व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>
Showing posts with label road accident. Show all posts
Showing posts with label road accident. Show all posts

पुण्यातील टिळक रस्ता मृत्यूचा सापळा


सकाळी साडेसहाच्या सुमारास गिरिजा हॉटेलच्या चौकात पीएमपीएल बस आणि खासगी प्रवासी बस यांची धडक झाली. त्यामध्ये "पीएमपीएल'चा चालक गंभीर जखमी झाला. मात्र, या अपघाताने येथील रहिवाशांना 1992 मध्ये याच रस्त्यावर झालेल्या अपघाताचे स्मरण करून दिले. किंबहुना याच नागरिकांनी त्या वेळी राबविलेल्या एका यशस्वी प्रयत्नांच्या स्मृतीही जाग्या झाल्या.

भरधाव जाणाऱ्या जड वाहनांना मज्जाव करणे आणि आलेले जड वाहन आहे त्याच स्थितीत "रिव्हर्स' न्यायला लावणे, असा हा उपक्रम होता. सलग नऊ वर्षे अथकपणे तो राबविला गेला. सुरवातीला पोलिसांचीही साथ मिळाली. मात्र, नंतरच्या काळात पोलिसांची उदासीनता आणि वाहनचालकांच्या अरेरावीपुढे उपक्रम बंद करावा लागला.

एक जून 1992 रोजी या रस्त्यावर झालेल्या अपघातात केतन सरपोतदार या 23 वर्षीय तरुणाच्या मृत्यूचा अनुभव हे नागरिक आजही सांगतात. वाहतुकीची इतर कोणतीही समस्या नसतानाही या सजग नागरिकांनी जड वाहनांना बंदी घालण्यासाठी आंदोलन केले होते. तसेच, रात्रीची वेळ साधून या रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी रात्रभर गस्तही घातली जात होती.

"या रस्त्याने जाणाऱ्या जड वाहनांवर कारवाई करण्यात येईल', असा इशारा देणारा फलक स्वारगेट "एसटी' स्थानकामध्ये लावला होता. त्याची दखल घेऊन "एसटी' महामंडळाने या मार्गावरून एसटी बसची वाहतूक पूर्णपणे बंद केले. मात्र, खासगी वाहनचालकांनी नागरिकांकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे खासगी वाहनांचा या रस्त्यावरील भरधाव प्रवास अजूनही थांबलेला नाही. दिवसा या रस्त्यावरील जड वाहनांचा प्रवास रात्रीच्या तुलनेने कमी आहे. मात्र, तो थांबला असेही म्हणता येणार नाही. रात्रीच्या वेळी जाणाऱ्या वाहनांची संख्या मात्र अजूनही मोठी आहे. त्यातही परराज्यातून येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या किरकोळ अपघातांचा आलेखही चढताच आहे. म्हणजे टिळक रस्त्याच्या दोन्ही टोकांना पोलिस चौक्‍या आहेत. असे असतानाही जड वाहनांची वाहतूक या रस्त्यांवरून पोलिसांच्या समक्ष दिवसभर होत राहते.

गस्त आवश्‍यक

टिळक रस्त्यावरील रहिवासी आणि त्यावेळचे आंदोलक प्रकाश रानडे म्हणाले, ""हा रस्ता प्रामुख्याने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा आहे. पहाटे पाच वाजल्यापासून रात्री दहापर्यंत या रस्त्यावर त्यांचा वावर असतो. असे असतानाही या रस्त्यावरून ही जड वाहने सुसाट वेगाने जातात. मनुष्यबळ कमी असल्याच्या सबबीवर पोलिस बंदोबस्त घालण्यास टाळाटाळ करतात. त्यांनी गस्त घालण्याची तयारी दर्शवली तर येथून पुढच्या काळात होणारी प्राणहानी टळेल.''


श्री. रानडे यांनी व्यक्त केलेले मत अतिशय योग्य आहे. टिळक रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलिस चौक्‍या असतानाही ही अवस्था असेल, तर इतर रस्त्यांची कल्पना न केलेलीच बरी. किमान रस्त्याच्या तोंडाशी उभे राहून जड वाहनांना अटकाव केल्यास पुढच्या घटना आपसूकच टळतील. नाही का? आपल्याला काय वाटते? या ब्लॉगवर नक्की लिहून पाठवा...