व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

संदीपच्या निमित्तानं...

पुण्यातील एका तरुण, हुशार आणि उत्तम भविष्य असणाऱ्या सॉफ्टवेअर अभियंत्यानं दोन आठवड्यांपूर्वी आत्महत्त्या केली. कारण होतं, "कामाचा अतिताण.' या घटनेनंतर लगेचच चर्चा सुरू झाली. विविध प्रतिक्रिया उमटल्या. ......

- अभिजित थिटे

abhijit.thite@ esakal.com

७ ऑगस्ट २००८.

सकाळी सकाळी एस.एम.एस. आला. पुण्यातल्या एका सॉफ्टवेअर कंपनीतल्या अभियंत्यानं कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्त्या केली. संदीप शेळके हे त्या युवकाचं नाव. त्यानं आत्महत्त्या करण्याआधी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. "कामाच्या अतिताणामुळे' हे आत्महत्त्येचं कारण त्यानं दिलं होतं. घटना आदल्या दिवशी म्हणजे ६ ऑगस्टच्या रात्री घडली होती. नव्या माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात ही बातमी झपाट्यानं सगळीकडे पसरली. आणि सुरू झाली न संपणारी चर्चा.

पुणे प्रतिबिंब या ब्लॉगवर आठ तारखेला एक पत्र पोस्ट करण्यात आलं होतं. पत्र संदीपलाच लिहिलं होतं. त्यात कामाचा ताण, मानसिक ओढाताण आणि त्यातून घडलेली ही घटना यासंबंधाने काही प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते. त्यावरची उत्तरं शोधण्याचाही प्रयत्न केला होता. या पोस्टवर अनेक कॉमेंट्‌स आल्या. आटीयन्सपासून ते एक आई, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून, सामाजिक स्तरांमधून या प्रतिक्रिया उमटल्या. घडलेल्या घटनेबद्दल सगळ्यांनाच वाईट वाटतंय; पण आता तेवढंच वाटून उपयोग नाही. या घटनेचा आता गांभीर्यानं विचार व्हायला हवा.

मुळात कामाचा अतिताण, आजच्या भाषेत सांगायचं, तर वाढती "वर्क प्रेशर्स' हा मुद्दा आजपर्यंत अनेकदा चर्चिला गेला आहे. माध्यमांतून त्यावर विविध लेखही प्रसिद्ध झाले आहेत. खूप ताण येतोय, त्यामुळे आपण तुटत चाललो आहोत, हेही सगळ्यांना जाणवतंय. फक्त हा विषय आजच्यासारखा ऐरणीवर आला नव्हता. आत्महत्त्येसारखी गंभीर घटना घडल्यानंतर मात्र, सगळ्यांचा आपल्याच ताणाकडे पाहायचा दृष्टिकोन बदलाय, हे आलेल्या प्रतिक्रियांवरून जाणवतं.

तुटेपर्यंत ताणलंय...

मुळात हा प्रश्‍न फक्त आयटीपुरता मर्यादित राहिलेला नाही. अतिशय वेगानं धावणाऱ्या या जगात ताण सगळ्यांच्याच बोकांडी बसले आहेत. आपल्याला अनेक गोष्टी मिळवायच्या आहेत. सगळ्याच क्षेत्रात विलक्षण स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत टिकायचं आणि पुढेही जायचं अशी ही दुहेरी स्पर्धा आहे. या स्पर्धेत साऱ्यांचाच कस पणाला लागतो. ही स्पर्धा म्हणजे चरक झालाय आणि आपण ऊस! सगळंच स्वत्व पिळून निघाल्यानंतर आपलं चिपाड होईल नाहीतर काय? आत्महत्त्येचा प्रसंग आताच घडला; पण आपण स्वत:ला तुटण्यापर्यंत ताणलंय, याची लक्षणं आधीपासूनच दिसायला लागली होती. घरात सतत होणारी चिडचिड, अगदी छोट्याशा गोष्टीवरूनही तडकणारं डोकं, बऱ्याचदा जाणवणारा थकवा, डोकं दुखण्याचं वाढलेलं प्रमाण ही सारी याचीच तर लक्षणं होती. याविषयी सगळेच मानसोपचार तज्ज्ञ पोटतिडकीनं बोलत होतेच. आपण आतातरी जागं व्हायला हवं. आपलं स्वत:कडचं हे दुर्लक्ष अक्षम्यच आहे. याचे परिणाम आपण तर भोगतोच; पण आपल्या आजूबाजूच्यांनाही भोगायला लावतो. हे "पॅसिव्ह स्मोकिंग'सारखं आहे. सिगारेट आपण ओढायची आणि त्याचे भोग आपल्याबरोबरच इतरांनीही भोगायचे, अतुलची ही प्रतिक्रिया विचार करायला लावणारी आहे.

पण ताण असतोच!

ब्लॉगवर आलेल्या प्रतिक्रियांपैकी बहुतेक साऱ्यांनीच "आयटीमध्ये ताण असणारच' असा उल्लेख केला होता. एकानं नाव न देता प्रतिक्रिया दिली, "प्रेशर्स सगळ्यांवरच असतात. मॅनेजर्स आम्हाला अक्षरश: राबवून घेतात. पण त्यांनाही पर्याय नसतो. त्यांचे बॉसेस त्यांच्यावर दबाव आणतात आणि ते आमच्यावर. यातून कोणाचीही सुटका नसते. मला कधीकधी खूप राग येतो; पण काही पर्यायही नसतो.' ही प्रतिक्रियाही बोलकी आहे. ताण असणार हे यानं मान्य केलंय, फक्त काही पर्याय नाही, हे मात्र चूक आहे. कारण एकदा ताण घ्यावा लागणार आहे, हे मान्य केलं, की तो सोसायचा कसा, कमी कसा करायचा हेही शोधायलाच हवं ना? पण तसं घडताना मात्र दिसत नाही.

कॅप्टन सुभाष हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांनी आताच्या पिढीचं बारकाईनं निरीक्षण केलंय, असं त्यांच्या प्रतिक्रियेवरून वाटतं. ते म्हणतात, "आजकालची हुषार तरुण पिढी जरी नवी नवी शिखरे पादाक्रांत करत असली, तरी त्यांना पूर्वीपेक्षा अतिशय जास्त प्रमाणात ताणतणावाखाली, वेळीअवेळी आणि प्रोजेक्‍ट डेडलाइनच्या टांगत्या तलवारीखाली नोकऱ्या कराव्या लागतात. ऑफिसमधून घरी आल्यानंतरही लॅपटॉपवर करण्यासाठी काम असतंच. माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्यात अडकल्यामुळे इंटरनेट, आयपॉड, मोबाईल अशी वेगवेगळी गॅजेट्‌स सतत हाताळण्याची सवय लागलेली असते. त्यामुळे त्यांना एक क्षणही विश्रांती घ्यायला फुरसत नसते.'

वेळ काढलाय कधी?

सुभाष यांचं म्हणणं तुम्हा-आम्हालाही पटेल. आपण स्वत:साठी वेळ काढायलाच विसरून गेलो आहोत, असं कधीकधी वाटतं. ज्या कॉलेजच्या मित्रांबरोबर आपण दिवसरात्र हुंदडलो, त्यांना आपण किती वेळ देतो? नोकरी करण्याआधी अधेमध्ये डोंगरदऱ्यांत भटकंती करायला जायचो. जाम धमाल करायचो. आता तसं जमतं? रात्री जेवण झाल्यावर निवांत चालत चालत फिरायला कितीदा गेलो आहोत? आपल्या जिगरी दोस्ताला फोन, एस.एम.एस. आणि इमेल सोडून कितीवेळा भेटलो आहोत? आईसाठी, कुटुंबासाठी किती वेळ दिलाय आपण? अर्थात, लग्नकार्य किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रम आणि हॉटेलिंग सोडून! आईशी शेवटच्या निवांत गप्पा कधी मारल्यात आपण आठवतंय? यादी काढायला गेलो, तर खूपसारे प्रश्‍न आहेत. व्यक्तीनुसार या यादीत बदल होतील. हे प्रश्‍न आपल्याला पडत नाहीत का? कधीतरी नक्कीच पडतात. काम करता करता आपण "कलिग'ला तसं म्हणतोही. "यार बहोत दिन हुए कहीं घूमने नहीं गया... अब थोडासा ब्रेक चाहिये...' फक्त हे सारं बोलण्यातच राहतं. आणि मुद्दा इथंच आहे.

योगा, मेडिटेशन...

मधे एक मेल फिरत होती सगळीकडे. अनेक मेलच्या गर्दीत ही लक्षात राहिली. कोणीतरी अनामिक व्यक्तीनं खूप छान लिहिलं होतं त्यात. "एच.आर. कडून मेल आला. अमुकअमुकचं काल हार्टफेलमुळे निधन झालं. इतक्‍या तरुण वयात हार्टफेल...' आपल्यापैकी काहींना आठवत असेल तो मेल. ही घटना घडण्याच्या काही दिवस आधीच ही मेल सगळीकडे फिरत होती. फक्त झालं एवढंच आपण ती वाचली, थोडं हळहळलो आणि इतरांना फॉरवर्ड केली. "लंच टाईममध्ये' इतरांशी थोडी चर्चा केली. सध्या अशा चर्चांचा शेवट ठरलेल्या वाक्‍यांनी होतो, "मेडिटेशन आणि योगा इज अ मस्ट!' ब्लॉगवर आलेल्या प्रतिक्रियांपैकी २५ टक्के प्रतिक्रियांमध्ये हाही उल्लेख होता. आपल्यावर असणारे ताण, त्यामुळे होणारा त्रास या साऱ्यावर हे दोन उपाय म्हणजे रामबाण आहेत, असं काहीसं वाटतं आपल्याला. पण ते पूर्ण खरं नाही. म्हणजे सकाळी मेडिटेशन करायचं. "योगा'च्या क्‍लासला जायचं आणि दिवसभर घाण्याला जुंपून घ्यायचं, यानं मन:शांती मिळत नाही. ती काही "डिस्प्रिन'नाही. "योगा' आणि "मेडिटेशन' हे मन:शांती देतील; पण त्यासाठी उरलेल्या दिवसाचं नियोजनही तसंच हवं. आजकाल आपला "डिस्प्रिन'वर जास्त विश्‍वास बसत चाललाय. गोळी घेतली, डोकेदुखी थांबली. मुळात डोकं का दुखत होतं, हे शोधायचे कष्ट आपण कोणीच करत नाही. आणि "योगा', "मेडिटेशन' आणि आयुर्वेद हे रोग शोधण्याकडे जास्त लक्ष देतात. म्हणूनच आठवड्यातून तीन दिवस, सकाळी किंवा संध्याकाळी दोन तास या क्‍लासेसना जाऊन उपयोग नसतो. या आधीच्या परिच्छेदात जे प्रश्‍न विचारलेत ना, त्याची उत्तरं आधी देता यायला हवी. आपल्या "लाईफ'मध्ये तसा बदल घडायला हवा. तरच या उपायांचा उपयोग होईल.

शेवट... नाही सुरवात

ब्लॉगवरील प्रतिक्रिया आणि त्यानिमित्तानं असलेला लेख हा काही उपदेश नाही. तो माझा आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न आहे. या साऱ्यांत मीही येतोच ना! आपण सारेच धावत सुटलो आहोत. नक्की काय मिळवायचंय हे आपलं आपल्याशी निश्‍चित नाही. ठरवलेला "गोल अचिव्ह' केला, की आपण तिथं थोडा वेळ रेंगाळत नाही. यशाचा आनंदही साजरा करत नाही. कारण तिथं उभं राहिल्यानंतर आणखी पलिकडची गोष्ट दिसत असते. मग ती मिळविण्यासाठी आपण सारेच आटापिटा करतो. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. आपण कुठवर धावायचं, का धावायचं हे स्वत:शीच निश्‍चित करायला हवं. ब्लॉगवर "मेसअप इन थॉट' अर्थात "वैचारिक गोंधळ' या नावानं एक प्रतिक्रिया आली आहे. त्याचं म्हणणं आहे, "आपण अशा प्रकारे विचार केला आणि तसं वागू लागलो, की कधीतरी वाटतं, आपण स्वत:ला बांधून घेत नाही ना? आणखी काही करण्याची, मिळविण्याची शक्‍यता असताना स्वत:वर बंधनं घालणं किती योग्य आहे?' मुद्दा चूक नाही; पण हे काय किमतीवर, हे वाक्‍य पुढे जोडायला हवं. फिरून फिरून तोच मुद्दा समोर येतो, किती ताणायचं? आपण मिळवत असलेला पैसा आपल्याला एंजॉय करता येत नसेल, ज्या पोटासाठी हे सारं करतो त्यात "मिळेल ते' ढकलावं लागत असेल, कुटुंबाबरोबर चार क्षण घालवता येणार नसतील, आपल्या "बच्चू'ला फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी तयार करण्यातली मजा लुटता येणार नसेल आणि मुख्य म्हणजे स्वत:साठीही वेळ देता येत नसेल, तर एवढा पैसा कमवायचा कशासाठी? आजचे हे श्रम आणि त्यातून मिळणारं उत्पन्न पुढे आरोग्यावरच खर्च करायचं आहे का?

सकाळी उठलो, रोजच्या व्यायाम केला, आन्हिकं आवरली, सगळ्यांबरोबर हसत-खेळत नाष्टा केला, ऑफिसला आलो, मस्तपैकी काम केलं, संध्याकाळी घरी पोचलो, पिलाला घेऊन बागेत गेलो, त्याच्याबरोबर चक्क फुगा खेळलो, रात्री सगळेजण एकत्र जेवायला बसलो.... हा दिनक्रम आपल्याला नको असतो का? माझ्या या लेखाचा, खरंतर स्वगताच ा शेवट या सुंदर दिनक्रमाच्या सुंदर स्वप्नानंच होणं योग्य आहे. फक्त हे स्वप्न ?हे, ते लवकरात लवकर प्रत्यक्षात यावं, ही भाबडी वाटली, तरी योग्य आशा आहे. म्हणूनच संदीपच्या जिवाची किंमत मोजून सुरू झालेली ही चर्चा हा शेवट नाही. ती सुरवात आहे सुंदर भविष्याची!

2 comments:

 1. vaishali said...
   

  Dear sandeep....really felt sorry for u n ur parents....
  As truly said by abhijit u teach a great lesson to all of us but the price we paid for that was u dear....
  Dear IT professional friends (even im one software engg.)lets share our problems n sorrows with our friends or parents....so that we will feel better.... n dont worry friends problems are part of our life.... there are always some solutions too.... n please be open with ur friends or parents when ur in tention or suffering from tough time.... kash SANDEEP ne kisi k sath apni feelings share kiyi hoti????
  Thanks Abhi for such a great blog....
  Sorry SANDEEP....

 2. Anonymous said...
   

  why dont you u address somthing about the security of the girls at the call center ...there are many issues happening in pune ..fact is more than bombay.

  Issues in the IT sector ...some of the Non indian companies having their large workforce in india. Obviously the client is from other countries ...they make the pressure at the offshore. the situation is kind of deadlock. everyone pointing to other person for the cause.

Post a Comment