व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>
Showing posts with label PMP. Show all posts
Showing posts with label PMP. Show all posts

पीएमपी'ची वर्षपूर्तीनंतरची स्थिती

बिकट वाट : आरटीओ पासिंग, वायपर्स, काचा नाहीत

अकराशे बसपैकी 120 बसचे आरटीओ पासिंग झालेले नाही, 150 बसला वायपर्स नाहीत, फुटलेल्या काचा बदलण्यासाठी 1600 काचा कमी पडत आहेत; तर अनेक बसना सुरक्षा जाळ्या बसविलेल्या नाहीत. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसची ही सद्यःस्थिती असून ही माहिती खुद्द पीएमपीनेच दिली आहे.

पीएमटी आणि पीसीएमटी या दोन्ही संस्थांचे विलीनीकरण होऊन एक वर्ष होत आले आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी हे विलीनीकरण करण्यात आले आहे. असे असताना पीएमपीच्या बसची सद्यःस्थिती यातून समोर आली आहे. पावसाळा सुरू झाला असूनदेखील सर्व गाड्यांना वायपर्स बसविण्याचे काम पूर्ण झाले नसल्याचे यावरून उघडकीस आले आहे. तर विविध कारणांमुळे बसच्या फुटलेल्या काचा बदलण्यासाठी 1995 काचांची आवश्‍यकता आहे. त्यापैकी आतापर्यंत 400 काचा पीएमपीकडे उपलब्ध झाल्या आहेत. उर्वरित 1600 काचा अद्याप पीएमपीस प्राप्त झालेल्या नाहीत. याशिवाय अनेक गाड्यांना सुरक्षिततेच्या जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही.''
नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीकडे आकृष्ट करण्यासाठी एकीकडे विविध भरीव योजना राबविल्या जात आहेत, तर दुसरीकडे काही शुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करून नागरिकांना पसंती मिळविण्यात पीएमपीएल अपयशी ठरत आहे. प्रवाशांना काही किमान गोष्टींकडे लक्ष दिल्यास मोठा प्रवासीवर्ग त्याकडे आकर्षित होईल, यात शंका नाही.

पेट्रोल व डिझेल दरवाढीचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला फटका

पेट्रोल व डिझेल दरवाढीचा फटका सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर पडला असून, रिक्षाचालकांच्या संघटनांनी प्रवास भाडेवाढीची मागणी केली आहे. एसटी आणि पीएमपीच्या प्रवास भाड्यात तातडीने वाढ होण्याची शक्‍यता नाही.

रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी रिक्षा प्रवासभाड्यात वाढ करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, की या दरवाढीचा गंभीर परिणाम सर्व अर्थव्यवस्थेवर होणार आहे. महागाई वाढत आहे. पेट्रोल व डिझेलसाठी पर्यायी असलेल्या "एलपीजी'चा पुरवठा करण्याबाबत सरकारचे धोरण पूर्णपणे बेजबाबदारपणाचे आहे. रिक्षाचालकांचे आर्थिक ओढाताण होणार असल्याने, रिक्षा प्रवासभाड्यात वाढ करण्याची मागणी आम्ही करणार आहोत.

पुणे शहर रिक्षा फेडरेशन पहिल्या एक किलोमीटरसाठी आठ रुपयांऐवजी नऊ रुपये, तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी सहा रुपयांऐवजी साडेसहा रुपये भाडे आकारण्याची मागणी करणार आहे. महाराष्ट्र रिक्षा सेनेने पहिल्या एक किलोमीटरसाठी आठ रुपयांऐवजी दहा रुपये आकारण्याची मागणी केली आहे. पुढील प्रतिकिलोमीटरसाठी सहा रुपये आकारण्यात येतात.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीत धावणाऱ्या पीएमपी गाड्यांसाठी रोज साठ हजार रुपये डिझेल लागत असल्याने, त्यांच्यावर रोज साठ हजार रुपयांनी आर्थिक बोजा वाढला आहे.एसटीच्या सोळाशे गाड्या राज्यात धावत असून, त्यांना रोज दहा लाख 15 हजार लिटर डिझेल लागते.

..................
सर्वाधिक फटका "पीएमपी'ला
डिझेलच्या दरवाढीचा सर्वाधिक फटका पुणे महानगर परिवहन महामंडळा(पीएमपी)ला बसणार आहे. डिझेलदर एक रुपयाने वाढला असून, त्यामुळे "पीएमपी'च्या डिझेल खर्चात रोज सत्तर हजार रुपयांनी; तर वर्षाला तीन कोटी रुपयांनी वाढ होणार आहे.

"पीएमपी'च्या बसगाड्यांना दररोज 55 हजार लिटर डिझेल लागते. केंद्र सरकारने डिझेलच्या दरात एक रुपयाने वाढ केली आहे. त्यामुळे "पीएमपी'च्या डिझेलच्या दैनंदिन खर्चात 55 हजार रुपयांची वाढ झाली आहे; तसेच "पीएमपी'ने भाडेकराराने घेतलेल्या दोनशे बसगाड्यांसाठीच्या बिलात सुमारे दहा हजार रुपयांची वाढ होणार आहे. याशिवाय अन्य कर धरून रोज लागणाऱ्या डिझेलच्या खर्चात सुमारे सत्तर हजार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे "पीएमपी'चा डिझेलवरील खर्च दर वर्षाला सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांनी वाढणार आहे.

पीएमटी-पीसीएमटीचे विलीनीकरण होऊनही कंपनीचा तोटा कमी झालेला नाही. "पीएमपी'स दररोज सुमारे 60 लाख रुपये उत्पन्न मिळते, तर 68 लाख रुपयांचा खर्च आहे.

अशाप्रकारे सार्वजनिक वाहतुकीची दरवाढ झाली, तर नागरिक खासगी वाहन वापरण्याकडे प्रवृत्त होतील. थोडक्‍यात एकीकडे नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीकडे आकर्षित व्हावे, यासाठी विविध योजना राबवायच्या आणि दुसरीकडे दरवाढ करून त्यांना दूर ढकलायचे. असे चालू राहिल्यास शहरातील रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी होण्याऐवजी वाढेल, यात शंका नाही. आपल्याला काय वाटते याविषयी. सार्वजनिक वाहतुकीमध्ये दरवाढ व्हावी का? दरवाढ प्रवाशांसाठी अन्यायकारक ठरेल का? पीएमपी फायद्यात जावी, यासाठी पीएमपीने काय करावे..., असे तुम्हाला वाटते.