व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

अनुभवाचा धडा...तुम्ही काय शिकला?

शाळेत, कॉलेजमध्ये खरच खूप गोष्टी शिकवल्या जातात, पण आपण त्या खरचं शिकतो का? इतक्‍या साध्या साध्या गोष्टी असतात मात्र जोपर्यंत आपण स्वतः त्या अनुभवत नाही तोपर्यंत आपण त्या "शिकत' नाही.

"अनुभव हा सर्वांत उत्तम गुरू आहे. तुम्हीही या "सरां'कडून आयुष्यात छोटा मोठा धडा गिरवला असेलच ना! मग "शिक्षक दिना'च्या निमित्ताने तो आमच्याबरोबरही शेअर करा.
तुम्ही ई मेलही करू शकता...pailteer@esakal.com वर.
---------------------------------


भिरकावलेली डिश


शाळेत असताना "अन्न हे पूर्णब्रह्म' हे शिकले होते, पण हे शिकलेलं समजून घ्यायला मात्र बरीच वर्षं जावी लागली. गोष्ट छोटीच होती, पण बरंच शिकवून गेली.

अकरावी-बारावीत असताना लेक्‍चर, प्रॅक्‍टीकल करुन कॉलेज मधून परत यायचे तेव्हा प्रचंड भूक लागलेली असायची. कधी एकदा जेवण समोर येतय असं होऊन जायचं.

एकदा अशीच भुकेने कलकलून घरी आले होते. आईला थोडसं बरं वाटत नव्हतं म्हणून तिने रोजच्या स्वयंपाकाला रजा देऊन फक्त पोहे केले होते.

साग्रसंगीत जेवणाच्या अपेक्षेने बसल्यानंतर समोर पोहे बघून प्रचंड चिडचिड झाली. मला पोहे नको, म्हणून तणतणत पोह्यांची डिश मी ढकलून दिली. सगळे पोहे सांडले. मी रागातच तशीच जाऊन पडून राहिले. आई मला तेव्हा काहीच बोलली नाही.

ही गोष्ट मी काही दिवसांनी विसरुनही गेले.

बारावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी मी पुण्याला आले. मेसमधला नाश्‍ता, जेवण करताना घरच्या जेवणाची खूप आठवण यायची. जेव्हा सुटीला म्हणून पहिल्यांदा घरी आले, तेव्हा आईने नाश्‍त्याला काय करु, असे विचारल्यावर पटकन म्हणाले,"" काहीही कर गं! पोहेही चालतील...''
आणि त्याचक्षणी मला ती भिरकावलेली पोह्यांची डिश आठवली. त्यावेळी केलेला माज आठवला. भुकेच्या वेळी समोर येणाऱ्या अन्नाचं महत्त्व खऱ्या अर्थाने पटलं. त्यानंतर मात्र कधीही पानावर बसल्यावर "हेच हवं, तेच हवं हे आवडतं, हे आवडत नाही' असला हट्ट केला नाही. पानात कधीच काही टाकलं नाही. अन्न हे पूर्णब्रह्म समजूनच खाल्लं.

- अमृता रावण

---------------------------------


रेल्वेतली बाई


महालक्ष्मी एक्‍स्प्रेस...माणसांनी ठचाठच भरलेली...मी मुंबईहून पुण्यापर्यंत निघाले होते...दिवसभर काम करून गाडीत जरा झोप घ्यायची असं ठरवलं होतं पण गाडीत गर्दी इतकी की बसायला मिळालं हीच गोष्ट फार वाटली.

जरा स्थिरस्थावर झाले, आजूबाजूला नजर टाकली...गर्दी जरा गावाकडची होती...म्हणजे शहरी नक्कीच नव्हती. माझ्यासारख्या दोन-चार मुंबईला चढलेल्या मुली होत्या पण बाकी सगळे बहुधा गावाकडे चालले होते. महिलांच्या डब्यात अर्थात मुलंही कोंबली होती. तीही जागा सापडवून खेळायचा प्रयत्न करत होती.

थोड्या वेळानं सगळ्यांनी खाणं-पिणं सुरू केलं. डबा इतका अस्वच्छ होता की घरी जाऊन फ्रेश झाल्यावरच जेऊ या विचाराशिवाय आणखी काही करता येणं अवघड होतं. खिडकीशी बसलेल्या बाईनं तिचा "डबा' उघडला. रुमालात बांधलेली भाकरीची थप्पी, त्यावरच भात, त्यावर भाजी आणि खर्डा...बाई जेवत होती, जेवायचं का असं तिनं मुलांना विचारलं आणि ती नाही म्हणल्यावर फार आग्रह केला नाही. अचानक तिच्या मुलानं रुमालातला भात मुठीत भरून घेतला आणि तो गाडीत सगळीकडे भात उडवायला लागला. गाडीतल्या सगळ्यांचेच चेहरे तुसडे झाले. त्याची आई त्याला काही बोलेना. मग गाडीतल्याच कोणीतरी त्या बाईलाही खडसावलं. तरी ती बाई फारसा रिस्पॉन्स देत नव्हती. शेवटी तिनं मुलाला दोन लगावल्या आणि खिडकीबाहेर बघत बसली.

शेजारणीनं तिला विचारलं तेव्हा तिनं सांगितलं, की ती नवऱ्याला शोधायला मुंबईला आली होती. दोन मुलांना घेऊन...नवरा मुंबईला काम करतो इतकीच तिला माहिती...तो आत्तापर्यंत फक्त दोनदाच गावाला आला होता, आणि पदरात दोन मुलं टाकून गेला. सासरी हाकलून लावलं म्हणून ती नवऱ्याला शोधायला आली होती. तो मिळाला नाही, म्हणून गावाकडे जाणाऱ्या गाडीत बसली. सासरी तर जाताच येणार नव्हतं. त्यामुळे आता पुढे कुठे जावं याची विचार करत होती. मुलानं इतर प्रवाशांच्या अंगावर खरकटं उडवणं तिला दिसूनही दिसत नव्हतं.

तिचं ऐकून गाडीतले सगळे तुसडे चेहरे बदलले. गाववाले, शहरी...सगळेच...त्या बाईचा चेहरा अजून डोळ्यापुढे आहे माझ्या...मुलांना घेऊन आता उतरायचं कुठे आणि राहायचं कुठे आणि खायचं काय असे प्रश्‍न होते तिच्यापुढे...आणि आम्ही गाडीत कसं वागावं याचे धडे देत होतो तिला...

तेव्हा फार जाणवलं, की आपल्याला माणूस दिसतो त्याच्या पलीकडे कितीतरी अधिक असतो.

पटापट निष्कर्षप्रत यायची घाई असते ती आपल्याला...पण समोरच्याच्या वागण्याचा काही निराळा अर्थ असू शकतो, पेक्षा ते वागणं जरी "चुकीचं' असेल तरी त्यामागचं कारण मोठं असू शकतं याची जाणीव त्या दिवशी तीव्रतेनं झाली...आता कधीही, कोणीही, कसंही वागलं तरी, यामागे काहीतरी कारण असू शकेल हा शक्‍यतेचा एक टक्का मी कायम राखून ठेवते. त्यामुळे न्यायाधिशाच्या खुर्चीतून पायउतार होऊन परिस्थिती नितळपणानं बघण्यासाठी प्रयत्न करता येतो ...

- चित्रा वाळिंबे


---------------------------------

नावडती उसळ

संजीवन विद्यालय. निसर्गरम्य पाचगणीतील सर्वात जुन्या शाळांपैकी एक. माझ्या बालमनावर संस्कार करणारी ही पहिली शाळा. शिस्त हा या शाळेचा आद्य मंत्रच होता. शरदनाना पंडित हे आमचे प्रिन्सिपॉल. या शाळेला "हिंदू कॉन्व्हेंट' असे म्हटले, तर ते वावगं ठरणार नाही. शाळेची शिस्त शक्‍यतो कोणी मोडण्याचा प्रयत्न करत नसे. परंतु, बालवयातील हूडपणा काही वेळा अचानक उफाळून येणारच. शिस्तभंगाबद्दल माझ्या सहाध्यायी मित्रांबरोबरच मलाही अनेकवेळा शिक्षा झाल्या. मात्र, या शिक्षा शारीरिक स्वरूपाच्या कधीच नसत. अर्थातच मनावर त्यांचा खोल ठसा उमटत असे.

त्या काळी आमचे वर्ग आताच्या सारखे एकाच इमारतीमध्ये नसत. शिक्षक एकाच वर्गात व विद्यार्थी या वर्गातून त्या वर्गात, असा दिवसभर प्रवास चालू असे. हे वर्गही वेगवेगळ्या ठिकाणी असत. डोंगराळ प्रदेशामुळे चालण्याचा आणि हिरवाईमुळे नेत्रसुखाचा आनंद कायम मिळत असे. आमचा डायनिंग हॉल दरीच्या काठाजवळ होता. डायनिंग हॉलच्या मागे डोंगरउतार व अगदी काठावर झाडांची गर्दी असे. त्यात बांबूची अनेक बनं होती.

डायनिंग हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हात धुवावेच लागत. विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवण्यासाठी एक शिक्षक तेथे उभे असत. त्यांना चुकवून कोणालाही जाता येत नसे. प्रत्यक्ष हॉलमध्ये बारा जण बसतील एवढी मोठी टेबल्स असत. प्रत्येक टेबलावर यजमानाच्या जागी बसत एक शिक्षक. उत्तम बल्लवाचार्यंमुळं जेवण रुचकर असायचं. वाढपी प्रत्येकाला हवं-नको पाहून वाढत असत. मात्र, आवडो किंवा न आवडो, केलेला कोणताही पदार्थ पहिल्यांदा घ्यावाच लागत असे. न आवडणारा पदार्थ असला, तरी तो संपवावाच लागे.

जेवणास सुरवात करण्यापूर्वी "या कुंदेंदु तुषार हार धवला' हा श्‍लोक म्हणण्याची प्रथा होती. पुढील आयुष्यात इंग्रजाळलेल्या मनोवृत्तीमुळे श्‍लोकांशी फारसा संबंध आला नाही. तरीही शाळेत वेळोवेळी म्हटले जाणारे अनेक श्‍लोक, आजही तोंडपाठ आहेत. तर, एके दिवशी मसुरीची उसळ करण्यात आली होती. माझ्या अत्यंत नावडत्या पदार्थांमध्ये मसुरीचा क्रमांक अगदी वरचा ! पानात ही उसळ पाहिल्यावर माझ्या अंगावर काटा आला. कुसुमताई भुस्कुटे या माझ्या आवडत्या शिक्षिका. नेहमी त्याच आमच्या टेबलावर असायच्या. मी चोरट्या नजरेनं त्यांच्याकडं पाहिलं. त्याही माझ्याचकडं पाहात होत्या. कदाचित माझी नावड त्यांना माहित असावी. त्या पुण्याच्या असल्यामुळं, माझा एखादा अपराध पोटात घालतील, असं वाटलं. पण, कसचं काय आणि फाटक्‍यात पाय. चष्म्याआडून त्यांचे मिश्‍किल डोळे, मला ती उसळ संपवलीच पाहिजे, असंच सांगत होते. पानातील सर्व पदार्थ संपले, तरी पहिल्यांदा वाढलेली मसुरीची उसळ काही संपली नव्हती. सगळ्या विद्यार्थीमित्रांचे जेवण संपलं होतं आणि मी उसळ कधी संपवतो, याची वाट पाहात माझ्याचकडे पाहात होते. अखेर ते जिवावरचं धाडस करण्यास मी सरसावलो आणि साधारण एका घासाएवढी ती उसळ एकदमच मुखात सारली. त्यावेळी मला ब्रह्मांड आठवलं. वांतीची भावना अगदी प्रबळ झाली. घास घेतल्यानंतर ढसाढसा पाणी प्यालो. पोटात ढवळू लागलं होतं. तरीही नेटानं हात धुवून बाहेर पडलो. त्यानंतर अनेक वेळा मला ही उसळ खावीच लागली. त्याची नावड हळूहळू कमी होत गेली. आज तर माझ्या आवडीच्या उसळींमध्ये तिनं आघाडीचं स्थान पटकावलं आहे.

- अरविंद तेलकर

---------------------------------


जमावाचा पडदा


त्या जमावाच्या पडद्यातून "तो' चेहरा मला दिसलाच नसता तर माझं काय झालं असतं?

मी कुठं जाणार आहे? माझे विचार काय आहेत? लोकांकडं मी बघतो तरी कसं?...खूप प्रश्‍न "तो' एक चेहरा एका क्षणात उभे करून गेला आणि सोळा वर्षं उलटली तरी अजून सगळ्या प्रश्‍नांची सोडवणूक झालीच नाही, असं वाटतं.

प्रसंग आहे डिसेंबर ९२ च्या दंगलीतला. उन्मादानं सारासार विवेक गमावण्याच्या काळातला. "पॉलिटिकल थिंकिंग' वगैरे काहीही न समजण्याच्या वयात आकर्षण वाटलं, ते जमावानं एकत्र फिरण्याचं. दहशत माजविण्याचं. आपण "आपल्यांबरोबर' आहोत आणि ते "बाहेरचे' आहेत, असं काहीसं वाटत होतं. त्या दिवशी दुपारी ठरलं, की "त्यांची' दुकानं फोडायची. जमाव निघाला. मीही त्याचाच एक भाग. बांगड्यांच्या त्या दुकानांसमोर जमाव आला आणि हातात मिळेल ती वस्तू दुकानांवर भिरकावून द्यायला सुरुवात झाली. दगड, विटा, स्टंप्स, लाल मातीची ढेकळं, लोखंडी सळया...

दुकानाला साध्या लाकडी फळ्यांचे दरवाजे होते. बाहेर दुकान आणि आत, वरच्या बाजूला "ते' राहात होते. फळ्या फोडून जमाव आत शिरला. बघता बघता बांगड्यांचा खच रस्त्यावर पडला. आमच्यातलेच काहीजण बांगड्यांवर नाचून नाचून त्याचा चुरा करू लागले...आरडा-ओरड्याने आणि भीतीदायक घोषणांनी "त्या' घरातली एकूण एक माणसं भेदरली असणार. कोणीच दिसत नव्हतं. दुकानातून घराकडं जाणारा दरवाजा बंद होता. बांगड्यांचा शब्दशः चक्काचूर होईल, तसा जमावाचा उन्माद हळू हळू ओसरत होता...

इतक्‍यात दुकानाच्या वरच्या मजल्याची लाकडी खिडकी किलकिली झाली. कोणीतरी हलकेच डोकावलं. आणि क्षणात खिडकी बंद झाली. अगदी घट्ट. तेवढ्यात मला "तो' चेहरा दिसला होता...

ती माझ्या मित्राची आई होती. मणेरची आई. तीन वर्षांपूर्वीपर्यंत तो माझा मित्र होता. नापास होऊन तो वर्गात मागे राहिला आणि मैत्रीही. त्याचीच ती आई. दुकान फोडलं ते त्यांचं होतं...

त्याची आई शाळेत सारखी यायची. मला खूप प्रेमानं जवळ घ्यायची. खाऊ द्यायची. "माझ्या इमुला शिकव की रे जरा तुझ्यासारखं...', असं सांगायची. माझ्या आईशी बोलायची. तिच्याकडं माझं कौतुक सांगायची. "याची मैतरी नको रे सोडू,' असं इमुला बजावून सांगायची...तीच ही आई. तिचंच दुकान जमावानं फोडलं होतं. क्रुरपणे तिथल्या एकूण एक बांगड्यांची वाट लावली होती. त्या जमावाचा मी एक भाग होतो...

सर्रकन अंगावर काटा आला. हातपाय लटपटले...

का आलो आपण इथं? तिनं आपल्याला पाहिलं का? पाहिलं असेल तर काय वाटलं असेल तिला? माझी आई आणि इमुची आई, यात फरक कसा काय करता येईल? कशासाठी आपण हे सगळं केलं? कोणी सांगितलं होतं? इमुच्या आईला या जमावानं मारलं असतं तर? ते बघू शकलो असतो का? जमावातले जर "आपले', तर इमु आणि त्याची आई हे "बाहेरचे' कसे?....

वयाला न झेपणारे प्रश्‍न उभे राहिले.

मी नकळत जमावातून बाजूला गेलो...

परत कधीही या जमावाचा भाग न होण्यासाठी...


- सम्राट फडणीस

लोणावळा खंडाळ्यात एकांतातील बंगल्यांचा दुरुपयोग

मुंबईतील धनिकांनी लोणावळा व खंडाळा परिसरातील डोंगरावर बांधलेल्या बंगल्यांचा रंगीत-संगीत पार्ट्या व गैरकृत्यांसाठी वापर करण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. डान्स बारवरी बंदीनंतर या प्रकारात वाढ झाल्याचे दिसून येत असून, या प्रकरणात बाहेरगावच्या लोकांचा अधिक सहभाग असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे.

थंड हवेचे ठिकाण म्हणून मुंबईकरांची लोणावळा व खंडाळा या पर्यटनस्थळांना अधिक पसंती आहे. मुंबईतील अनेक धनिकांनी या दोन शहरांप्रमाणेच पवना धरण परिसरात जागा खरेदी करून आलिशान बंगले बांधले आहेत. अनेकांनी डोंगरच्या डोंगर खरेदी करून त्यावर टूमदार बंगले बांधले आहेत. अनेक बंगले दुर्गम व लोकवस्तीपासून दूर बांधलेले आहेत व या बंगल्यांचे मालक वर्षातून एकदा किंवा दोनदा सुटी घालविण्यासाठी येतात. वर्षाअखेर साजरी करण्यासाठीही ते या बंगल्यांचाच वापर करतात. एरवी मात्र या बंगल्यांची संपूर्ण जबाबदारी सुरक्षारक्षकांकडे असते. या दोन्ही ठिकाणी वर्षभर असलेली पर्यटकांची वर्दळ लक्षात घेऊन हे बंगले तात्पुरत्या स्वरूपात भाड्याने देण्याची शक्कल या बंगल्याची व्यवस्था पाहणाऱ्यांनी लढविली आहे. अधिक पैशाच्या मोहातून काही व्यवस्थापकांनी रंगीत-संगीत पार्ट्या आयोजित करण्यास सुरवात केली.

डान्स बारवरील बंदीनंतर अशा बंगल्यांवर बारबाला आणण्याचे प्रकारही सुरू झाले. काही बंगल्यांवर मुजऱ्याचेही प्रकार घडले. मुंबईतील धनिकांना मद्यधुंद होऊन मौजमजा व रंगीत-संगीत पार्ट्या करण्यासाठी हे ठिकाण अधिक सुरक्षित वाटू लागले. मुंबईतील एजंट या पार्ट्यांची सर्व व्यवस्था करून देत असल्याचे समजते. मंगळवारी खंडाळ्यातील बंगल्यावर रंगलेली सीमा शुल्क अधिकाऱ्यांची पार्टी अशा एजंटाकरवीच आयोजिण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी तुंगार्ली परिसरातील एका बंगल्यात क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणारी टोळीही छापा घालून पकडण्यात आली होती. येथे रोजच हजारो पर्यटक येत असल्याने स्थानिक नागरिकांकडून अशा प्रकारांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही; तसेच लोकवस्तीपासून दूर बंगल्यांमध्ये असे प्रकार घडत असल्यानेही नागरिकांचे; तसेच पोलिसांचे त्याकडे लक्ष जात नाही. खबऱ्यांकडून माहिती मिळाली तरच पोलिसांना हे प्रकार कळतात.

नागरिकांची जागरूकता हवी बंगल्यांमध्ये घडणारे असे अनैतिक प्रकार व या प्रकारांतून वाढणारी गुन्हेगारी या पर्यटनस्थळांच्या लौकिकाला धक्का पोचविणारी असल्याने आता अशा प्रकारांबाबत अधिक जागरूकता दाखविण्याची गरज आहे. या ठिकाणी असलेले सर्व बंगले, त्यांचे मालक व व्यवस्थापक यांची यादी करून या बंगल्यांच्या वापराची सखोल माहिती घेणे गरजेचे आहे. स्थानिक नागरिकांनीही या बाबत अधिक जागृत राहून पोलिसांना सहकार्य करण्याची आवश्‍यकता आहे.

सिंहगड पायथ्यालगत झालेली रेव्ह पार्टी आणि त्यानंतर खंडाळ्यातील ही रंगीत- संगीत पार्टी पुणे जिल्ह्याला काळिमा फासणारी आहे.. अशा पार्ट्यांवर आणि पार्ट्या करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. आपल्याला काय वाटते? आपल मते जरूर नोंदवा...

Emotions of a software engineer...

आयटी क्षेत्रातील तरुणाईच्या मानसिकतेवर या ब्लॉगवर आपण सर्वचजण सातत्याने चर्चा करतो आहोत. ई सकाळचे वाचक विक्रम घोलप यांनी पाठविलेला फॉरवर्ड मेल या मानसिकतेवर आणखी प्रकाश टाकणारा आहे. सहसा आपण फॉरवर्ड मेल वाचून सोडून तरी देतो किंवा डिलिट तरी करतो. हा मेल तसा नाही वाटला. मुळ लेखकाचा पत्ता नाही. त्याच्या भावना मात्र सच्च्या आहेत. हृदयाला स्पर्शून जाणाऱया आहेत. म्हणून मुद्दाम इथे वापरत आहोत...

Emotions of a software engineer...

It was raining heavily outside. Dark clouds gathered in the sky and nature was in its ominous best. I took a break from my work and went to the pantry to grab a cup of coffee. I had a sip and went near the window to see the rain pouring down heavily outside the glass structure. I was inside our huge office building, unruffled by even the fierceness of the nature.

Through the heavy transparent glass, I could see a small girl trying to hold on to her umbrella which the wind was snatching away from her. I felt sorry for the girl, and was happy that I was not in a similar pathetic situation. Yes. I take pride for the fact that I am a software engineer.

I have everything which a common man would envy; money, status, respect, you name it I have it. I always wanted to be software professional and here I am, working for one of the best firms in the world. But then, am I really happy? Now, I could see an imprint of my palm on the other glass window, through which I reminisced my past, basked in the warmth of the sun shine.

My childhood was so much of fun. I vividly remember those rainy days, when I hugged my mother tightly during sleeping listening to all the stories told by her. Now, I have a big house here, but then it is just a house, not a home. My parents are pretty far away from me now. I have a cell phone to talk to them everyday, but then I really miss those dinners which I had with my family everyday. I could easily afford to taste all the different cuisines these days, but the best of food there, lack the love and affection which is present in the food prepared by my mother.

I threw a lavish party for my colleagues for my birthday, but then they would never replace the birthdays when my friends secretly brought a cake and at the end, half of the cake would have ended up on my face. The couple of hundred bucks that u save for a long period just to give a treat to your friends in the road side chat shop can never give the pleasure even after spending a few thousand bucks these days.

The scene of me crying and refusing to have dinner on the day when I fought with my best friend came to my mind. Today, she has gone far away from me, taking away my love and with it my life, but I am sitting and coding here with a false smile on my face. Everyday I meet new people, but then I long ceased to make a new friend.

It's true that I have a lot of things now. I have a nice bed, but no time to sleep. Lots of money, but no friends to spend it with. The latest designer clothes, but a worn out body . Awards for technical excellence, but no reward for the crave for peaceful ambience. A confident demeanor, but a reluctant and apathetic mind. Full of rain, but no sunshine even in the farthest distance.
Now, I could see the small girl on the road enjoying in the rain with her umbrella firmly in her grip. She might not have all the comforts which I have, but then she has the innocence and fun which I lost a long time back.

I have decided to come out of this false fantasy, even if it is at the expense of losing the tap of the software engineer. I am going to again enjoy my life. I am going to go out in the rain and play with the small kid now. I removed my tie, and went near my computer to shut it down. Just then, I saw a new mail alert in my mail box. I slowly opened Lotus Notes and I found a message from my manager with an attachment saying that there was a critical defect in the code and I have to fix it soon. I convinced myself that I am not going to get bogged down again by these pressures and stick to my decision. I ignored the mail and went to the rest room. After a couple of minutes, the software engineer in me came out, his shirt tucked in with the perfect tie knot, sat before the computer, and started typing,

Sir,
I am looking into the defect and will send the patch files before EOD.
Regards,
Software Engineer.

काय वाटलं हा मेल वाचून? जरूर सांगा.

मराठी पाट्या लावा

महाराष्ट्रात लातूरला भूकंप झाला, तेव्हा भूकंपग्रस्तांसाठी मदतीचा हात आखडता घेणाऱ्या मुंबईतील व्यापाऱ्यांनी जेव्हा भूजमध्ये भूकंप झाला, तेव्हा मात्र तेथे भरभरून मदत केली, मग महाराष्ट्र व गुजरात असा भेदभाव का, असा परखड सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बुधवारी उपस्थित केला.मराठी पाट्या लावण्यासाठी आता फक्त एकच दिवस शिल्लक आहे, पाट्या बदलल्या नाहीत तर परिणामांना सामोरे जा, असा अंतिम इशाराही त्यांनी दिला.

गेल्या काही दिवसांपासून मराठी पाट्यांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्यातच काल मनसेने व्यापाऱ्यांची सभा उधळून लावली होती. या पार्श्‍वभूमीवर मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध राज ठाकरे यांनी चौफेर हल्ला चढविला.

महाराष्ट्राची राजभाषा मराठी असावी, हा १९६१ चा कायदा आहे , तरीही राज्याच्या भाषेसाठी कोर्टात जावे लागते यासारखे दुर्दैव नाही. भाषेसाठी कोर्टात जाणारे कुठलेही राज्य या देशात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी कायदा आमच्यामुळे झाला असून, मनसेने त्याचे श्रेय घेऊ नये, असा इशारा दिला. मराठीचा आग्रह योग्य असला, तरी त्यात पक्षीय राजकारण आणणे योग्य आहे का? या सर्वांत तुम्ही कोणती भूमिका घ्याल? आम्हाला येथे नक्की कळवा...

पुण्यात रिंग रोड, "मेट्रो'ला मान्यता

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीबाहेरून जाणारा १६० किलोमीटर लांबीचा "रिंग रोड' खासगीकरणाच्या माध्यमातून उभा करण्याचा आणि मेट्रो रेल्वेचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला

यासाठी सुमारे दोन हजार ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पायाभूत समितीपुढे येत्या पंधरा दिवसांत त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास विभागीय आयुक्तांना सांगण्यात आले. मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे सादरीकरणही बैठकीत करण्यात आले.

मेट्रो प्रकल्पाचा पुण्याला फायदा होईल का, तुमचे मत नोंदवा...

टाटांना महाराष्ट्राचे आवताण - मुख्यमंत्री

नॅनो कारचा सिंगूर येथील प्रस्तावित प्रकल्प तेथून हटविण्याचा रतन टाटांनी विचार केल्यास त्यांनी महाराष्ट्रात यावे. त्यांचे लाल गालिचाने स्वागत करण्यात येईल; तसेच त्यांना जमीन व इतर सोयी सवलती दिल्या जातील, अशी जाहीर घोषणा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या जाहीर निवेदनात म्हणाले, ""टाटा उद्योग समूहाचा पाया महाराष्ट्रात आहे. त्यांचे कॉर्पोरेट ऑफिस इथेच आहे. त्यामुळे त्यांनी नॅनो कार प्रकल्प महाराष्ट्रातच उभारावा, अशी राज्य शासनाची इच्छा आहे. पूर्वीसुद्धा हा प्रकल्प टाटांनी महाराष्ट्रातच उभारावा, असे राज्य शासनाला वाटत होते, पण रतन टाटांनी इतरत्र हा प्रकल्प उभारण्याचे कबूल केले होते. आता काही कारणास्तव हा प्रकल्प इतरत्र होत नसल्यास टाटा यांनी तो महाराष्ट्रात आणावा.

महाराष्ट्रातील चाकण परिसर देशाचा डेट्रॉईट म्हणून उदयास येत आहे; तसेच पुणे, नाशिक, औरंगाबाद हा परिसर देशातील सर्वात मोठा ऑटोमोबाईल हब म्हणून विकसित होत आहे. या ठिकाणी आम्ही त्यांना जमीन, पाणी देऊ. महाराष्ट्राने देशात औद्योगिक क्षेत्रात आपली आघाडी कायम ठेवली आहे. यामध्ये टाटा उद्योग समूहाचा मोठा हातभार लागला आहे. नॅनो कार प्रकल्प महाराष्ट्रात आला; तर महाराष्ट्राची औद्योगिक क्षेत्रातील आघाडी आणखी बळकट होईल. राज्य शासनाच्या मेगा प्रोजेक्‍ट पॉलिसीनुसार (विशाल प्रकल्प धोरण) टाटांना सर्व सवलती दिल्या जातील. गरज भासल्यास मी स्वतः रतन टाटांची भेट घेईन.''

मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाचे आपण स्वागत करताय का? आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा...

हॉलीवूडच्या चित्रपटाला मराठीमोळी संगीतसाथ...

पॉपच्या तालावर थिरकणाऱ्या पाश्‍चात्य सुरांना भारतीय संगीताने सजविण्याचे काम पुण्यातील दोन तरुणांनी केले आहे.
समीप कुलकर्णी आणि मिलिंद दाते अशी ही मराठी नावे. न्यूयॉर्कची प्रसिद्ध पॉप सिंगर अँजेली ऊर्फ अंजली काकडे हिच्या "फॅंटसी' अल्बममध्ये मिलिंदच्या निर्मितीची आणि समीपच्या सतारीची साथ लाभली आहे. नुकताच हा अल्बम बाजारात आला आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध पॉप सिंगर अँजेली या गायिकेने प्रदर्शित केलेल्या "फॅंटसी' या अल्बमसाठी समीप आणि मिलिंद यांनी संगीत दिले आहे. आठ गाण्यांचा समावेश असलेल्या या अल्बममधील दोन "पॉप ट्रॅक'वर समीपने सतारवादन केले आहे. तर, मिलिंद यांनी अल्बमच्या निर्मितीबरोबर बासरीवादनही केले आहे.

हॉलीवूडचं आकर्षण आपल्याकडं जबरदस्त आहे. तिकडच्या चित्रपटांत काम करणं असो किंवा ते चित्रपट आवडीनं पाहणं असो, हे आकर्षण वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होतं. पण, आता हॉलीवूडपटांच्या श्रेयनामावलीत चक्क मिलिंद आणि समीप अशी दोन मराठमोळी नावं झळकणार आहेत. जगभरात पसरलेल्या मराठीजनांच्या दृष्टीनं ही अभिमानाचीच बाब आहे. नाही का?

सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा

सरकारी काम....

कामचुकारपणा, निष्क्रियता आणि बरंच काही. सरकारी कार्यालयांत काम घेऊन जाणाऱया शंभरातल्या 99 जणांच्या मनात हेच विचार मनात येत असतील. ई सकाळचे वाचक महेश मसुरकर यांना आलेला अनुभव हा असाच आहे.

वाचा त्यांच्याच शब्दातः


Hi,

Today my friend went to Kothrud Kshetriya Karyalay to register for his daughter's birth.

When the window opened, the lady clerk told that today they are on strike and so no work.

After 5 minutes, she went inside again to confirm. Then she told that they are not on strike today.

See.. How funny it is !!! She even do not know why the strike is, whether the strike is on or not??

More over, She asked about the work to my friend. When he told about the birth registration of his daughetr, She told that forms are finished. I do not know how our govt. offices run with this kind of efficiency !!!

तुम्हाला आले आहेत असे काही अनुभव? इथं जरूर शेअर करा.

संगणक अभियंत्याची आत्महत्या

हिंजवडीतील एका संगणक अभियंत्याने भोईरवाडीमधील बापूजीबुवा डोंगरावर गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. सरोजकुमार ब्रह्मानंद नायक (वय २६, रा. सोमेश्‍वर मंदिराजवळ, चंदननगर, पुणे, मूळ गाव- जगन्नाथपुरी, ओरिसा) असे त्याचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी औद्योगिक वसाहतीमधील टेक-महिंद्रा कंपनीच्या मागील भोईरवाडी डोंगरावर झाडाला एका व्यक्तीने गळफास घेतल्याचे गुराखी बाळू सावंत यांनी सोमवारी पाहिले. त्याने याबाबत पोलिस पाटील तुकाराम भोईर यांना कळविले. श्री. भोईर यांनी ही माहिती पोलिसांना दिली.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात टेक-महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष सुजित बक्षी (कार्पोरेट अफेअर्स) यांनी म्हटले आहे, ""सरोज नायक हा एसीएस कंपनीतर्फे टेक- महिंद्रामध्ये उप-कंत्राटी कर्मचारी होता. तपासाबाबत पोलिसांना सर्व सहकार्य करण्यात येईल.'' हळव्या स्वभावाचा सरोजकुमार सरोजकुमारच्या नातेवाइकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो अतिशय मितभाषी आणि मृदू स्वभावाचा होता. त्याला एकटेपणाची आवड होती. त्यामुळे त्याला फारसे मित्र नव्हते. केवळ अडीच महिन्यांपूर्वीच टेक-महिंद्रा कंपनीत कंत्राटी पद्धतीवर तो नोकरीत रुजू झाला होता.

सरोजकुमारच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नसले, तरी कोणत्याही कारणामुळे आत्महत्या करणे, हा समस्यांवरील मार्ग असू शकत नाही. हे या तरुणांना कोण समजावणार?

संदीपच्या निमित्तानं...

पुण्यातील एका तरुण, हुशार आणि उत्तम भविष्य असणाऱ्या सॉफ्टवेअर अभियंत्यानं दोन आठवड्यांपूर्वी आत्महत्त्या केली. कारण होतं, "कामाचा अतिताण.' या घटनेनंतर लगेचच चर्चा सुरू झाली. विविध प्रतिक्रिया उमटल्या. ......

- अभिजित थिटे

abhijit.thite@ esakal.com

७ ऑगस्ट २००८.

सकाळी सकाळी एस.एम.एस. आला. पुण्यातल्या एका सॉफ्टवेअर कंपनीतल्या अभियंत्यानं कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्त्या केली. संदीप शेळके हे त्या युवकाचं नाव. त्यानं आत्महत्त्या करण्याआधी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. "कामाच्या अतिताणामुळे' हे आत्महत्त्येचं कारण त्यानं दिलं होतं. घटना आदल्या दिवशी म्हणजे ६ ऑगस्टच्या रात्री घडली होती. नव्या माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात ही बातमी झपाट्यानं सगळीकडे पसरली. आणि सुरू झाली न संपणारी चर्चा.

पुणे प्रतिबिंब या ब्लॉगवर आठ तारखेला एक पत्र पोस्ट करण्यात आलं होतं. पत्र संदीपलाच लिहिलं होतं. त्यात कामाचा ताण, मानसिक ओढाताण आणि त्यातून घडलेली ही घटना यासंबंधाने काही प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते. त्यावरची उत्तरं शोधण्याचाही प्रयत्न केला होता. या पोस्टवर अनेक कॉमेंट्‌स आल्या. आटीयन्सपासून ते एक आई, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून, सामाजिक स्तरांमधून या प्रतिक्रिया उमटल्या. घडलेल्या घटनेबद्दल सगळ्यांनाच वाईट वाटतंय; पण आता तेवढंच वाटून उपयोग नाही. या घटनेचा आता गांभीर्यानं विचार व्हायला हवा.

मुळात कामाचा अतिताण, आजच्या भाषेत सांगायचं, तर वाढती "वर्क प्रेशर्स' हा मुद्दा आजपर्यंत अनेकदा चर्चिला गेला आहे. माध्यमांतून त्यावर विविध लेखही प्रसिद्ध झाले आहेत. खूप ताण येतोय, त्यामुळे आपण तुटत चाललो आहोत, हेही सगळ्यांना जाणवतंय. फक्त हा विषय आजच्यासारखा ऐरणीवर आला नव्हता. आत्महत्त्येसारखी गंभीर घटना घडल्यानंतर मात्र, सगळ्यांचा आपल्याच ताणाकडे पाहायचा दृष्टिकोन बदलाय, हे आलेल्या प्रतिक्रियांवरून जाणवतं.

तुटेपर्यंत ताणलंय...

मुळात हा प्रश्‍न फक्त आयटीपुरता मर्यादित राहिलेला नाही. अतिशय वेगानं धावणाऱ्या या जगात ताण सगळ्यांच्याच बोकांडी बसले आहेत. आपल्याला अनेक गोष्टी मिळवायच्या आहेत. सगळ्याच क्षेत्रात विलक्षण स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत टिकायचं आणि पुढेही जायचं अशी ही दुहेरी स्पर्धा आहे. या स्पर्धेत साऱ्यांचाच कस पणाला लागतो. ही स्पर्धा म्हणजे चरक झालाय आणि आपण ऊस! सगळंच स्वत्व पिळून निघाल्यानंतर आपलं चिपाड होईल नाहीतर काय? आत्महत्त्येचा प्रसंग आताच घडला; पण आपण स्वत:ला तुटण्यापर्यंत ताणलंय, याची लक्षणं आधीपासूनच दिसायला लागली होती. घरात सतत होणारी चिडचिड, अगदी छोट्याशा गोष्टीवरूनही तडकणारं डोकं, बऱ्याचदा जाणवणारा थकवा, डोकं दुखण्याचं वाढलेलं प्रमाण ही सारी याचीच तर लक्षणं होती. याविषयी सगळेच मानसोपचार तज्ज्ञ पोटतिडकीनं बोलत होतेच. आपण आतातरी जागं व्हायला हवं. आपलं स्वत:कडचं हे दुर्लक्ष अक्षम्यच आहे. याचे परिणाम आपण तर भोगतोच; पण आपल्या आजूबाजूच्यांनाही भोगायला लावतो. हे "पॅसिव्ह स्मोकिंग'सारखं आहे. सिगारेट आपण ओढायची आणि त्याचे भोग आपल्याबरोबरच इतरांनीही भोगायचे, अतुलची ही प्रतिक्रिया विचार करायला लावणारी आहे.

पण ताण असतोच!

ब्लॉगवर आलेल्या प्रतिक्रियांपैकी बहुतेक साऱ्यांनीच "आयटीमध्ये ताण असणारच' असा उल्लेख केला होता. एकानं नाव न देता प्रतिक्रिया दिली, "प्रेशर्स सगळ्यांवरच असतात. मॅनेजर्स आम्हाला अक्षरश: राबवून घेतात. पण त्यांनाही पर्याय नसतो. त्यांचे बॉसेस त्यांच्यावर दबाव आणतात आणि ते आमच्यावर. यातून कोणाचीही सुटका नसते. मला कधीकधी खूप राग येतो; पण काही पर्यायही नसतो.' ही प्रतिक्रियाही बोलकी आहे. ताण असणार हे यानं मान्य केलंय, फक्त काही पर्याय नाही, हे मात्र चूक आहे. कारण एकदा ताण घ्यावा लागणार आहे, हे मान्य केलं, की तो सोसायचा कसा, कमी कसा करायचा हेही शोधायलाच हवं ना? पण तसं घडताना मात्र दिसत नाही.

कॅप्टन सुभाष हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांनी आताच्या पिढीचं बारकाईनं निरीक्षण केलंय, असं त्यांच्या प्रतिक्रियेवरून वाटतं. ते म्हणतात, "आजकालची हुषार तरुण पिढी जरी नवी नवी शिखरे पादाक्रांत करत असली, तरी त्यांना पूर्वीपेक्षा अतिशय जास्त प्रमाणात ताणतणावाखाली, वेळीअवेळी आणि प्रोजेक्‍ट डेडलाइनच्या टांगत्या तलवारीखाली नोकऱ्या कराव्या लागतात. ऑफिसमधून घरी आल्यानंतरही लॅपटॉपवर करण्यासाठी काम असतंच. माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्यात अडकल्यामुळे इंटरनेट, आयपॉड, मोबाईल अशी वेगवेगळी गॅजेट्‌स सतत हाताळण्याची सवय लागलेली असते. त्यामुळे त्यांना एक क्षणही विश्रांती घ्यायला फुरसत नसते.'

वेळ काढलाय कधी?

सुभाष यांचं म्हणणं तुम्हा-आम्हालाही पटेल. आपण स्वत:साठी वेळ काढायलाच विसरून गेलो आहोत, असं कधीकधी वाटतं. ज्या कॉलेजच्या मित्रांबरोबर आपण दिवसरात्र हुंदडलो, त्यांना आपण किती वेळ देतो? नोकरी करण्याआधी अधेमध्ये डोंगरदऱ्यांत भटकंती करायला जायचो. जाम धमाल करायचो. आता तसं जमतं? रात्री जेवण झाल्यावर निवांत चालत चालत फिरायला कितीदा गेलो आहोत? आपल्या जिगरी दोस्ताला फोन, एस.एम.एस. आणि इमेल सोडून कितीवेळा भेटलो आहोत? आईसाठी, कुटुंबासाठी किती वेळ दिलाय आपण? अर्थात, लग्नकार्य किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रम आणि हॉटेलिंग सोडून! आईशी शेवटच्या निवांत गप्पा कधी मारल्यात आपण आठवतंय? यादी काढायला गेलो, तर खूपसारे प्रश्‍न आहेत. व्यक्तीनुसार या यादीत बदल होतील. हे प्रश्‍न आपल्याला पडत नाहीत का? कधीतरी नक्कीच पडतात. काम करता करता आपण "कलिग'ला तसं म्हणतोही. "यार बहोत दिन हुए कहीं घूमने नहीं गया... अब थोडासा ब्रेक चाहिये...' फक्त हे सारं बोलण्यातच राहतं. आणि मुद्दा इथंच आहे.

योगा, मेडिटेशन...

मधे एक मेल फिरत होती सगळीकडे. अनेक मेलच्या गर्दीत ही लक्षात राहिली. कोणीतरी अनामिक व्यक्तीनं खूप छान लिहिलं होतं त्यात. "एच.आर. कडून मेल आला. अमुकअमुकचं काल हार्टफेलमुळे निधन झालं. इतक्‍या तरुण वयात हार्टफेल...' आपल्यापैकी काहींना आठवत असेल तो मेल. ही घटना घडण्याच्या काही दिवस आधीच ही मेल सगळीकडे फिरत होती. फक्त झालं एवढंच आपण ती वाचली, थोडं हळहळलो आणि इतरांना फॉरवर्ड केली. "लंच टाईममध्ये' इतरांशी थोडी चर्चा केली. सध्या अशा चर्चांचा शेवट ठरलेल्या वाक्‍यांनी होतो, "मेडिटेशन आणि योगा इज अ मस्ट!' ब्लॉगवर आलेल्या प्रतिक्रियांपैकी २५ टक्के प्रतिक्रियांमध्ये हाही उल्लेख होता. आपल्यावर असणारे ताण, त्यामुळे होणारा त्रास या साऱ्यावर हे दोन उपाय म्हणजे रामबाण आहेत, असं काहीसं वाटतं आपल्याला. पण ते पूर्ण खरं नाही. म्हणजे सकाळी मेडिटेशन करायचं. "योगा'च्या क्‍लासला जायचं आणि दिवसभर घाण्याला जुंपून घ्यायचं, यानं मन:शांती मिळत नाही. ती काही "डिस्प्रिन'नाही. "योगा' आणि "मेडिटेशन' हे मन:शांती देतील; पण त्यासाठी उरलेल्या दिवसाचं नियोजनही तसंच हवं. आजकाल आपला "डिस्प्रिन'वर जास्त विश्‍वास बसत चाललाय. गोळी घेतली, डोकेदुखी थांबली. मुळात डोकं का दुखत होतं, हे शोधायचे कष्ट आपण कोणीच करत नाही. आणि "योगा', "मेडिटेशन' आणि आयुर्वेद हे रोग शोधण्याकडे जास्त लक्ष देतात. म्हणूनच आठवड्यातून तीन दिवस, सकाळी किंवा संध्याकाळी दोन तास या क्‍लासेसना जाऊन उपयोग नसतो. या आधीच्या परिच्छेदात जे प्रश्‍न विचारलेत ना, त्याची उत्तरं आधी देता यायला हवी. आपल्या "लाईफ'मध्ये तसा बदल घडायला हवा. तरच या उपायांचा उपयोग होईल.

शेवट... नाही सुरवात

ब्लॉगवरील प्रतिक्रिया आणि त्यानिमित्तानं असलेला लेख हा काही उपदेश नाही. तो माझा आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न आहे. या साऱ्यांत मीही येतोच ना! आपण सारेच धावत सुटलो आहोत. नक्की काय मिळवायचंय हे आपलं आपल्याशी निश्‍चित नाही. ठरवलेला "गोल अचिव्ह' केला, की आपण तिथं थोडा वेळ रेंगाळत नाही. यशाचा आनंदही साजरा करत नाही. कारण तिथं उभं राहिल्यानंतर आणखी पलिकडची गोष्ट दिसत असते. मग ती मिळविण्यासाठी आपण सारेच आटापिटा करतो. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. आपण कुठवर धावायचं, का धावायचं हे स्वत:शीच निश्‍चित करायला हवं. ब्लॉगवर "मेसअप इन थॉट' अर्थात "वैचारिक गोंधळ' या नावानं एक प्रतिक्रिया आली आहे. त्याचं म्हणणं आहे, "आपण अशा प्रकारे विचार केला आणि तसं वागू लागलो, की कधीतरी वाटतं, आपण स्वत:ला बांधून घेत नाही ना? आणखी काही करण्याची, मिळविण्याची शक्‍यता असताना स्वत:वर बंधनं घालणं किती योग्य आहे?' मुद्दा चूक नाही; पण हे काय किमतीवर, हे वाक्‍य पुढे जोडायला हवं. फिरून फिरून तोच मुद्दा समोर येतो, किती ताणायचं? आपण मिळवत असलेला पैसा आपल्याला एंजॉय करता येत नसेल, ज्या पोटासाठी हे सारं करतो त्यात "मिळेल ते' ढकलावं लागत असेल, कुटुंबाबरोबर चार क्षण घालवता येणार नसतील, आपल्या "बच्चू'ला फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी तयार करण्यातली मजा लुटता येणार नसेल आणि मुख्य म्हणजे स्वत:साठीही वेळ देता येत नसेल, तर एवढा पैसा कमवायचा कशासाठी? आजचे हे श्रम आणि त्यातून मिळणारं उत्पन्न पुढे आरोग्यावरच खर्च करायचं आहे का?

सकाळी उठलो, रोजच्या व्यायाम केला, आन्हिकं आवरली, सगळ्यांबरोबर हसत-खेळत नाष्टा केला, ऑफिसला आलो, मस्तपैकी काम केलं, संध्याकाळी घरी पोचलो, पिलाला घेऊन बागेत गेलो, त्याच्याबरोबर चक्क फुगा खेळलो, रात्री सगळेजण एकत्र जेवायला बसलो.... हा दिनक्रम आपल्याला नको असतो का? माझ्या या लेखाचा, खरंतर स्वगताच ा शेवट या सुंदर दिनक्रमाच्या सुंदर स्वप्नानंच होणं योग्य आहे. फक्त हे स्वप्न ?हे, ते लवकरात लवकर प्रत्यक्षात यावं, ही भाबडी वाटली, तरी योग्य आशा आहे. म्हणूनच संदीपच्या जिवाची किंमत मोजून सुरू झालेली ही चर्चा हा शेवट नाही. ती सुरवात आहे सुंदर भविष्याची!

राज्य सरकारला पडला सिंधुदुर्गातील शिवस्मारकाचा विसर!

समुद्रातील शिवरायांच्या स्मारकासाठी दोनशे कोटी रुपये खर्च करण्याच्या तयारीत असलेल्या राज्य सरकारला सिंधुदुर्गातील शिवरायांच्या स्मारकाचा मात्र विसर पडला आहे. "साम मराठी' वाहिनीने शुक्रवारी सर्वप्रथम या विषयाला वाचा फोडली.

हिंदवी स्वराज्याचे निर्माते असलेल्या शिवरायांचे सिंधुदुर्ग किल्ल्यातील अद्वितीय स्मारक सध्या अंधाराच्या खाईत आहे. निधीअभावी महाराजांचा पोषाख जीर्ण झाला आहे. शिवरायांचे मंदिर गळते आहे. राज्य सरकार मात्र याकडे दुर्लक्ष आहे.

वाढत्या महागाईच्या काळात या मंदिरासाठी राज्य सरकारकडून दरमहिना केवळ ४१६ रुपये निधी मिळतो. त्यामध्ये मंदिराचा खर्च भागविणे अवघड जाते, असे मंदिरातील व्यवस्थापकांचे म्हणणे आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीसाठी ५० लाख रुपये देण्याचे आश्‍वासन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिले होते, असे शिवराज्य प्रतिष्ठानचे अरविंद म्हापसकर यांनी सांगितले. मात्र, या आश्‍वासनाच्या पूर्तीसाठी त्यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. महाराष्ट्र कबड्डी संघटनेला पाच लाख रुपयांची मदत करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला होता. या पार्श्‍वभूमीवर, श्री. ठाकरे ५० लाखांची मदत करण्याचा शब्द पाळतील का ? याचीच आता उत्सुकता आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक पक्षाचा श्रीगणेशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच होतो. काही पक्ष तर शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच जन्माला आले. पण राजकीय पक्षांनी जाणत्या राजाच्या नावाचा वापर केला, तो फक्त राजकारणासाठीच. अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी दोनशे कोटी; सिंधुदुर्गातील शिवस्मारक मात्र दुर्लक्षित. राजकारण्याच्या या दुटप्पी वागण्याबद्दल तुमचे मत आमच्याकडे पाठवा.

वाहतुकीसाठी सर्वत्रच उदासीनता

पुण्यातील एकूण लोकसंख्येच्या २५ टक्‍क्‍यांपेक्षाही अधिक म्हणजेच पाच लाख एवढी शालेय विद्यार्थ्यांची संख्या आहे. मल्टिमीडिया सेक्‍शनमध्ये आणखी भरपूर काही...असे असतानाही शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत सर्वच पातळ्यांवर उदासीनता दिसून येते. रस्त्यांलगत, चौकांलगत नव्हे तर शहरी मध्यवस्त्यांत असलेल्या शाळांच्या परिसरात या प्रश्‍नाचे गांभीर्य अधिक ठळकपणे जाणवते.

आज पुण्यात शाळांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यातील बहुतांश शाळा मुख्य रस्त्यांलगत आहेत. किंबहुना कित्येक रस्त्यांचा विकास शाळांना डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आला आहे. तर, बऱ्याच शाळा ऐन चौकात आहेत.वाहतूक कोंडी पुणे शहराला नवीन नसली, तरी अनेक रस्त्यांवरील वाहतूक कोंडीला शाळाच कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे; तर याच वाहतुकीने शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्‍यात आणली आहे.

औंधचे शिवाजी विद्यालय, पुणे विद्यापीठ चौकातील पाषाण रस्त्यालगतचे आणि जंगली महाराज रस्त्यावरील मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगर येथील भारत इंग्लिश स्कूल, जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावरील हेलेनाज स्कूल, लक्ष्मी रस्त्यालगतची हुजूरपागा, नूमवि, टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल, महाराष्ट्र मंडळ, वनिता समाज शाळांमधील विद्यार्थी वेगवान वाहतुकीचा सामना करत आहेत. शाळेचे मुख्य प्रवेशद्वार थेट रस्त्यावरच खुले होत असल्याने विद्यार्थ्यांना अन्य कोणताही पर्याय राहिलेला नाही.


पाषाण रस्त्यावरील मॉडर्न हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. जी. बनसोडे म्हणाले, ""या रस्त्यालगत असलेल्या विद्यापीठ चौकात तीन रस्ते एकत्रित येतात, पर्यायाने मोठी वाहतूक असते. शाळा तसेच कार्यालये एकाच वेळी सुटत असल्याने शाळेसमोरील रस्त्यावर वाहनांचा ओघ मोठा असतो. शाळेसमोरील रस्त्यांची विकासकामे या प्रश्‍नात भरच टाकतात.'' शाळेच्या आवारात प्रवेश मिळत नाही म्हणून मिळेल तेथे (विद्यार्थ्यांची ने-आण करणारी), कधी रस्त्याच्या पलीकडे, तर कधी शाळेपासून दूर अंतरावर उभी केलेली वाहने, ही वाहने गाठण्याच्या नादात विद्यार्थ्यांनी उडणारी धांदल, तारेवरची कसरत करत वाहतुकीतून वाट शोधणारे विद्यार्थी असे चित्र शाळांच्या ठिकाणी हमखास पाहायला मिळते.

अहिल्यादेवी प्रशालेच्या पीएमपीएलच्या बस जागेअभावी बालगंधर्व पुलाजवळ तर रेणुका स्वरूप शाळेच्या बस भिकारदास मारुती मंदिराजवळील बस स्थानकाजवळ थांबवाव्या लागतात, असे बसचालकांनी सांगितले. मध्यवस्तीतील शाळा जागेचे निमित्त करून वाहनांना प्रवेश नाकारतात. मात्र या शाळांकडून उपलब्ध जागेचा मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक वापर होत असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञ करतात. ही वाहने शाळा भरणे-सुटण्याआधीच शाळेबाहेरील अरुंद रस्त्यांवर गर्दी करतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. शाळांलगतच्या अरुंद रस्त्यांवर चारचाकी वाहने उभी असतात असे त्यामुळे या रस्त्यांवर रिक्षा उभ्या करता येत नाहीत. अनेक पालक शाळेच्या मुख्य दरवाज्यापर्यंत पाल्यांना सोडण्याबाबत आग्रही असतात त्यामुळेही वाहतुकीची कोंडी होते, असे रेणुका स्वरूपच्या मुख्याध्यापिका सुषमा कुलकर्णी यांनी सांगितले.

त्यातच शाळा सुटल्यानंतर तीन हजार विद्यार्थ्यांनींचा लोंढा एकदम रस्त्यावर येतो. परिणामी वाहन चालविणे कठीण जातेच, पण वाहतूक कोंडीला दररोजच सामोरे जावे लागते. काही शाळांच्या चौकात वाहतूक नियंत्रक दिवे लावले आहेत. मात्र, या सिग्नलचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते, असे शाळा आणि विद्यार्थी सांगतात. अगदी याउलट तक्रार अन्य वाहनचालक करतात. या वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार, मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि नेण्यासाठी आलेली वाहने रस्त्यावरी अत्यंत बेशिस्तपणे उभी केली जातात. नादुरुस्त वाहतूक नियंत्रक दिवे, गैरहजर वाहतूक पोलिस, शाळांच्या प्रवेशद्वारासमोरील झेब्रा क्रॉसिंगचा अभाव यामुळे हा प्रश्‍न दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत आहे. काही शाळा वाहतूक कोंडी सोडवण्यास हातभार लावतात. मात्र, काही शाळा ही जबाबदारी ढकलू पाहतात. वाहतूक विभागाच्या पातळीवरील अनास्था, शालेय पातळीवरील बेजबाबदारपणा, ने-आण करणाऱ्या वाहनचालकांच्या पातळीवरील अरेरावी आणि पालकांच्या पातळीवरील असहाय्यता या गोष्टी विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि हित जोपासण्यास असमर्थ ठरत आहे.

शाळा आणि शाळांलगतची वाहतूक याबाबत आपल्याला काय वाटते. शालेय विद्यार्थ्यांना करावी लागणारी कसरत आणि नित्याने होणारी वाहतूक कोंडी याला कोणते घटक कारणीभूत आहेत, असे आपल्याला वाटते. शिवाय या गोष्टी टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविल्या पाहिजे, असे आपल्याला वाटते?
आपण आपल्या प्रतिक्रिया एसएमएसद्वारेही पाठवू शकता. त्यासाठी टाईप करा. एअरटेल मोबाईलधारकांसाठी PUN5 (आपली प्रतिक्रिया) आणि पाठवा 56666 वर. इतर मोबाईलधारकांसाठी PUN5 (आपली प्रतिक्रिया) आणि पाठवा 54321 या क्रमांकावर.

पुण्यात कॉल सेंटरमधील तरुणीवर सामूहिक बलात्कार

फुरसुंगी येथील कॉल सेंटरमध्ये ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या २३ वर्षांच्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली.या प्रकरणी दहाहून अधिक अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. तुकाईदर्शन या टेकडीवर हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे संबंधित तरुणीला जबर मानसिक धक्का बसला आहे.

तिचा मित्र हंसराज नाना ब्राह्मणे (वय २६, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, ता. हवेली) याने दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी व हंसराज वर्षभरापासून एकत्र वावरत आहेत. ती गेल्या एक वर्षापासून कॉल सेंटरमध्ये ऑपरेटर म्हणून काम करीत आहे. इतर तीन मैत्रिणींसह ती सासवड रस्त्यावरील एका फ्लॅटमध्ये राहते. कंपनीच्या जवळच राहत असल्याने ती कंपनीची गाडी जाण्या-येण्यासाठी वापरत नव्हती. गुरुवारी ती फ्लॅटमध्ये एकटी आराम करीत असताना, रात्री साडेदहाच्या सुमारास तिच्या परिचित महिलेने बोलावले असल्याचा निरोप आला. त्या वेळी तिला नेण्यासाठी कॉल सेंटरमधील एक गाडी आली होती. या गाडीपाठोपाठ कॉल सेंटरमधील इतरही दोन-तीन गाड्या होत्या. त्यानंतर तुकाईदर्शन टेकडीवर हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादीत विसंगती जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रवीण पाटील म्हणाले, ""या तरुणीकडून अद्याप माहिती मिळालेली नाही. तिचा मित्र हंसराजच्या सांगण्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तिच्या मैत्रिणीच्या व जागा मालकिणीच्या म्हणण्यानुसार संबंधित तरुणी गुरुवारी रात्री बाहेर गेलेली नव्हती. त्यातच हंसराज सांगत असलेली माहिती व चौकशीत पुढे येत असलेली माहिती यात तफावत आढळत आहे.''

संबंधित तरुणी कॉलसेंटरला जाण्यासाठी कंपनीच्या गाडीचा वापर करत नसेल, तर परिचितांकडे जाण्यासाठी कॉलसेंटरची गाडी तिला न्यायला आलीच कशी? शिवाय अशा गाडीतून ती गेली कशी? अशा अनेक गोष्टींमध्ये विसंगती आढळून येते. म्हणजे ज्योतिकुमारीप्रमाणेच या प्रकरणातही कॅबचालकाचा हात आहे का? आता हे ती मुलगी तोंड उघडेल तेव्हाच कळेल.

प्रिय संदीप,

काल सकाळपासूनच तुझी बातमी सगळीकडे "टॉप'वर होती. सगळीकडे तुझीच चर्चा सुरू होती. सारेच जण हळहळत होते. तुझा असा अकाली मृत्यू, तुला न ओळखणाऱ्यांनाही हलवून गेला. तुझ्यासारख्या उत्तम करिअर असणाऱ्या, उत्तम शैक्षणिक ग्राफ असणाऱ्या, हॅंडसम तरुणानं आत्महत्त्या का केली असावी? कितीही विचार केला, तरी याचं उत्तर सापडत नाही. आता पोलिस तपास सुरू आहे. कालपासूनच वेगवेगळ्या चॅनेलवर "वर्क प्रेशर' या विषयावर चर्चा सुरू होती. खरंच एवढा ताण होता का रे तुझ्यावर? अगदी सातव्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवण्याएवढा? मुळात खरंच कोणावर एवढा ताण असतो का रे? एका कणखर आईचा मुलगा इतका हळवा असू शकतो?
काल सकाळी सकाळी बातमी ऐकल्यानंतर तुझ्या विषयीची माहिती वेगवेगळ्या लोकांकडून, चॅनेलवरून कानी यायला लागली. तुझा ऑर्कुटचा प्रोफाईलही पाहिला. तुझे टेस्टिमोनिअल, तुझे स्क्रॅप खरंच दृष्ट लागावे एवढे होते. सीबीएससी बोर्डात तू झळकलास, त्यानंतर एका कॉलेजनं तुला बोलावून घेतलं, तुला ऍडमिशन दिली, पुढे एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करू लागलास, नंतर त्याच कंपनीनं तुला एम.टेक. करण्यासाठी आय.आय.टी.मध्ये पाठवलं. तिथंही झळकलास. परत आल्यावर त्याच कंपनीत पुन्हा नोकरी करू लागलास. तुला ओळखणारे आताही सांगतात, की संदीप हा खूप चांगला मुलगा होता. खूप पोलाईट, खूप व्यवस्थित...
मित्रा, तुझ्यावर कंपनीचा विश्‍वास होता. तुझाही कंपनीवर होता. मग नक्की प्रॉब्लेम आला कुठे? अरे सातव्या मजल्यावरून उडी मारताना तुला तुझ्या आईचे कष्ट आठवले नाहीत का? धाकट्या भावाचा चेहरा डोळ्यासमोर नाही आला? अरे काबाडकष्ट करून ज्या माऊलीनं तुला एवढं शिकवलं, मोठं केलं, तिची काय अवस्था होईल तुझ्या मागे, याचा विचार का नाही केलास? तुझं कर्तृत्व आता कुठे बहराला येत होतं. ती आई कौतुकानं तुझ्याकडे पाहात होती. तिला केवढा मोठा धक्का बसलाय रे...
अख्खं आयुष्य होतं तुझ्यापुढे. ताण-ताण तो कसला रे? ताण कोणाला नसतात? कदाचित तुला हसू येईल; पण सगळ्यात जास्त ताण कोणावर असतो ठाऊक आहे तुला? आपल्या बस ड्रायव्हर्सना. आपलं पुण्यातलं ट्रॅफिक तर ठाऊक आहेच तुला. कधी कोण कुठून घुसेल याचा नेम असतो का? त्यात ती अवजड बस. त्यामध्ये असलेले 50-60 पॅसेंजर्स. अरे त्याचा थोडादेखील मानसिक तोल ढासळला, तर काय होईल माहिती आहे? रोज सकाळी गाडी सुरू केल्यापासून ते ड्यूटी संपेपर्यंत तो माणूस किती प्रचंड ताणाखाली असेल... त्यात पगार आणि सुट्ट्यांच्याबाबत तो तुझ्या-माझ्यापेक्षा कमनशिबीच ना रे...
तुझ्यावर असा कोणता मोठा ताण होता. वर्कप्रेशर होतं, असं तू शेवटच्या एसएमएसमध्ये लिहिलंस. ते तू कमी करू शकत नव्हतास का? बॉसला सांगू शकत नव्हतास? बरं एकंदर ऐकलेल्या बातम्यांवरून तुझं कंपनीत वजन असावं, असंच वाटतं. कदाचित बॉसनं ऐकलं नसतं, तर तू अजून कोणाला तरी सांगू शकत होतासच ना? कितीतरी मार्ग असतात रे. त्यातला एकतरी ट्राय करावा असं तुला का वाटलं नाही? अरे एवढं मस्त करिअर असणारा, शिक्षण असणारा, आयआयटीयन असणारा तू, ही नोकरी सोडली असतीस, तरी तुला आणखी चार मिळाल्या असत्या. कोणाशी बोलला असतास तरी सांगितलं असतं, तुला कोणीही... तू कोणाशीच का बोलला नाहीस? आत्महत्त्या केलीस त्या दिवसभरातही तू मस्त होतास. सगळ्यांशी हसून खेळून बोलत होतास. पण तुझ्या मनात असं काही खदखदत होतं, हे कोणाला ठाऊक.
बोलायचंस रे मित्रा बोलायचंस... कोणाशीतरी बोलायचंस... फक्त पुण्यामधल्या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये हजारो मुलं काम करतात. त्यांच्यावरही ताण असेलच ना रे... मित्रा, ताण कमी करण्यासाठी, चिलआऊट होण्यासाठी विकएंड असतात ना... कधीतरी शांत बसायचंस. कधीतरी निवांत फिरायला जायचंस. कधीतरी एखादा पिक्‍चर एंजॉय करायचास. एखाद्या जिगरी दोस्ताकडे मन मोकळं करायचंस. अगदीच नाही, तर तुझ्या कणखर आईकडे बघायचंस...आम्ही असंच काहीतरी करत असतो ना. कामाचा ताण आहे किंवा टेन्शन आलं म्हणून कोणी आत्महत्त्या करतात का? तुझ्यासारख्यानं प्रश्‍नांना भिडायचं का आत्महत्त्या करून पळ काढायचा? हे जग खूप सुंदर आहे. एवढा देश-परदेश फिरलास, तुला ते सौंदर्य दिसलं नाही का रे? मी फक्त लौकिक अर्थाचं सौंदर्य म्हणत नाहीये. माणसंही खूप चांगली असतात रे. किमान माझातरी यावर विश्‍वास आहे.
आपली काही ओळख नाही. पण तुझी बातमी ऐकल्यानंतर तुझ्याशी बोलावंसं वाटलं, म्हणून हे पत्र. तुला आता विचारलेत ना त्यापेक्षाही खूप प्रश्‍न आहेत मनात; पण तूच नाहीस उत्तरं द्यायला. दूर कुठेतरी अनंतात निघून गेलाहेस. त्यामुळे माझ्यापुढे पर्याय एकच आहे, आपली उत्तरं आपण शोधण्याचा. तुझ्या वैयक्तिक प्रश्‍नांबाबतचं सांगता येणार नाही; पण स्ट्रेस बाबत मी माझं उत्तर शोधलंय. मी ठरवलंय आता, सुटीच्या दिवशी फक्त सुटी... नो ऑफिस. घर आणि ऑफिस या दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या ना की निम्मा शीण जातो. मित्र, कट्टा, हॉटेलिंग सगळं काही मस्त ठेवणारे मी. मुळात मी किती धावायचं याची सीमाच ठरवून घेणार आहे. माझ्या लक्षात आलंय. आपण ना नुसतं धावत सुटतो. अगदी छाती फुटेपर्यंत धावतो. मग दमतो. आपला वेग कमी होतो. तो कमी झाला, की मागचा कोणीतरी पुढे जातो. ते आपल्याला सहन होत नाही. मग आपण पुन्हा जोरानं धावायला जातो. पण तोपर्यंत आपली छाती फुटलेली असते. वेग अगदी सुरवातीला होता, तेवढाही राहात नाही. मग येते प्रचंड चिडचिड, निराशा आणि स्ट्रेस... हे होण्याआधीच आपण थांबू शकतो ना? मग आता तिथंच थांबायचं. किमान मी माझ्यापुरतं तरी असंच ठरवलंय. मस्त काम आणि जबरदस्त मजा. अरे घरच्यांबरोबर राहायला वेळ नसेल, एवढं सुंदर आयुष्य एंजॉय करता येत नसेल, तर एवढा पैसा कमवायचा तरी कशासाठी?तुझ्या त्या बातमीतून मी एवढं तरी शिकलो. फक्त माझ्या या शिक्षणाची किंमत खूप मोठी होती... तुझा जीव... सॉरी संदीप... रिअली सॉरी...
तुझा
अभिजित

गणवेश पुन्हा वादग्रस्त ठरणार

पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारे मोफत गणवेश या वर्षीही पुन्हा वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.या गणवेशाच्या निविदा मागविताना देण्यात आलेल्या नमुन्यापेक्षा वेगळे कापड वापरून गणवेश तयार केलेल्या कंत्राटदाराला हे तीन कोटी साठ लाख रुपयांचे काम देण्यात आले आहे. आश्‍चर्य म्हणजे या कंत्राटदाराचे नमुने हे अपेक्षेनुसार नसल्याचा अहवाल मंडळाला प्रयोगशाळेतून प्राप्त झाल्यानंतर आणि इतर काही कंत्राटदारांनी त्याबाबत आक्षेप घेतल्यानंतरही मंडळ याच कंत्राटदाराला काम देण्यावर ठाम आहे. विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करण्याच्या प्रकरणावरून यापूर्वीही मंडळ अडचणीत आले होते. त्यामुळे हे काम बचत गटाच्या माध्यमातून पुरविण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आला होता; परंतु बचत गटांनी वेळेत गणवेश पुरविले नाहीत, असे कारण देऊन या वर्षी त्यांना काम देण्यास मंडळाने नकार दिला आणि निविदा मागवून गणवेश खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी...

गेल्या काही दिवसांपासून निविदाप्रक्रियेवरून मंडळात सदस्यांमध्ये वाद सुरू आहेत. त्यातच दोन कंत्राटदारांनी नोटिसा बजावल्यामुळे खरेदी वादाच्या भोवऱ्यात येऊ शकते. या कंत्राटदारांनी न्यायालयात धाव घेऊन या खरेदीप्रक्रियेवर एकतर्फी स्थगिती मिळवू नये, म्हणून मंडळाने जागरूकता दाखवीत न्यायालयामध्ये "कॅव्हेट"ही दाखल केले आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊनच ही कार्यवाही करण्यात आल्याचा खुलासा मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे

उद्योग बंद पाडणे हा रोगावर इलाज आहे का?

"सायबर कॅफे' चालविण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व नियमांची वेळोवेळी पूर्तता करूनदेखील पोलिसांच्या सहकार्याअभावी शहरातील हा उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शहरात परवाने देण्यासाठी जाचक अटी रद्द करून मुंबई आणि नागपूरप्रमाणेच नियम असावेत, अशी मागणी "पुणे सेंट्रल सायबर कॅफे असोसिएशन'तर्फे करण्यात आली आहे. या बाबतीत संघटनेतर्फे येत्या बुधवारी (ता. ६) पोलिस आयुक्तांशी चर्चा करण्यात येणार आहे.

वाढत्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सायबर कॅफेंवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांतर्फे नवीन नियमावली करण्यात आली आहे. त्या नियमावलीतील शर्तींची पूर्तता करणाऱ्यांनाच परवाने देण्यात येत आहेत. मात्र, नव्या नियमावलीतील १२ आणि १३ क्रमांकाच्या जाचक अटींपोटी शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सुमारे दोन हजार कॅफे गेल्या चार दिवसांपासून बंद ठेवण्याची वेळ कॅफेचालकांवर आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राहुल पोकळे यांनी दिली.

श्री. पोकळे म्हणाले, ""सायबर कॅफेंना परवाने देण्यासाठी महापालिका हद्दीतील जागांचे मान्यताप्राप्त नकाशे सादर करण्याची अट बाराव्या नियमात घालण्यात आली आहे. या नियमाचा सर्वांत जास्त फटका पेठांमधील व्यावसायिकांना बसला आहे. कारण पालिका अस्तित्वात येण्यापूर्वी उभारलेल्या इमारतींचा समावेश त्यात नसल्याने, अशांना परवाने मिळण्याची अडचण होत आहे. पेठ परिसरात साधारणत: तीनशेच्या आसपास सभासद आहेत.''

नियमावलीतील तेराव्या नियमानुसार व्यावसायिकास जागेबाबतीत आरोग्य खात्याचे "ना हरकत' प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्यानुसार शहरातील व्यावसायिकांनी आरोग्य खात्याकडे त्याची मागणी केली असता, आम्हाला या बाबतीत कोणतीच कल्पना नसल्याचे सांगत आरोग्य खात्याने हात वर केल्याचे श्री. पोकळे यांनी सांगितले. परवाने नसलेल्या व्यावसायिकांवर खटले दाखल करण्याची कारवाई पोलिस खात्याकडून सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ८० जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या आडमुठेपणाच्या धोरणामुळे व्यवसायावर गंडांतर आल्याचे ऍड. अंबरीश बाहेती यांनी सांगितले.

आर्थिक; तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान
पोलिसांच्या कारवाईमुळे भेदरलेल्या व्यावसायिकांनी मागील चार दिवसांपासून सायबर कॅफे बंद ठेवले आहेत. त्यामुळे प्रतिदिन सुमारे तीस लाख रुपयांच्या एकूण कमाईवर पाणी सोडावे लागत असल्याची खंत श्री. पोकळे यांनी व्यक्त केली. सायबर कॅफे बंद असण्याचा सर्वांत मोठा फटका उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अथवा ऑनलाइन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे.

औद्योगिक आणि तंत्रज्ञानाच्या आघाड्यांवर घोडदौड करणाऱया पुणे जिल्ह्यात नेट कॅफे ही अत्यावश्यक बाब जरूर आहे. कॅफे चालविण्यासाठीच्या प्रक्रियेचे सुलभीकरण आणि सुरक्षेसाठी योग्य दक्षता घेतली, तर हा प्रश्न सुटू शकेल. त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य कॅफेचालकांना लागणार आहे. आठमुठेपणामुळे फक्त कॅफेचालकांचेच नुकसान नाही, तर समाजाचेही मोठे नुकसान होते आहे, असे वाटत नाही का? दहशतवादाच्या रोगावर नेट कॅफे बंद पाडणे हा इलाज आहे का?