व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

अनुभवाचा धडा...तुम्ही काय शिकला?

शाळेत, कॉलेजमध्ये खरच खूप गोष्टी शिकवल्या जातात, पण आपण त्या खरचं शिकतो का? इतक्‍या साध्या साध्या गोष्टी असतात मात्र जोपर्यंत आपण स्वतः त्या अनुभवत नाही तोपर्यंत आपण त्या "शिकत' नाही.

"अनुभव हा सर्वांत उत्तम गुरू आहे. तुम्हीही या "सरां'कडून आयुष्यात छोटा मोठा धडा गिरवला असेलच ना! मग "शिक्षक दिना'च्या निमित्ताने तो आमच्याबरोबरही शेअर करा.
तुम्ही ई मेलही करू शकता...pailteer@esakal.com वर.
---------------------------------


भिरकावलेली डिश


शाळेत असताना "अन्न हे पूर्णब्रह्म' हे शिकले होते, पण हे शिकलेलं समजून घ्यायला मात्र बरीच वर्षं जावी लागली. गोष्ट छोटीच होती, पण बरंच शिकवून गेली.

अकरावी-बारावीत असताना लेक्‍चर, प्रॅक्‍टीकल करुन कॉलेज मधून परत यायचे तेव्हा प्रचंड भूक लागलेली असायची. कधी एकदा जेवण समोर येतय असं होऊन जायचं.

एकदा अशीच भुकेने कलकलून घरी आले होते. आईला थोडसं बरं वाटत नव्हतं म्हणून तिने रोजच्या स्वयंपाकाला रजा देऊन फक्त पोहे केले होते.

साग्रसंगीत जेवणाच्या अपेक्षेने बसल्यानंतर समोर पोहे बघून प्रचंड चिडचिड झाली. मला पोहे नको, म्हणून तणतणत पोह्यांची डिश मी ढकलून दिली. सगळे पोहे सांडले. मी रागातच तशीच जाऊन पडून राहिले. आई मला तेव्हा काहीच बोलली नाही.

ही गोष्ट मी काही दिवसांनी विसरुनही गेले.

बारावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी मी पुण्याला आले. मेसमधला नाश्‍ता, जेवण करताना घरच्या जेवणाची खूप आठवण यायची. जेव्हा सुटीला म्हणून पहिल्यांदा घरी आले, तेव्हा आईने नाश्‍त्याला काय करु, असे विचारल्यावर पटकन म्हणाले,"" काहीही कर गं! पोहेही चालतील...''
आणि त्याचक्षणी मला ती भिरकावलेली पोह्यांची डिश आठवली. त्यावेळी केलेला माज आठवला. भुकेच्या वेळी समोर येणाऱ्या अन्नाचं महत्त्व खऱ्या अर्थाने पटलं. त्यानंतर मात्र कधीही पानावर बसल्यावर "हेच हवं, तेच हवं हे आवडतं, हे आवडत नाही' असला हट्ट केला नाही. पानात कधीच काही टाकलं नाही. अन्न हे पूर्णब्रह्म समजूनच खाल्लं.

- अमृता रावण

---------------------------------


रेल्वेतली बाई


महालक्ष्मी एक्‍स्प्रेस...माणसांनी ठचाठच भरलेली...मी मुंबईहून पुण्यापर्यंत निघाले होते...दिवसभर काम करून गाडीत जरा झोप घ्यायची असं ठरवलं होतं पण गाडीत गर्दी इतकी की बसायला मिळालं हीच गोष्ट फार वाटली.

जरा स्थिरस्थावर झाले, आजूबाजूला नजर टाकली...गर्दी जरा गावाकडची होती...म्हणजे शहरी नक्कीच नव्हती. माझ्यासारख्या दोन-चार मुंबईला चढलेल्या मुली होत्या पण बाकी सगळे बहुधा गावाकडे चालले होते. महिलांच्या डब्यात अर्थात मुलंही कोंबली होती. तीही जागा सापडवून खेळायचा प्रयत्न करत होती.

थोड्या वेळानं सगळ्यांनी खाणं-पिणं सुरू केलं. डबा इतका अस्वच्छ होता की घरी जाऊन फ्रेश झाल्यावरच जेऊ या विचाराशिवाय आणखी काही करता येणं अवघड होतं. खिडकीशी बसलेल्या बाईनं तिचा "डबा' उघडला. रुमालात बांधलेली भाकरीची थप्पी, त्यावरच भात, त्यावर भाजी आणि खर्डा...बाई जेवत होती, जेवायचं का असं तिनं मुलांना विचारलं आणि ती नाही म्हणल्यावर फार आग्रह केला नाही. अचानक तिच्या मुलानं रुमालातला भात मुठीत भरून घेतला आणि तो गाडीत सगळीकडे भात उडवायला लागला. गाडीतल्या सगळ्यांचेच चेहरे तुसडे झाले. त्याची आई त्याला काही बोलेना. मग गाडीतल्याच कोणीतरी त्या बाईलाही खडसावलं. तरी ती बाई फारसा रिस्पॉन्स देत नव्हती. शेवटी तिनं मुलाला दोन लगावल्या आणि खिडकीबाहेर बघत बसली.

शेजारणीनं तिला विचारलं तेव्हा तिनं सांगितलं, की ती नवऱ्याला शोधायला मुंबईला आली होती. दोन मुलांना घेऊन...नवरा मुंबईला काम करतो इतकीच तिला माहिती...तो आत्तापर्यंत फक्त दोनदाच गावाला आला होता, आणि पदरात दोन मुलं टाकून गेला. सासरी हाकलून लावलं म्हणून ती नवऱ्याला शोधायला आली होती. तो मिळाला नाही, म्हणून गावाकडे जाणाऱ्या गाडीत बसली. सासरी तर जाताच येणार नव्हतं. त्यामुळे आता पुढे कुठे जावं याची विचार करत होती. मुलानं इतर प्रवाशांच्या अंगावर खरकटं उडवणं तिला दिसूनही दिसत नव्हतं.

तिचं ऐकून गाडीतले सगळे तुसडे चेहरे बदलले. गाववाले, शहरी...सगळेच...त्या बाईचा चेहरा अजून डोळ्यापुढे आहे माझ्या...मुलांना घेऊन आता उतरायचं कुठे आणि राहायचं कुठे आणि खायचं काय असे प्रश्‍न होते तिच्यापुढे...आणि आम्ही गाडीत कसं वागावं याचे धडे देत होतो तिला...

तेव्हा फार जाणवलं, की आपल्याला माणूस दिसतो त्याच्या पलीकडे कितीतरी अधिक असतो.

पटापट निष्कर्षप्रत यायची घाई असते ती आपल्याला...पण समोरच्याच्या वागण्याचा काही निराळा अर्थ असू शकतो, पेक्षा ते वागणं जरी "चुकीचं' असेल तरी त्यामागचं कारण मोठं असू शकतं याची जाणीव त्या दिवशी तीव्रतेनं झाली...आता कधीही, कोणीही, कसंही वागलं तरी, यामागे काहीतरी कारण असू शकेल हा शक्‍यतेचा एक टक्का मी कायम राखून ठेवते. त्यामुळे न्यायाधिशाच्या खुर्चीतून पायउतार होऊन परिस्थिती नितळपणानं बघण्यासाठी प्रयत्न करता येतो ...

- चित्रा वाळिंबे


---------------------------------

नावडती उसळ

संजीवन विद्यालय. निसर्गरम्य पाचगणीतील सर्वात जुन्या शाळांपैकी एक. माझ्या बालमनावर संस्कार करणारी ही पहिली शाळा. शिस्त हा या शाळेचा आद्य मंत्रच होता. शरदनाना पंडित हे आमचे प्रिन्सिपॉल. या शाळेला "हिंदू कॉन्व्हेंट' असे म्हटले, तर ते वावगं ठरणार नाही. शाळेची शिस्त शक्‍यतो कोणी मोडण्याचा प्रयत्न करत नसे. परंतु, बालवयातील हूडपणा काही वेळा अचानक उफाळून येणारच. शिस्तभंगाबद्दल माझ्या सहाध्यायी मित्रांबरोबरच मलाही अनेकवेळा शिक्षा झाल्या. मात्र, या शिक्षा शारीरिक स्वरूपाच्या कधीच नसत. अर्थातच मनावर त्यांचा खोल ठसा उमटत असे.

त्या काळी आमचे वर्ग आताच्या सारखे एकाच इमारतीमध्ये नसत. शिक्षक एकाच वर्गात व विद्यार्थी या वर्गातून त्या वर्गात, असा दिवसभर प्रवास चालू असे. हे वर्गही वेगवेगळ्या ठिकाणी असत. डोंगराळ प्रदेशामुळे चालण्याचा आणि हिरवाईमुळे नेत्रसुखाचा आनंद कायम मिळत असे. आमचा डायनिंग हॉल दरीच्या काठाजवळ होता. डायनिंग हॉलच्या मागे डोंगरउतार व अगदी काठावर झाडांची गर्दी असे. त्यात बांबूची अनेक बनं होती.

डायनिंग हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हात धुवावेच लागत. विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवण्यासाठी एक शिक्षक तेथे उभे असत. त्यांना चुकवून कोणालाही जाता येत नसे. प्रत्यक्ष हॉलमध्ये बारा जण बसतील एवढी मोठी टेबल्स असत. प्रत्येक टेबलावर यजमानाच्या जागी बसत एक शिक्षक. उत्तम बल्लवाचार्यंमुळं जेवण रुचकर असायचं. वाढपी प्रत्येकाला हवं-नको पाहून वाढत असत. मात्र, आवडो किंवा न आवडो, केलेला कोणताही पदार्थ पहिल्यांदा घ्यावाच लागत असे. न आवडणारा पदार्थ असला, तरी तो संपवावाच लागे.

जेवणास सुरवात करण्यापूर्वी "या कुंदेंदु तुषार हार धवला' हा श्‍लोक म्हणण्याची प्रथा होती. पुढील आयुष्यात इंग्रजाळलेल्या मनोवृत्तीमुळे श्‍लोकांशी फारसा संबंध आला नाही. तरीही शाळेत वेळोवेळी म्हटले जाणारे अनेक श्‍लोक, आजही तोंडपाठ आहेत. तर, एके दिवशी मसुरीची उसळ करण्यात आली होती. माझ्या अत्यंत नावडत्या पदार्थांमध्ये मसुरीचा क्रमांक अगदी वरचा ! पानात ही उसळ पाहिल्यावर माझ्या अंगावर काटा आला. कुसुमताई भुस्कुटे या माझ्या आवडत्या शिक्षिका. नेहमी त्याच आमच्या टेबलावर असायच्या. मी चोरट्या नजरेनं त्यांच्याकडं पाहिलं. त्याही माझ्याचकडं पाहात होत्या. कदाचित माझी नावड त्यांना माहित असावी. त्या पुण्याच्या असल्यामुळं, माझा एखादा अपराध पोटात घालतील, असं वाटलं. पण, कसचं काय आणि फाटक्‍यात पाय. चष्म्याआडून त्यांचे मिश्‍किल डोळे, मला ती उसळ संपवलीच पाहिजे, असंच सांगत होते. पानातील सर्व पदार्थ संपले, तरी पहिल्यांदा वाढलेली मसुरीची उसळ काही संपली नव्हती. सगळ्या विद्यार्थीमित्रांचे जेवण संपलं होतं आणि मी उसळ कधी संपवतो, याची वाट पाहात माझ्याचकडे पाहात होते. अखेर ते जिवावरचं धाडस करण्यास मी सरसावलो आणि साधारण एका घासाएवढी ती उसळ एकदमच मुखात सारली. त्यावेळी मला ब्रह्मांड आठवलं. वांतीची भावना अगदी प्रबळ झाली. घास घेतल्यानंतर ढसाढसा पाणी प्यालो. पोटात ढवळू लागलं होतं. तरीही नेटानं हात धुवून बाहेर पडलो. त्यानंतर अनेक वेळा मला ही उसळ खावीच लागली. त्याची नावड हळूहळू कमी होत गेली. आज तर माझ्या आवडीच्या उसळींमध्ये तिनं आघाडीचं स्थान पटकावलं आहे.

- अरविंद तेलकर

---------------------------------


जमावाचा पडदा


त्या जमावाच्या पडद्यातून "तो' चेहरा मला दिसलाच नसता तर माझं काय झालं असतं?

मी कुठं जाणार आहे? माझे विचार काय आहेत? लोकांकडं मी बघतो तरी कसं?...खूप प्रश्‍न "तो' एक चेहरा एका क्षणात उभे करून गेला आणि सोळा वर्षं उलटली तरी अजून सगळ्या प्रश्‍नांची सोडवणूक झालीच नाही, असं वाटतं.

प्रसंग आहे डिसेंबर ९२ च्या दंगलीतला. उन्मादानं सारासार विवेक गमावण्याच्या काळातला. "पॉलिटिकल थिंकिंग' वगैरे काहीही न समजण्याच्या वयात आकर्षण वाटलं, ते जमावानं एकत्र फिरण्याचं. दहशत माजविण्याचं. आपण "आपल्यांबरोबर' आहोत आणि ते "बाहेरचे' आहेत, असं काहीसं वाटत होतं. त्या दिवशी दुपारी ठरलं, की "त्यांची' दुकानं फोडायची. जमाव निघाला. मीही त्याचाच एक भाग. बांगड्यांच्या त्या दुकानांसमोर जमाव आला आणि हातात मिळेल ती वस्तू दुकानांवर भिरकावून द्यायला सुरुवात झाली. दगड, विटा, स्टंप्स, लाल मातीची ढेकळं, लोखंडी सळया...

दुकानाला साध्या लाकडी फळ्यांचे दरवाजे होते. बाहेर दुकान आणि आत, वरच्या बाजूला "ते' राहात होते. फळ्या फोडून जमाव आत शिरला. बघता बघता बांगड्यांचा खच रस्त्यावर पडला. आमच्यातलेच काहीजण बांगड्यांवर नाचून नाचून त्याचा चुरा करू लागले...आरडा-ओरड्याने आणि भीतीदायक घोषणांनी "त्या' घरातली एकूण एक माणसं भेदरली असणार. कोणीच दिसत नव्हतं. दुकानातून घराकडं जाणारा दरवाजा बंद होता. बांगड्यांचा शब्दशः चक्काचूर होईल, तसा जमावाचा उन्माद हळू हळू ओसरत होता...

इतक्‍यात दुकानाच्या वरच्या मजल्याची लाकडी खिडकी किलकिली झाली. कोणीतरी हलकेच डोकावलं. आणि क्षणात खिडकी बंद झाली. अगदी घट्ट. तेवढ्यात मला "तो' चेहरा दिसला होता...

ती माझ्या मित्राची आई होती. मणेरची आई. तीन वर्षांपूर्वीपर्यंत तो माझा मित्र होता. नापास होऊन तो वर्गात मागे राहिला आणि मैत्रीही. त्याचीच ती आई. दुकान फोडलं ते त्यांचं होतं...

त्याची आई शाळेत सारखी यायची. मला खूप प्रेमानं जवळ घ्यायची. खाऊ द्यायची. "माझ्या इमुला शिकव की रे जरा तुझ्यासारखं...', असं सांगायची. माझ्या आईशी बोलायची. तिच्याकडं माझं कौतुक सांगायची. "याची मैतरी नको रे सोडू,' असं इमुला बजावून सांगायची...तीच ही आई. तिचंच दुकान जमावानं फोडलं होतं. क्रुरपणे तिथल्या एकूण एक बांगड्यांची वाट लावली होती. त्या जमावाचा मी एक भाग होतो...

सर्रकन अंगावर काटा आला. हातपाय लटपटले...

का आलो आपण इथं? तिनं आपल्याला पाहिलं का? पाहिलं असेल तर काय वाटलं असेल तिला? माझी आई आणि इमुची आई, यात फरक कसा काय करता येईल? कशासाठी आपण हे सगळं केलं? कोणी सांगितलं होतं? इमुच्या आईला या जमावानं मारलं असतं तर? ते बघू शकलो असतो का? जमावातले जर "आपले', तर इमु आणि त्याची आई हे "बाहेरचे' कसे?....

वयाला न झेपणारे प्रश्‍न उभे राहिले.

मी नकळत जमावातून बाजूला गेलो...

परत कधीही या जमावाचा भाग न होण्यासाठी...


- सम्राट फडणीस

11 comments:

  1. Anonymous said...
     

    Lady in a train discribed by Chitra Walimbe was very excellent.The story gives a message to us that we can't say someone was wrong,As for that lady struggling for survival was important than maintaining a discipline in front of others.This experience of Chitraji given a message to everybody don't be a judge for someone with his present behaviour.It was nicely described by Chitraji.many Thanks.

  2. Anonymous said...
     

    मी नकळत जमावातून बाजूला गेलो...

    परत कधीही या जमावाचा भाग न होण्यासाठी...

    Samrat You have suffered through from a very touchy situation.

    The above mentioned line is a good lesson of life

    Nice Article

  3. Anonymous said...
     

    Dear Mr. Phadnis

    Feel really nice by reading that you had got the lesson about how bad is the mob pshycology.

    Thanks and congratulate to you that you decide to avoid to participate in such humanity devide activity.

  4. Anonymous said...
     

    Samrat,

    I agree with the above comment.

    Ramesh Jadhav, Pune

  5. Anonymous said...
     

    Esakal,
    I think that this would be a seperate subeject of disscussion. You have to put this subject seperatly for open disscussion.

  6. Anonymous said...
     

    Being on a special side may make you feel special. But it can not be always true. Criteria of specialty should not be based on the side.
    Its just sad not everyone in the mob gets such illuminating experiences.
    I think, only liberal,rational, equal and principle based education can change the psychology.
    Thanks for Sharing your experience with us Mr. Phadnis. It might open the eyes of rest them. (Irrespective of the side!)

  7. Anonymous said...
     

    Samrat,

    Very heartning story. Many times we let our emotions take control of our body without being practical and then we might end up doing injustice to others. Thanks a lot for sharing this experience. This will at least make us think twice before taking any nasty decision is a haste. and it can be anything.

    Thanks and Regards,
    Ameya Karambelkar - Milton Keynes

  8. Anonymous said...
     

    आपण आशा करुया की मुस्लीम बांधवसुद्धा हे लक्षात घेतील. त्यांच्या धर्मात धार्मिकतेला जास्त महत्त्व दिले जाते आणि राजकारणी लोक त्याचा फायदा उठवतात.

  9. Anonymous said...
     

    Samrat

    Offcourse I also think so. I am agree with Mr. Karamblekar

  10. Unknown said...
     

    sant dasganu maharajanni shree gajanan maharajanchee charitra-gatha lihitana kelele lekhan athavate,

    "Dharma bapa jyacha tyanee, Manava priya pranahunee, paree vidharmyachya thikani, alot prem dharave,
    He na ghadave jovaree, soukhya lamb towaree....."

    He shabda aaj 100 varshanantarahee kitee tantotant lagu hotat apalya deshbandhavanna... Aj apalya deshala asha samruddha vicharanchee shikawant havee ahe, Meherbaba, Shirdeeche Saibaba, yanchyasarakhe sant kimva awatar ya samajat naheet he aapale durdaiva. Pan Samrat ne lihila ahe tasa ekhada pramanik anubhav, ekhada vicharsuddha 100 dushit mane swachccha karu shakel, yachee mala khatree watate.

    Samrat ani eSakal, tumache abhinandan...!

  11. Samrat Phadnis said...
     

    प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. खरं तर आम्हाला अपेक्षित आहे, तुमच्याबाबतीत आलेले असे अनुभव. ज्यांनी तुम्हाला शिकवलं. तुम्ही ते इथं जरूर शेअर करा किंवा pailteer@esakal.com या अॅड्रेसवर मेल करा.

    - धन्यवाद

Post a Comment