व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>
Showing posts with label marathi sahitya samelan. Show all posts
Showing posts with label marathi sahitya samelan. Show all posts

संमेलन सॅन फ्रान्सिस्कोत होणारच - कौतिकराव ठाले- पाटील

एक संमेलन परदेशात घेतले तर काही आकाश कोसळणार नाही. गाडीने रुळ बदलले, की खडखडाट होणारच. अपघात होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. राहिला प्रश्‍न प्रकाशकांचा. संमेलनात पुस्तक विक्री करून नफा कमाविणारे प्रकाशक एक टक्का नफा तरी महामंडळाला देतात का? संमेलनाने आम्हाला द्यावे; पण आम्ही त्यांना देणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. संमेलने झालीच नसती, तर त्यांनी काय केले असते? असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले- पाटील यांनी सांगितले.

कौतिकराव ठाले- पाटलांची ही भूमिका योग्य आहे का?

साहित्य महामंडळावर "ब्लॉगविश्‍वा'तून टीकास्त्र

"ई-सकाळ'वर प्रतिक्रिया ः परदेशात संमेलनास विरोधाची संख्या अधिक

"फुकटात परदेशवारीची हौस' ते "सातासमुद्रापार गेल्याचा आनंद' अशा प्रतिक्रियांचा हिंदोळा "ई-सकाळ'च्या ब्लॉग्जवर रविवारी आणि सोमवारी अनुभवास आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्कोमध्ये घेण्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या निर्णयावर "सकाळ ब्लॉग' आणि "पुणे प्रतिबिंब' ब्लॉगवर अशा दोन्ही टोकांच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. त्यातही साहित्य महामंडळाच्या निर्णयावर टीकेचा रोख असणाऱ्या प्रतिक्रियांची संख्या अधिक आहे, हे विशेष.

मराठी साहित्याचे बहुसंख्य रसिकजन महाराष्ट्रात असतील, तर हे साहित्य संमेलन अमेरिकेत भरविण्याची गरजच काय, असा प्रश्‍न काही साहित्यप्रेमींनी उपस्थित केला. संमेलनाच्या नावाखाली साहित्यिकांची परदेश वारी करण्याची हौस भागविली जात असल्याचा आरोपही अनेकांनी केला. याबाबत श्रीधर, योगेश, प्रसाद म्हणाले, ""अमेरिकेच्या तुलनेने महाराष्ट्रात साहित्य रसिकांची संख्या निश्‍चितच मोठी आहे. हे रसिक संमेलनाला मुकणार नाहीत, याचा विचार झाला पाहिजे. सर्वप्रथम अमेरिकेतील नव्या पिढीत मराठी विषयीची गोडी निर्माण केली पाहिजे; अन्यथा अमेरिकेतील हे संमेलन केवळ फार्स ठरेल.

''मागील संमेलनाचा दाखला देताना काही वाचक म्हणाले, ""मागील वर्षी संमेलनात ग्रामीण भागातील साहित्यिकही सहभागी झाले होते. त्यांना या वर्षी संमेलनापासून वंचित ठेवण्याचे काम साहित्य मंडळ करत आहे. केवळ 70 साहित्यिकांच्या परदेशवारीसाठी एक कोटी खर्च करण्याऐवजी त्या रकमेत विकासकामे करावीत आणि साहित्यिकांना स्वखर्चाने जाण्यास भाग पाडावे.''

रोहित कुलकर्णी यांनी हे संमेलन मराठी मातीत म्हणजे मुंबईत होण्याची गरज व्यक्त केली; तर ए. पी. जामखेडकर यांनी हे साहित्य संमेलन केवळ अनपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले.

संमेलनाचा निर्णय स्वार्थापोटी होत असल्याचा खेद व्यक्त करताना शेफाली जोशी, बालाजी पवार, संदीप दळवी म्हणाले, ""केवळ मूठभर लोकांनी अशा प्रकारचा निर्णय घेणे मुळातच चुकीचा आहे. अशा निर्णयाने साहित्य मंडळ अप्रत्यक्षरीत्या येथील रसिकांचा सहभाग नाकारत आहे. अमेरिकेतील ज्या नागरिकांना मराठी साहित्याविषयी आत्मीयता आहे, त्यांनी महाराष्ट्रात येऊन संमेलनाला उपस्थित राहावे.''

""हे संमेलन एकाच वर्गाच्या हातात आहे, अशी शंका उपस्थित करणाऱ्यांच्या मनात त्यांच्याविषयी अधिकच कटुता वाढेल,'' अशी शक्‍यता एका वाचकाने व्यक्त केली. काही वाचकांनी या निर्णयाचे स्वागत केले. मराठीला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी हे संमेलन अमेरिकेत होणे आवश्‍यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्याबाबत सुभाष भाटे म्हणाले, ""आज महाराष्ट्रातील मोठा वर्ग अमेरिकेत स्थायिक आहे. तेथे हे मराठी बांधव मराठीचा झेंडा अभिमानाने फडकावीत आहे. त्यामध्ये अनेक साहित्यिकांचाही समावेश आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सॅनफ्रान्सिस्कोमध्ये होणाऱ्या संमेलनाचे स्वागत झालेच पाहिजे. त्याकडे संकुचित वृत्तीने बघणे सोडून दिले पाहिजे.''

आम्ही आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहोत...आपली मते या ब्लॉगवर जरूर नोंदवा..

साहित्य संमेलन सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये

ऐतिहासिक निर्णय ः पहिले आंतरखंडीय संमेलन

"इये मराठीचिये नगरी'तच आजवर 81 वर्षे रंगलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता सातासमुद्रापार निघाले असून, अमेरिकेत सॅनफ्रॅन्सिस्को (कॅलिफोर्निया) येथे फेब्रुवारी 2009 मध्ये आयोजित केले जाईल. साहित्य संमेलनाच्या इतिहासात संमेलन परदेशी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

याच बैठकीत आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला. निवडणूक झाल्यास 26 सप्टेंबर रोजी नूतन अध्यक्ष निश्‍चित होतील. "अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा'च्या पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय बहुमताने घेण्यात आल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली.

ठाले-पाटील म्हणाले, ""महामंडळाकडे परदेशातील संस्थेकडून संमेलन आयोजित करण्यासाठी प्रथमच आलेल्या निमंत्रणावर बैठकीत सखोल चर्चा झाली; तसेच रत्नागिरी, ठाणे, परभणी येथील निमंत्रणांचीही चर्चा झाली. परदेशातून निमंत्रण येण्याची घटना "ऐतिहासिक' आहे. ज्या संस्थेने निमंत्रण पाठवले आहे ती "बे एरिया महाराष्ट्र मंडळ' ही संस्था तेथे गेली 25 वर्षे मराठी मंडळींसाठी कार्यरत आहे. त्यांच्या कार्याचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने त्यांनी मोठा आर्थिक भार उचलून संमेलनाचे निमंत्रण दिले आहे. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन महामंडळाने हे निमंत्रण स्वीकारले.''परदेशात संमेलन घेण्याबाबत महामंडळाची घटना काय सांगते, या प्रश्‍नावर "जेथे मराठी माणूस आहे तेथे संमेलन होऊ शकते,' असा घटनेत उल्लेख असल्याचे ठाले-पाटील यांनी स्पष्ट केले.

जेथे मराठी माणूस आहे तेथे संमेलन होऊ शकते,' असे ठाले-पाटील यांनी स्पष्ट केले असले, तरी मराठी माणसांची संख्याही विचारात घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातला माणूया या संमेलनाची अतुरतेने वाट पाहत असतो. अशा वेळी संमेलन सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये घेणे योग्य वाटते का? हा मराठी माणसावरील अन्याय नाही काय?