक चार टक्के आहे. पैशांची बचत करणारी मुले केवळ २७ टक्के असून ५५ टक्के मुलांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. बचतीसाठी ते गल्ला, पुरचुंडी, दगड (खाली), कुटुंबीय इत्यादी पर्यायांचा वापर करतात. खाद्यपदार्थांवर खर्च करणाऱ्या मुलांचे प्रमाण ३० टक्के आहे. त्याव्यतिरिक्‍त खेळ, चित्रपट, व्यसने आदींवरही पैसे खर्च केले जातात.

व्यसनासाठी विविध पदार्थांचे सेवन केले जात असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. त्यामध्ये व्हाइटनर, दारू, सिगारेट- बिडी, गुटखा, तंबाखू, मशेरीचा समावेश असून सर्वाधिक ४४ टक्के मुले "व्हाइटनर'चे व्यसन करतात. त्याखालोखाल दारूचे व्यसन करतात.

शिक्षणाबाबत बहुतांश मुलांच्या ठायी उदासीनता आढळते. त्यामुळे ६२ टक्के मुले अशिक्षित, तर २९ टक्के अल्पशिक्षित आहेत. शिकण्याची इच्छा आहे का, असे विचारले तेव्हा ६३ टक्के मुलांनी राहण्याची व्यवस्था झाल्यासच शिक्षण घेण्यास होकार दिला. तर, २४ टक्के मुलांनी नकार दर्शविला. सहा टक्के मुलांनी मात्र मौन बाळगले. ८३ टक्के मुले आपल्या कुटुंबाबरोबर राहत असली, तरी सुमारे आठ टक्के मुले एकटीच आहेत. त्यातील बरीच मुले गेल्या आठ वर्षांपासून रस्त्यावर असून विविध कारणांमुळे घरातून पळून येणाऱ्या मुलांची संख्याही मोठी आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या १० ते १२ वयोगटातील मुलांचे प्रमाण मोठे (२० टक्के) आहे.

याबाबत संस्थेचे संचालक मनीष श्रॉफ "सकाळ'शी बोलताना म्हणाले, ""रस्त्यांवरील मुलांसाठी काही प्रकल्प आखण्यासाठी असे सर्वेक्षण करण्यात आले आहे. दिवसा आणि रात्री अशा दोन टप्प्यांत हे सर्वेक्षण केले. त्यासाठी आमचे १५ प्रतिनिधी दीड महिना काम करत होते.''

मुलांच्या उत्पन्नाचे साधन (टक्केवारीत)
भीक मागणे - ५५ टक्के
गाडी साफ करणे, टपरीवर काम करणे, विक्री - १४ टक्के
फुले विक्री - एक टक्का
सॉफ्ट टॉईज - ८.५ टक्के
वृत्तपत्र विक्री - एक टक्का
कचरा गोळा करणे - ४.५ टक्के
चोरी - सात टक्के

रोजचे उत्पन्न (टक्केवारीत)
शंभर रुपये - ५०
दीडशे रुपये - १४-१५
दोनशे रुपये - १५
अडीचशे - ०.४
तीनशे - दोन
पन्नास रुपये - १७.३

पैसे बचत (टक्केवारीत)
पैसे बचत करणारी एकूण मुले - २७
करत नाही - ५
माहीत नाही - ५५
गल्ला, कपड्याची पुरचुंडी बांधून - २७
दगडाखाली - ०.८
आईकडे - ९
मौन बाळगले - १२.५

------------------------
व्यसने

व्हाइटनर - ४४
दारू - २०
सिगारेट- बिडी - १०
गुटखा, तंबाखू, तत्सम - २१- २२

ही आकडेवारी अतिशय बोलकी आहे. मात्र, तेवढीच मनाला चटका लावणारीही. आज एवढ्या मुलांचं भविष्य अंधकारमय होत आहे. त्यांचं बालपण कोमेजलं जातंय. अशा अवस्थेत आपण २०२० मध्ये महासत्ता बनण्याचं स्वप्न कसं पाहणार?

- वैशाली भुते