व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>
Showing posts with label Traffic Problem.. Show all posts
Showing posts with label Traffic Problem.. Show all posts

पोलिसांचा नाकर्तेपणा...

सिंहगड रस्त्यावरील राधिका सोसायटीतील मुलांनी मे महिन्याच्या सुट्टीत खेळ खेळण्याऐवजी वाहतुकीला शिस्त लावण्याचे ठरवले आणि स्वत रस्त्यावर उतरून वाहनचालकांना वाहतूकविषयक नियमांचे धडे दिले. पु. ल. उद्यानाजवळील चौकात एका छायाचित्रकाराने हे छायाचित्र टिपले. मागील आठवड्यातही शालेय विद्यार्थ्यांनी अशाचप्रकारचा उपक्रम राबविला. त्याबाबतचे छायाचित्र आम्ही पुणे प्रतिबिंबच्या ब्लॉगवर दिले होते. शिवाय त्यावर वाचकांच्या प्रतिक्रियाही मागविल्या होत्या. आणि आश्‍चर्याची बाब म्हणजे, अनेक वाचकांनी आपली मते या ब्लॉगच्या माध्यमातून नोंदविली.

योगेश नावाच्या वाचकाने या उपक्रमाचे कौतुक केले. की लहान मुलांकडून वाहतुकीचे धडे घ्यावे लागत आहेत, या लाजेखातर वाहतुकीचे नियम पाळण्याची प्रवृत्ती बळावेल. मात्र, त्यासाठी मुलांना उन्हात किती वेळ उभे करणार, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. तर कोलकत्त्यामध्ये स्थायिक झालेले राहुल म्हणाले, की कोलकत्त्यामध्ये वाहतूक अत्यंत चांगली आहे. येथे वाहनचालक कटाक्षाने नियम पाळतात. झेब्रा क्रॉसिंगच्या मागे गाड्या थांबवतात. दुचाकीवरून केवळ दोन जणच प्रवास करतात. असेच चित्र पुण्यात निर्माण झाल्यास वाहतुकीचे अनेक प्रश्‍न सुटण्यास मदत होईल.

वाहतूक पोलिसांच्या नाकर्तेपणामुळेच मुलांवर ही वेळ आल्याचे एका वाचकाचे म्हणणे आहे. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात हे पोलिस अपयशी ठरले असून, त्यांना अमेरिकेत नेऊन तेथील पोलिस दाखविले पाहिजे, अशी गरत या वाचकाने व्यक्त केली आहे. तर, एका वाचकाने मुलांना अशा तऱ्हेने रस्त्यात उभे करणे धोक्‍याचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. पोलिस कुठे आहेत, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला आहे. तर, कॅप्स्तुभ यांनी, या प्रकरणातून पोलिसांचे नाकर्तेपण सिद्ध होत असल्याचे सांगितले आहे. श्रीकांत अत्रे आणि अभी यांनीही ब्लॉगवर आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

आजचे छायाचित्र पाहून आपल्यालाही व्यक्त व्हावेसे वाटते असेल...नाही का? तर त्वरित व्यक्त व्हा....

ओझ्याचा भार, अपघाती फार !

कर्वे रस्ता- शहरातील वाहतुकीला शिस्त नाही, असे नेहमीच म्हटले जाते. त्याचेच हे आणखी एक उदाहरण. भर गर्दीच्या रस्त्यावरून दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीने मोठ्या संख्येने "टायर'चा बोजा उचलला आहे. मात्र, त्याने हे ओझे पेलले असले, तरी त्याचा त्रास आसपासच्या वाहनांना सहन करावा लागत होता. वाहनांची मोठी गर्दी असणाऱ्या या रस्त्यावर त्यामुळे एखादा अपघातही घडू शकला असता. पण, इतरांची पर्वा करायची नाही, हा या वाहनचालकांचा होरा असतो. इतरांचा जीव संकटात टाकत असताना आपल्याही जीवाला याचा धोका पोहोचू शकतो, याची साधी जाणीवही त्यांना नसते. पुण्यातील काही रस्त्यांवरून कटाक्ष टाकला, तर असे अनेक दृश्‍य दृष्टीस पडतात.

एकीकडे बेशिस्त वाहतुकीच्या नावाने खडे फोडायचे आणि दुसरीकडे आपणच बेशिस्त वाहतुकीस कारणीभूत ठरायचे. हा प्रकार म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसण्याचा प्रकार आहे. इतर वाहनचालकांनी जरी अशा वाहतुकीस अटकाव केला, तर बरेच प्रश्‍न सुटू शकतील, असे वाटते. अशा वाहनचालकांविरोधात काय केले पाहिजे, असे तुम्हाला वाटते. तर आपली मते इथे जरूर नोंदवा...

येत्या वर्षभरात पुण्यात आणखी ३५ हजार मोटारी?

दुचाकी घ्यायची की मोटार, असा पर्याय टाटा कंपनीच्या एक लाख रुपयांच्या मोटारीमुळे ग्राहकांना मिळणार आहे. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाने (असोचेम) केलेल्या पाहणीत, दुचाकी वाहनांची २५ टक्के बाजारपेठ ही मोटार काबीज करेल, असे दिसून आले आहे. ....

पुण्यातील दुचाकींच्या एवढ्या ग्राहकांनी या मोटारीला पसंती दिल्यास वर्षभरात आणखी सुमारे ३५ हजार मोटारी शहरातील रस्त्यांवरून धावू लागतील.


जगातील वाहनउद्योगाचे लक्ष वेधून घेतलेल्या टाटा कंपनीच्या एक लाखाच्या मोटारीचे दर्शन गुरुवारी दिल्लीतील "ऑटो एक्‍स्पो' प्रदर्शनात झाले. टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे स्वप्न या मोटारीमुळे साकारले. देशातील मध्यम व कनिष्ठ मध्यम वर्गाच्या स्वत:च्या मोटारीची स्वप्नपूर्ती या मोटारीमुळे शक्‍य होईल. त्यामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात कसे असेल, या उत्सुकतेपोटी त्यांचेही डोळे या मोटारीकडे होते.

"टाटा मोटर्स'चे पुण्यातील वितरक बी. यू. भंडारी आणि पंडित ऑटोमोटिव्ह यांच्या शोरूममध्ये दिवाळीपासूनच या मोटारींची विचारपूस ग्राहकांकडून होत आहे. माध्यमांमधून या मोटारीची चर्चा होऊ लागल्यावर मोटारीची माहिती घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. उद्या प्रदर्शनात "दर्शन' देणारी ही मोटार विक्रीसाठी येत्या जूनपर्यंत उपलब्ध होईल, असे सांगण्यात येत आहे. या मोटारीची चाचणी गेल्या काही महिन्यांपासून पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग व कात्रज घाटात करण्यात आली. मात्र, मोटारीची ओळख गुलदस्तात ठेवण्यासाठी त्यावर आवरणे घालून चाचणी झाली. ६६० सीसी क्षमतेची ही मोटार प्रतिस्पर्धी कंपनीच्या आठशे सीसी मोटारीची बरोबरी करणारी आहे, असे सांगण्यात आले.

पुण्यातील वाहनांची संख्या १५ लाख, तर पिंपरी-चिंचवडमधील वाहनांची संख्या पाच लाखांवर पोचली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या वर्षभरात दीड लाख दुचाकी वाहनांची नोंद झाली. "असोचेम'च्या पाहणीनुसार, यातील २५ टक्के वाटा या मोटारीला मिळाल्यास वर्षभरात ३५ हजार मोटारी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये धावताना दिसतील. या मोटारीच्या माध्यमातून साकारणारे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही रक्कम जादा मोजावी लागल्यास त्याचीही तयारी पाहणीतील ९० टक्के जणांनी दाखविली आहे.

आता, प्रश्न फक्त इतकाच आहे, की आपले रस्ते इतक्या मोटारी सामावून घेण्याइतके सक्षम आहेत का...?
-- मनीष कांबळे

नववर्षाचे स्वागत जरा जपूनच करा...

"नववर्षाचे उत्साही स्वागत जरा जपूनच करा...!' असा संदेश पोलिसांनी दिला आहे. सोमवारी (ता. 31) रात्री शहरात विविध ठिकाणी अचानक "नो टॉलरन्स झोन' जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता वाहतुकीसाठी एका बाजूने बंद करण्यात येणार आहे.

नववर्षाचे स्वागत करताना शहरात गोंधळ होऊ नये, म्हणून पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. या दिवशी अचानक "नो टॉलरन्स झोन' जाहीर करण्यात येत असून, वाहनचालकांनी वाहनाची मूळ कागदपत्रे जवळ बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रस्त्यांवर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. या काळात संपूर्ण शहरात जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर अडथळे उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त महेश घुर्ये यांनी दिली आहे.

दंड आकारणार
वेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांकडून पाचशे रुपये, तर मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांना सहा महिने शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड, अशी कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी "अल्कोमीटर' आणि "ब्रिथ ऍनालायझर'मार्फत तपासणी केली जाणार आहे.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घालण्यात आलेली ध्वनिक्षेपकावरील मर्यादा या रात्री बारा वाजेपर्यंत शिथिल ठेवण्यात आली आहे. मात्र, आवाजाची पातळी 75 डेसिबलपेक्षा अधिक नसावी, असे बजावण्यात आले आहे. तसेच नववर्षानिमित्त हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट-पब पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.खडकवासला धरण आणि सिंहगड परिसरात या दिवशी मोठी गर्दी होत असल्याचे लक्षात घेऊन कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

कितीही पोलिस बंदोबस्त ठेवला, किंवा विविध नियम लागू केले, तरी पोलिसांचा डोळा चुकवून थर्टी फ र्स्ट सेलिब्रेट करणारे महाभाग कमी नाहीत. शिवाय सेलिब्रेशनमधील अडथळा या तरुणांना सहन होणाराही नाही. त्यातूनच मग कधी अरेरावीमुळे, तर कधी पोलिसांच्या अतिशिस्तीमुळे सेलिब्रेशनला गालबोट लागण्याची शक्‍यता असते. त्यामुळे समजुतीच्या सुरात आणि वैध मार्गाने केलेल्या सेलिब्रेशनचे महत्त्व पटवून देण्याचे महत्त्वाचे काम पोलिसांना करावे लागणार आहे. शिवाय तरुणांनीही या सर्व गोष्टींची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. तरच, येणारं वर्ष सर्वांना सुख, समाधानाचं जाईल. बरोबर ना...!

वाहतूक समितीची पुणेकरांना टोपी

पुण्यातील वाहतुकीच्या गंभीर प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने पुणेकरांनाच "टोपी' घातली आहे. बरोबर तीन महिन्यांपूर्वी (12 सप्टेंबर) नेमण्यात आलेल्या समितीला बैठक घेण्यासाठी अद्याप मुहूर्तच मिळाला नाही. त्यामुळे अपघात व वाहतूक कोंडीचे पुणेकरांचे चक्र तूर्त तरी कायमच राहिले आहे.

बेशिस्त वाहनचालक व बेफाम वाहने चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिस व प्रादेशिक परिवहन खात्याचे नसलेले नियंत्रण, अपघातांची वाढलेली संख्या, अकार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे खासगी वाहनांच्या संख्येत वेगाने होणारी वाढ, वाहनतळाच्या सोयीअभावी रस्ता व्यापून उभी राहणारी वाहने व कोणत्याही भागात कधीही होणारी वाहतूक कोंडी या कारणांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था धोक्‍यात आली आली आहे. या प्रश्नाकडे "सकाळ'ने "जागर'च्या माध्यमातून आवाज उठविला होता. आमदार चंद्रकांत छाजेड यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याकडे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन नगरविकास राज्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली होती. 12 सप्टेंबरला समिती अस्तित्वात आली.

राज्याच्या मुख्य सचिवांऐवजी नगरविकास विभागाचे अतिरिक्‍त मुख्य सचिव रामानंद तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. समितीच्या राजपत्रात "जनतेतून आलेली मागणी व विधिमंडळात उपस्थित झालेल्या प्रश्‍नावरून समिती नेमण्यात येत आहे,' असे नमूद केले होते. महिनाभरात पहिली बैठक घेण्यात येईल, असे त्या वेळी सांगण्यात आले होते. मात्र, समिती अस्तित्वात येऊन आज तीन महिने पूर्ण झाले तरी समितीची बैठक झालेली नाही. बैठक न घेता अपघात व वाहतूक कोंडीत सापडलेल्या पुणेकरांनाच "टोपी' घालण्याचे काम समितीने केले आहे.

एखाद्या विषयात गुंतागुंत निर्माण झाली, की समिती नेमायची आणि तिढा सोडविण्याचा प्रयत्न करायचा, ही आपल्याकडील जुनी पद्धत. नागरिकही या समित्यांकडून विशेष आशा ठेवतात. पण, समितीने पुणेकरांना टोपी घातल्याने त्यांच्यावरील विश्‍वासाला तडा गेला आहे. यापुढे अशा समित्यांवर विश्‍वास ठेवायचा की नाही याचा विचार केला गेला पाहिजे.

दुचाकीचालक, पादचाऱ्यांना सर्वाधिक अपघात

अरुंद रस्ते, वाहनांची वाढती संख्या आणि पदपथांवरील अतिक्रमण यामुळे शहरातील दुचाकीचालक आणि पादचारी यांच्यावर अपघाताची सतत टांगती तलवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण अपघातांपैकी 64 टक्के अपघात यांच्याशी निगडित आहेत.

पुणे परिसरात गेल्या सहा महिन्यांत अपघातात जखमी झालेल्या चार हजार 287 रुग्णांपैकी एक हजार 433 जण (33.4 टक्के) दुचाकीचालक होते, तर 542 जण (12.6 टक्के) दुचाकीवर मागे बसले होते. 789 पादचारीही (18.4 टक्के) वेगवेगळ्या अपघातांमध्ये जखमी झाले आहेत. एकूण अपघातग्रस्तांपैकी 64.4 टक्के यांच्याशी संबंधित आहेत. यावरून शहरातील दुचाकीचालक आणि पादचारी सर्वाधिक असुरक्षित असल्याचे स्पष्ट होते.

सर्वांत कमी अपघाताची नोंद रिक्षातील प्रवाशांची आहे. 97 प्रवाशांचा (2.4 टक्के) रिक्षातून प्रवास करताना अपघात झाला. बसमधून प्रवास करणाऱ्या 125 जणांचा (2.9 टक्के) आणि मोटारीतून प्रवास करणाऱ्या 127 जणांचा (2.9 टक्के) अपघात झाल्याची नोंद आहे. याआधारे सर्वसामान्य नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक हे सर्वांत सुरक्षित साधन असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

प्रमुख रस्त्यांवर झालेल्या अपघातात एक हजार 788 जण (68 टक्के), अंतर्गत रस्त्यांवर 262 जण (10 टक्के) जखमी झाले. शहराला येणाऱ्या महामार्गांवर झालेल्या अपघातात 442 (16.8 टक्के) जण जखमी झाले. रस्त्यात पडलेल्या खडीवरून गाडी घसरून अपघात झाल्याने 827 जण (19.3 टक्के), तर वाहनाची धडक बसून 639 पादचारी (14.9 टक्के) जखमी झाले. यावरून रस्त्याची दुरवस्था स्पष्ट होते. गाडीला बाजूने धडक बसून 305 जण (7.1 टक्के) आणि मागून धडक बसून 329 जण (7.7 टक्के) जखमी झाले.

अरुंद रस्ते असल्याने अशा प्रकारच्या अपघातांची संख्या वाढते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.


हेल्मेट, सीट बेल्ट...?
दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एक हजार 975 अपघातग्रस्तांपैकी फक्त 149 जणांनी हेल्मेट घातले होते. त्यापैकी 39 जण हेल्मेट घालून गाडीवर मागे बसले होते. हेल्मेट न घातल्याने 610 जणांच्या डोक्‍याला मार लागला; तसेच मोटार अपघातात जखमी झालेल्या 201 पैकी अवघ्या 22 जणांनी (10.9 टक्के) "सीट बेल्ट' लावला होता.

पादचारी आणि दुचाकीचालक यांच्या अपघाताचे प्रमाण मोठे असले, तरी दोष कोणाला द्यायचा? पादचाऱ्यांना, दुचाकीचालकांना, अवजड वाहतूकदारांना, की रस्त्याच्या दुरवस्थेस कारणीभूत असलेल्या प्रशासनाला...?

बघ्याची भूमिकाच निम्म्या जखमींच्या मृत्यूला जबाबदार

अपघात कोठेही आणि कसलाही असो, पुणेकर फक्त बघ्याची भूमिका घेतात, हे नुकताच स्पष्ट झाले. गेल्या सहा महिन्यांत पुणे परिसरात झालेल्या अपघातांपैकी 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळाली नाही. त्यामुळेच 95 जणांना प्राणास मुकावे लागले आहे.

केंद्र सरकारने हाती घेतलेल्या "नॅशनल रोड ट्रॅफिक इंज्युरीज कंट्रोल प्रोग्रॅम'अंतर्गत पुणे आणि बंगळूर या शहरांमधील रस्त्यांवर होणाऱ्या अपघाताबाबतचा पथदर्शी प्रकल्प तयार करण्यात आला. त्यामध्ये या वर्षी एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बारा रुग्णालयांमधून घेतलेल्या माहितीच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला.

गेल्या सहा महिन्यांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात 4287 जण रस्त्यांवरील अपघातांत जखमी झाले. त्यांपैकी 2831 जण (66 टक्के) पुणे परिसरातील, तर 759 जण (17.70 टक्के) पुण्याबाहेरील अपघातांत जखमी झाले आहेत. उर्वरित 697 जणांच्या अपघातस्थळाबाबत माहिती मिळू शकली नाही.एकूण अपघातग्रस्तांपैकी 2136 जणांवर (49.8 टक्के) प्रथमोपचार करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. अपघातस्थळी फक्त 167 जणांना (3.9 टक्के) मदत मिळाली. उर्वरित रुग्णांवर रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच उपचार सुरू झाले. वेळीच मदत न मिळाल्याने 95 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यातूनच अपघातस्थळी वेळीच मदत न करण्याची मानसिकता स्पष्ट होते.
- योगीराज प्रभुणे

रस्त्यावरील अपघातातील मृत्यूंची संख्या देशात वाढत आहे. गेल्या वर्षभरात एक लाख जणांना यात प्राण गमवावे लागले. या मृत्यूंची संख्या कमी करणे आपल्याही हातात आहे. कारण अपघात झाल्यानंतरचा जो काळ असतो त्याला गोल्डन आवर म्हटले जाते. या वेळेत रुग्णाला उपचार मिळाले, रुग्ण वाचण्याची शक्‍यता वाढू शकते. आता आपणच ठरवा, आपण रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरायचे की, त्याचा जीव वाचविण्यास...

"हॉर्न प्लीज'ला आता हवा "स्टॉप'...!

सहकार सदन रस्ता - कर्णकर्कश "हॉर्न' वाजवत रस्त्याने बेफाम गाड्या चालविणाऱ्या वाहनचालकांची संख्या शहरात वाढत आहे. मात्र, या हॉर्नमुळे नागरिकांना विनाकारणच त्रास सहन करावा लागतो; म्हणून "हॉर्न'चा वापर कमी करण्याचे आवाहन फलकांवर संदेश लिहून केले जात आहे. "हॉर्न'मुळे होणाऱ्या त्रासापासून नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी प्रल्हाद राठी यांनी पुढाकार घेतला आहे.

एखादा बळी गेल्यावरच काम होणार का?



वाढती वाहतूक आणि पादचाऱ्यांची सुरक्षितता, या गोष्टींचा विचार करून विविध ठिकाणी भुयारी मार्ग किंवा फ्लायओव्हर बांधण्यात येतात. आपण मागे याच ब्लॉगवर अशा सुविधांचा कितीसा वापर होतो, याविषयावर चर्चा केली होती. असे असले, तरी ज्या ठिकाणी त्यांचा वापर निश्‍चित होईल, नव्हे या सुविधा आवश्‍यकच आहेत, तेथे मात्र ही कामे रखडलेली दिसतात. उदाहरणच द्यायचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) येथील रस्त्याचे देता येईल. प्रचंड ट्रॅफिकमधून जीव मुठीत घेऊन हा रस्ता क्रॉस करावा लागतो. त्या रस्त्यावर भुयारी मार्ग मंजूर झाला आहे. नुसता मंजूरच नाही, तर तिथले भूमिपूजनही झाले आहे. तरीही रस्ता रखडला तो रखडलाच.
काय करावं अशा वेळी? ही फिल्म पाहिली, की तिथला धोका जाणवतो. तो जसा आपल्याला जाणवतो, तसाच प्रशासनालाही जाणवत असेल. तरीही ही मंडळी गप्प का? एखादा बळी गेल्यावरच हे काम पूर्ण होणार आहे का?

बोजवारा



कोट्यवधी रुपये खर्चून मोठमोठाले पूल बांधूनही वाहतुकीचा उडालेला बोजवारा क्वचितच पाहायला मिळतो. मात्र, पुणे विद्यापीठ चौकात वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. रुंद पूल, अरुंद रस्ते आणि बंद पडलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते आहे. अशा या बेशिस्त वाहतुकीपुढे पोलिसही हतबल झाले असून, नागरिकांनीही महापालिकेपुढे हात टेकले आहेत. आता तुम्हीच सांगा काय करायचं विद्यापीठ चौकातील वाहतूक सुधारण्यासाठी???