व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

आपण सारेच अशिक्षित

आपण स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेत असलो, तरी "वाहतुकी'बाबत अशिक्षितच आहोत, असे म्हणावे लागेल. सरकारनेही वाहतुकीचे शिक्षण देण्याबाबतचे कोणतेही धोरण निश्‍चित केलेले नाही. त्यातच कायदा पोलिसांनीच राबवावा, असा लोकांचा समज असल्याने, स्वयंशिस्त लावण्यासाठी प्रयत्नही होताना दिसत नाही. दुसऱ्यांच्याच चुकांवर बोट ठेवण्याकडे कल असतो. मात्र, स्वतः किमान नियम पाळले, तर अपघात टाळणे शक्‍य आहे.
हे उपाय खालीलप्रमाणे :
* "नो एंट्री'तून जाताना अपघाताची शक्‍यता दुप्पट असते. समोरून येणारा वाहनचालक बेसावध आणि वेगात असल्याने जोरात धडक होऊ शकते. त्यामुळे "नो एंट्री'तून जाणे टाळावे.
* वळताना हात दाखवून, तसेच मागे पाहून वळावे.
* सिग्नल असताना सायकल हातात घेऊन चौक ओलांडला तरी चालते, असा समज आहे. मात्र, हे पूर्णतः चुकीचे आहे. त्यातून वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताची शक्‍यता असते.
* छोट्या रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येताना, रहदारी बघावी. सर्व वाहने पास झाल्यावरच मुख्य रस्त्याला लागावे.
* आपली अथवा आपल्या ड्रायव्हरची झोप पूर्ण झाली आहे किंवा नाही, याची खातरजमा करून घ्यावी. रात्रीचा प्रवास शक्‍यतो टाळावा.
* रात्रीच्या वेळी वाहन नादुरुस्त झाल्यास गाडीचे चारही "इंडिकेटर' चालू ठेवावेत.
* ट्रक व बसने डाव्या रस्त्याच्या डाव्या बाजूनेच जावे.
* पुढील वाहनाला ओव्हरटेक करताना वाहनाच्या सर्व बाजूच्या व मागील वाहनांचा अंदाज घेणे अत्यावश्‍यक आहे. तसेच "ओव्हरटेक' केलेल्या वाहनाच्या 100 मीटर पुढे जाऊन, "इंडिकेटर' दाखवून मगच वाहन वळवावे.
* डावीकडील "लेन' ही ट्रक- बससाठी आहे. मधली "लेन' कार्ससाठी आणि उजवीकडची "लेन' ही केवळ "ओव्हरटेकिंग'साठी असते. त्यामुळे त्या लेनमधून गाडी चालवू नये. ती लेन रिकामी ठेवल्यास क्रेन अथवा रुग्णवाहिका अपघातग्रस्त वाहनापर्यंत तातडीने पोहोचू शकते.
* टोल नाक्‍यावर अथवा सिग्नलला थांबताना पुढील वाहनाचे "टायर्स' दिसतील, इतक्‍या अंतरावर थांबावे. कारण पुढील वाहन नादुरुस्त झाल्यास आपले वाहन डाव्या किंवा उजव्या बाजूला वळवून काढता येते.
* द्रुतगती मार्गावर इतर वाहनांबरोबर शर्यत लावणे टाळावे. 100- 120च्या वेगाने जाणारे वाहन नियंत्रणात आणणे कठीण जाते. शिवाय अनवधानाने "स्टिअरिंग' वळल्यास गाडी घसरून अपघात होऊ शकतो..
* गाडीत "सिटबेल्ट्‌स' लावून बसणे महत्त्वाचे आहे. सर्वांत जास्त इजा कारमधून बाहेर फेकले गेल्याने होते.

केवळ वेगाने वाहन चालविता येणे म्हणजे चांगल्या चालकाचे लक्षण नाही. तर, वाहतुकीचे नियम सांभाळून आणि रस्त्यावरील प्रत्येक वाहनाला योग्य तो मान देणे म्हणजे चांगला चालक. खालील प्रश्‍न स्वतःला विचारल्यास ते उत्तर मिळू शकेल...
* रस्त्यावरील इतर वाहनांचा कशाप्रकारे विचार करता? प्रतिस्पर्धी म्हणून?
* चौकात सिग्नल लागला असतानाही वाहन पुढे दामटता का?
* "झेब्रा क्रॉसिंग'च्या अलीकडे थांबता का?
* एखादे वाहन वळत असेल, तर तुम्ही थांबता का? की त्याच्या बाजूने सटकायला बघता?
* चौकात सिग्नल कार्यान्वित नसेल, अथवा पोलिस नसतील, तर आपल्या उजवीकडील रस्त्यावरून येणाऱ्या वाहनाला प्राधान्य देतो का?
* वाहन चालविण्यापूर्वी मन:स्थिती तपासून पाहता का?

शासनाची भूमिका
अपघातग्रस्त व्यक्तीस लवकरात लवकर रुग्णालयात नेल्यास इजेची गंभीरता कमी होऊ शकते. हा फरक जगणे- मरणे या प्रकारातही असू शकतो. त्यातही अपघातग्रस्त व्यक्तीला पोलिस, पंचनामा या गोष्टींची वाट न पाहता इस्पितळात नेणे आवश्‍यक आहे. अपघातानंतरचा अर्धा तास "गोल्डन अवर्स' मानला जातो. या वेळेत रुग्णाकडून मिळणारा प्रतिसाद पुढील दोन तासातही मिळत नाही. त्यामुळे अपघात कोठेही झाला, तरी अपघातग्रस्त व्यक्तीस ससूनऐवजी सर्व सुविधायुक्त जवळच्याच रुग्णालयात दाखल करावे, त्या रुग्णालयाचे "तातडी शुल्क' सरकारने भरण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. त्यातून सरकारचा प्रत्येक परिसरात तातडीचे केंद्र सुरू करण्यावरील खर्चही वाचेल, रुग्णाचा जीवही...
..........
एक जानेवारी ते तीस मे दरम्यान दीडशे दिवसांत 165 घटनांत 170 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय 159 गंभीर अपघात झाले असून, त्यात 178 जखमी झाले आहेत. 559 अपघातात 633 व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या आहेत.
गेल्या वर्षातील अपघात
360 अपघातांत 372 जणांचा मृत्यू
309 अपघातांत 338 गंभीर जखमी
1257 किरकोळ अपघातांत 1408 जखमी

अपघातांची कारणं कोणती?

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बाजारात आलेली वेगवान वाहने, मात्र रस्त्यांची स्थिती (अश्‍मयुगातील) "जैसे थे'... त्यामुळे सुशिक्षितांचे शहर आणि सुसंस्कृतीचा वारसा म्हणून मिरविणारे पुणे अपघातांबाबतही नावारूपास येऊ लागले आहे. शहराचा "अमिबा'प्रमाणे झालेला विस्तार, लोकसंख्या वाढ आणि तुलनेने रस्त्यांची अपुरी संख्या, अपघातांच्या वाढीस कारणीभूत ठरली आहे.

Picasa SlideshowPicasa Web AlbumsFullscreen


या सर्व बाबी नेहमीच चर्चिल्या गेल्या आहेत. वाहतुकीच्या बेशिस्तपणावरही टीका झाल्या आहेत. पण, ही बेशिस्तता नक्की कोणती, आणि ती शिस्तबद्ध कशी करता येईल, यावर मात्र क्वचितच विचार झाला आहे.
पुण्यातील अस्थिरोगतज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय कार रेसर डॉ. राजेश मेहता यांनी पुण्यातील "वाहतूक' आणि "अपघात' या विषयावर विशेष अभ्यास केला आहे. शहरांतर्गत असणाऱ्या रस्त्यांवरील, महामार्गावरील अपघातांची कारणे वेगवेगळी असली, तरी दोन्हींचे परिणाम तेवढेच गंभीर असल्याचे त्यांचे मत आहे. हे अपघात टाळण्यासाठी पादचाऱ्यांपासून ते चारचाकीचालकांनी कोणती काळजी घ्यायला हवी, याचे विश्‍लेषण त्यांनी केले आहे.
अपघाताची कारणे :
बेदरकार "ड्रायव्हिंग' : तरुणांमध्ये हा प्रकार दिसतो. बरोबरील तसेच रस्त्यावरील इतर लोकांवर "इंप्रेशन' मारण्यासाठी वाहन भरधाव वेगाने चालविले जाते. परिणामी गाडीवरील ताबा सुटून अपघात होण्याची शक्‍यता वाढते.
रात्रीचा प्रवास : एकूण अपघातांपैकी रात्री होणाऱ्या अपघातांचे प्रमाण मोठे आहे. यात वारंवार "ट्रिपा' मारणाऱ्या चार चाकी (सुमो, ट्रॅक्‍स) वाहनांचे अपघात अधिक असतात. बदलीकामगार ही पद्धत खासगी वाहतुकीत नसल्याने संबंधित "ड्रायव्हर'ने दिवसभरात एकापेक्षा अधिक "ट्रिपा' मारलेल्या असतात. त्यामुळे त्याने विश्रांती घेतलेली नसते. शिवाय रात्री आपले "व्हीजन'ही कमी झालेले असते. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर दिव्यांमुळे डोळ्याला क्षणभर अंधारी येते. त्यातच समोरून अचानक आलेले वाहन दिसत नाही.
नादुरुस्त वाहन रस्त्यात लावल्यामुळे : अनेकदा वाहन नादुरुस्त झाल्याने ते रस्त्यातच आहे त्या स्थितीत उभे केले जाते. रात्री रस्त्यांवर दिवे नसल्यास वाहन थांबल्याचे लक्षात येत नाही. आपले वाहन त्यावर जाऊन धडकते. अथवा वाहन उजवीकडून वळविण्याच्या नादात समोरून येणारे वाहन धडकते. त्यामुळे बंद पडलेल्या वाहनावर "रेडियम'चे दोन त्रिकोण लावावेत. तसेच, गाडीच्या अलीकडे 50 ते 100 मीटर अंतरावर "रिफ्लेक्‍टर त्रिकोण' ठेवावा. तो चमकल्यानंतर 50 मीटर अंतरावर गाडी नियंत्रणात आणता येते.
ओव्हरटेक : महामार्गावर सर्रासपणे घडणाऱ्या अपघाताला "ओव्हरटेक' हे प्रमुख आहे. भरधाव वेगात येऊन पुढील वाहनाला उजवीकडून "ओव्हरटेक' करताना समोरून येणाऱ्या वाहनाला धडक बसण्याची शक्‍यता अधिक असते. डावीकडे वळण घेत असताना "ब्लाइंड' (ओव्हरटेक करत असताना मागील वाहनाला पुढचे काहीच न दिसणे, याला "ब्लाइंड' स्थिती म्हणतात) स्थितीतील अपघात होऊ शकतो.
दोन वाहनांमधील अयोग्य अंतर : रस्त्यावरून जाणाऱ्या कोणत्याच दोन वाहनांमध्ये योग्य अंतर नसते. वास्तविक तुमच्या वाहन वेगाइतकेच अंतर तुमच्या व तुमच्यापुढील वाहनामध्ये असणे गरजेचे आहे. पुढचे वाहन अचानक थांबल्यास आपल्या वाहनांचा वेग नियंत्रणात येत नाही व अपघात होतो.
अधीरता : सिग्नल मिळण्याआधीच चौक ओलांडला जातो. अशावेळी सिग्नल असलेल्या बाजूकडून वेगात येणाऱ्या एखाद्या वाहनाबरोबर अपघात होऊ शकतो.
वाहतुकीतील अशिक्षितपणा : शहरातील वाहतूक माहिती नसलेला एखादा "ड्रायव्हर' छोट्या रस्त्यावरून त्याच वेगाने थेट महामार्गावर येतो. शिवाय पुढील 5- 10 फूट अंतरावरील वाहनांच्या मागे 80- 90 किलोमीटर वेगाने वाहन चालवितो.

पहिलीपासून "ट्रॅफिक'
इतर विषयांप्रमाणे "ट्रॅफिक' हा विषयदेखील अभ्यासक्रमात समाविष्ट करणे आवश्‍यक असून, थिअरीपेक्षाही प्रात्यक्षिकांवर भर देणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक शहरात एक "ट्रॅफिक पार्क' विकसित करावे. त्यामध्ये सिग्नल यंत्रणा, रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, चौक, वाहनतळ व चारचाकींच्या प्रतिकृती उभाराव्यात. कारमध्ये बसवून वाहतुकीचे नियम शिकवावेत.

उड्डाणपूल झाला, आता पुढे काय?

होईल, होईल म्हणता म्हणता गणेशखिंड रस्त्यावरचा शेवटचाही उड्डाणपूल तयार झाला. गेले दीड वर्षे शिव्या देत देत या रस्त्या(?)वरून जाणाऱ्यांनी अखेर हुश्‍श केलं. आता या रस्त्यावर किमान गर्दी तरी होत नाही. पण जे रोज या (उड्डाणपुलाच्या खालच्या) रस्त्याचा वापर करत आहेत, त्यांच्या समस्या मात्र संपलेल्या नाहीत.


अगदी कृषी महाविद्यालय चौकापासूनच सुरूवात करू. या टप्प्यात कृषी महाविद्यालयाच्या बाजूला जो रस्ता सोडला आहे, तो अतिशय अरुंद आहे. ई-स्क्वेअरपासून पुढे मोठ्या रस्त्याने येणाऱ्या वाहनचालकांना पुढे अचानक चिंचोळ्या खिंडीतून गेल्याचा भास होतो. हीच अवस्था उर्वरित दोन टप्प्यांमध्येही कमी अधिक प्रमाणात आहे. विद्यापीठ चौकात जाणाऱ्या उड्डाणपुलावरून दोन्ही बाजूंना पाहिले, की रस्त्यांच्या रुंदीतला हा फरक चटकन लक्षात येतो. (इमारतींच्या भिंती उड्डाणपुलाला टेकल्यासारख्या वाटतात काही ठिकाणी!)
या टप्प्यात औंधकडे जाणाऱ्या रस्त्याचा टप्पा अरुंद तर आहेच, शिवाय त्या टप्प्यात खालच्या रस्त्याची अनेक कामेही अद्याप केली गेलेली नाही. रस्त्याच्या कडेला राडारोडा तसाच आहे. इथे असलेला बस थांबा आणि रस्ता यांच्यामध्ये चक्क खणून ठेवलेले आहे. बहुधा एखादी सर्व्हिस लाइन टाकण्याचे काम शिल्लक असावे. त्यामुळे बससाठी प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहावे लागते. शासकीय तंत्रनिकेतनच्या बाहेरील टप्पा तर कमालीचा अरुंद असल्याचे दिसते.
याउलट समोरचा म्हणजे विद्यापीठाकडून शिवाजीनगरकडे येणाऱ्या रस्त्याचा टप्पा कितीतरी रुंद आहे. पुढे तो ई-स्वेअरच्या टप्प्यात पुन्हा अरुंद होतो. या टप्प्यातली आणखी एक समस्या आहेच. रेंज हिल्सकडून ज्यांना मॉडेल कॉलनीत जायचे आहे, त्यांनी वास्तविक पाहता डावीकडे वळून ई-स्क्वेअरच्या पुढच्या चौकातून उजवीकडे वळणे अपेक्षित आहे. पण पळापळीच्या या जीवनात एवढा वेळ कुणाकडे आहे? त्यामुळे हे वाहनचालक सरळ रस्ता ओलांडून समोरच्या बाजूला येतात आणि मग चक्क उलट्या दिशेने जाऊन पुढे ई-स्क्वेअर समोरच्या गल्लीत वळतात. त्यामुळे समोरच्या बाजूने येणाऱ्या वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडते. ई-स्क्वेअरच्या समोर असलेल्या पेट्रोल पंपाच्या समोर रस्ता काहीसा रुंद असला तरीही तो अरुंदच असल्याचे भासते. याला कारण ई-स्क्वेअरमध्ये येणारे प्रवासी मिळविण्यासाठी तेथे उभ्या राहणाऱ्या रिक्षा व अन्य वाहनेही तिथे असतात.
पुणेकरांकडून होणारी ओरड पाहून उड्डाणपुलाचे काम जलद गतीने (?) संपविण्यात आले. त्यामुळे साहजिकच पुलाच्या खाली करायची कामे अद्याप झालेली नाहीत. त्या कामांसाठी येणारे ट्रक, जेसीबी यांची वर्दळ या रस्त्यावर अजूनही काही काळ सुरूच राहणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचा वापर करणाऱ्यांना इथला प्रवास सुखाचा वाटला तरीही खालच्या रस्त्याचा वापर करणाऱ्यांसाठी ती परिस्थिती नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

पुन्हा पुन्हा तीच बेशिस्त

पुण्यात गाडी चालवणं म्हणजे दोरीवरची आणि जिवाचीही कसरत असते. आपल्याला सिग्नल असला, तरीही सगळीकडे नीट पाहूनच पुढे जायला लागतं. कोण, कसा, कधी मधे घुसेल हे सांगता येत नाही. आपल्याला सिग्नल नसताना पुढे जाणं नेहमीचंच आहे. सिग्नल लागायला थोडा वेळ असला आणि सिग्नल लाल झाला असला, तरीही पुढे घुसणाऱ्यांची संख्या भरपूर असते. काल अशीच परिस्थिती मेहेंदळे गॅरेजच्या चौकात झाली होती. आता तिथला रस्ता मोठा झालाय. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याचे तसे काहीच कारण नाही; पण मधे घुसणाऱ्यांचं काय करायचं? ही क्‍लिप पाहून कोण कुठून येतंय, कोणाला सिग्नल आहे, हे ओळखताही येत नाही. आमने-सामने आलेल्या दोन बस. अधेमधे घुसणारे इतर, त्यामुळे सुमारे अर्धा तास इथे ट्रॅफिक जॅम होता. बरं आपण थोडावेळ थांबलो, जरा मागे राहिलो, तर इतर गाड्या जाऊन ट्रॅफिक सुरळीत होईल, इतका साधा विचारही कोणी करत नाही. अशानं कसं होणार?

अपघात होतात, पण कोणीच "पाहत' नाही!

पुण्यातील रस्त्यांवर वाहनचालक बेदरकारपणे वाहन चालवत नागरिकांना उडवत आहेत. दिवसा ढवळ्या अपघात घडवणारे निघून जातात. चार बघेही जमतात. काही जण अपघातग्रस्तांना मदतही करतात. मात्र; अपघाताची माहिती देण्यास कोणी पुढे येत नाही. खूप संतापजनक गोष्ट आहे ही. या साऱ्यामुळे अपघात करणारे खुलेआम फिरत आहेत. त्यांना शिक्षाच झाली नाही, तर अशा प्रकारे बेदरकारपणे गाड्या चालविणाऱ्यांची संख्याही वाढण्याची शक्‍यता आहे. मुळात आज दुसरे जात्यात आहेत. आताची परिस्थिती कायम राहिली, तर आपल्यासारखे सुपातले जात्यात येण्यास कितीसा वेळ लागणार आहे?
नुकत्याच शहरात असा दोन घटना घडल्या. होळकर पुलाजवळ झालेल्या अपघातामध्ये डॉक्‍टर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. "बीएमसीसी'जवळ झालेल्या अपघातातील तरुण रुग्णालयात गंभीर अवस्थेमध्ये आहे. मात्र, हे दोन्ही अपघात कसे घडले, कोणी घडवले, हे सांगणारे अजून कोणी पुढे आलेले नाही.

बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने एक मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला. तो कोमात असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दत्तात्रेय शांताराम पवळे गेल्या बुधवारी सकाळी मोटारसायकलवरून कामावर जात असताना फिरोदिया हॉस्टेलनजीक त्याला अज्ञात वाहनाची धडक बसली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला बेशुद्धावस्थेत जोशी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर आहे. अपघातासंदर्भात कोणाला माहिती असल्यास विलास पवळे (मोबाईल 9226937144) अथवा महेश पवळे (9850607088) यांच्याशी संपर्क साधावा.

बंडगार्डन पुलावर नुकत्याच झालेल्या एका अपघातातील जखमी महिलेचा उपचार चालू असताना मृत्यू झाला. मात्र, प्रत्यक्ष अपघात पाहिलेले साक्षीदार नसल्यामुळे अद्याप गुन्हा दाखल होऊ शकलेला नाही. 17 जुलैला दुपारी दीड वाजता एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे डॉ. गीतांजली अमित स्वामी गंभीर जखमी झाल्या. काही महिलांनी उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान डॉ. स्वामी यांचा सायंकाळी मृत्यू झाला. हा अपघात पाहिलेल्या अथवा रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या महिलांनी येरवडा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क येरवडा पोलिस ठाणे- 26684456.

नगरसेवकांच्यासाठी नागरिकांच्या अधिकारावर घाला

नगरसेवक हा महापालिकेच्या पैश्यांचा मालक नाही, तर फक्त किल्लेदार आहे. स्थानिक स्वराज्या संस्था अस्तीत्वात आल्या त्याच मुळी लोकांचा कारभारातील सहभाग वाढविण्यासाठी. घटनेने दिलेल्या नागरिकांच्या हक्कावर गदा आणून महापालिका अथ्र्संकल्पातील नागरिकांच्या वाट्याची तरतूद कमी करणारे नगरसेवक कोण. तुमच्या निधीला लागणाऱया कात्रीमुळे तुम्ही लोकांच्या अधिकाराला कशी कात्री लावता. तुम्ही लोकहिताची कामे करता तेंव्हा तुमच्या डोळ्यासमोर फक्त तुमची व्होटबँक असते. नगरसेवकाला हव्या त्याच भागाचा विकास होतो आणि सामान्यांना कोणीच वाली राहात नाही. नगरसेवकांच्या दबावामुळे जर ही नागरिकांच्या सहभागाला कात्री लावली जात असेल तर त्याला कडाडून विरोध झालाच पाहीजे. नागरिकांचा सहभाग वाढला की आपल्या खिशाला कात्री लागेल अशी भिती नगरसेवकांना वाटते आहे का. अथ्तसंकल्प मंजूर करण्यापूवी किती नगरसेवक नागरिकांच्या हक्काच्या बाजूने उभे राहतात हेही या निमित्ताने समजेल.

नगरसेवकांच्या निधीसाठी नागरिकांचा सहभाग बंद...

नगरसेवकांना त्यांच्या वॉर्डमध्ये कामे करण्यासाठी महापालिकेकडून पैसे मिळतात. त्यांची ही तरतूद दुप्पट करण्यासाठी अर्थसंकल्पातील नागरिकांच्या सहभागाची योजना स्थायी समितीने हाणून पाडली आहे. त्यामुळे शेजार समूह गटाची सुमारे चार हजार कामे थांबणार आहेत. 74 व्या घटना दुरुस्तीनुसार महापालिकेच्या कामकाजात नागरिकांना सहभागी करून घेण्यास सांगण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी गेल्या वर्षीपासून महापालिकेने केली. यंदाच्या अर्थसंकल्पात नागरिकांनी सुचविलेल्या कामासाठी प्रभागनिहाय वीस लाख रुपयांप्रमाणे एकूण 7 कोटी रुपयांची तरतूद प्रशासनाकडून करण्यात आली.
या गटांमार्फत कोणती कामे करता येतील, हे ठरविण्यासाठी शहरात खास मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक समूह गटाच्या बैठका घेऊन वस्तीतील किरकोळ कामांची यादी तयार करण्यात आली. अशा सुमारे दोन हजार बैठकांतून चार हजार कामे निश्‍चित करण्यात आली. ही कामे क्षेत्रीय कार्यालयांमार्फत करण्यात येणार होती. मात्र, अशा पद्धतीने नागरिक स्वत: निधीतून कामे करू लागल्यास नगरसेवकांचे महत्त्व कमी होईल, अशी भीती नगरसेवकांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या योजनेवर स्थायी समितीने वरवंटा फिरविला. सात कोटी रुपयांची ही तरतूद नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय तरतुदीत वर्ग करण्यात आली. नगरसेवकांची वॉर्डस्तरीय तरतूद साडेसात लाख रुपयांवरून बारा लाख रुपये झाली आहे. त्यामुळे शेजार समूह गटांना प्रत्येक कामासाठी पूर्वीप्रमाणे नगरसेवकांवरच अवलंबून राहावे लागणार आहे.
केरळमध्ये अशा गटांसाठी तेथील महापालिका विकासकामांतील तब्बल वीस ते तीस टक्के निधी उपलब्ध करते. महापालिका प्रशासनाने याबाबत जनजागृती करून त्यादृष्टीने पाऊल टाकण्यास सुरवात केली होती. मात्र, स्थायी समितीने त्यास खो घातला आहे.
आपणच टॅक्‍स रूपानं भरलेल्या पैशातून आपलीच कामं करण्यात आता नगरसेवकांचा अडथळा आला आहे. इतर देशांत जेवढा टॅक्‍स तेवढ्या सुविधा असा सरळ साधा नियम पाळला जातो. आपल्याकडे मात्र टॅक्‍स भरा, पेट्रोलवरच्या जकातीचा बोजाही सहन करा आणि वाईट रस्ते, गटारे, पाणी पुरवठा हे त्रासही सहन करा, अशी परिस्थिती आहे. त्यात नागरिक सहभागातून कामे करण्यासही आता अडकाठी? या साऱ्याला काही अर्थ आहे का?

कालचाच पाठ पुढे सुरू...





चौकाचौकांत बेशिस्त!

1. शनिपार चौक झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असते, हे या वाहनचालकांच्या गावीही नाही. झेब्रा क्रॉसिंगच्याही पुढे "धावण्या'ची या वाहनांची जणू शर्यत लागली आहे.
2. भाऊसाहेब खुडे चौक (सिमला ऑफिस परिसर) येथेही झेब्रा क्रॉसिंग दिसूच द्यायचे नाही, असे चारचाकी वाहन चालकांनी ठरविले दिसते!
3. जेधे चौक (स्वारगेट परिसर) येथेही तीच गत. झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडायचाच नाही, अशी जणू यांनी प्रतिज्ञाच केली आहे!
हे असंच चालू असतं. कितीही सांगा "स्वयंशिस्त' हा शब्दच माहीत नसल्यासारखं आपण वागत असतो. कसं व्हायचं अशानं?

ठिकाण : १, वाहतूक नियमभंग : ४, मिनिटे : ७ !



एकाच ठिकाणी म्हणजे पुण्याच्या सारसबागेच्या परिसरात वेगवेगळ्या नागरिकांनी केवळ सात मिनिटांच्या कालावधीत वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर कसे बसविले, याची ही झलक. सार्वजनिक जीवनात स्वयंशिस्तीने वागायचेच नाही, अशीच वृत्ती या चारही छायाचित्रांतून दिसत नाही काय? वाहने चालवितानाची नागरिकांची ही बेशिस्त टिपली आहे छायाचित्रकार योगेश जाधव यांनी !

वैश्‍विक तापमानवाढ आणि पुणे पोलीस !

वैश्‍विक तापमानवाढ रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांत पुणे शहर पोलिसही आता सहभागी होत आहेत. यंदाचा पावसाळा संपण्यापूर्वी शहरात २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प पोलिसांनी केलाय. त्यासाठी शहरातल्या सगळ्या पोलिस ठाण्यांना सध्या रोपांचं वाटप करण्यात येत आहे.

या मोहिमेनुसार शहरातल्या सर्व पोलिस ठाण्यांत, तसेच पोलिसांच्या ताब्यात असलेले भूखंड, कार्यालये यांच्या आवारात वृक्षारोपण होईल. त्यात आंबा, पिंपळ, वड, नारळ, चिकू, लिंबू याबरोबरच मोहगुणी, सिल्व्हर ओक, जाक्रंड, गुलमोहर, शिलू आदी झाडे लावण्यात येतील. सध्या प्रत्येक पोलिस ठाण्याला प्रत्येकी १५०-२०० रोपं देण्यात येत आहेत. ती त्यांनी त्यांच्या आवारात किंवा परिसरात लावणं अपेक्षित आहेत, त्यासाठी पाठपुरावाही होणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त जयंत उमराणीकर यांनी दिलीय.

पुणे पोलिसांचा हा उपक्रम नक्कीच अभिनंदनीय आहे. पण, त्याहीपेक्षा पुण्यातली वाहतूक धडपणे धावण्यानं, रस्त्यांची धुराडी बनण्यापासून थांबवण्यानंही वैश्‍विक तापमानवाढ रोखण्यात मदत होणार नाही का...?

रंगरंगोटी की मुलांचं शिक्षण ?

आज दोन बातम्या आहेत. दोन्ही पुणे महापालिकेशी संबंधित. एक बातमी आहे, ते गेल्या सव्वा वर्षात महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांची रंगरंगोटी करण्यावर तब्बल साडे सोळा लाख रुपये खर्च झाल्याची. आणि दुसरी बातमी पुणे महापालिकेच्या शाळांत घेतलेल्या चाचणी परीक्षेची. या परीक्षेत असं दिसून आलं, की महापालिकेच्या शाळांमधले तब्बल ४१ टक्के विद्यार्थी अप्रगत आहेत...!

जानेवारी २००६ ते एप्रिल २००७ या काळात महापालिकेतल्या विविध पक्षांच्या कार्यालयात फ्लोअरिंग, खिडक्‍यांचे पडदे, टेबल-खुर्च्या, रंगकाम, सोफासेट या कामासाठी पैसे खर्च करणाऱ्यांना ४१ टक्के मुलं अप्रगत राहण्यातला धोका जाणवत असेल का...? की मुलांच्या शिक्षणाकडं लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या ऑफिसात सोफा बसविणं आपल्या नगरसेवकांना अधिक महत्वाचं वाटतं...?

कार्यालयांच्या खर्चाची ई सकाळमधील बातमी वाचण्यासाठी इथे क्‍लिक करा
अप्रगत विद्यार्थ्यांसंदर्भातील ई सकाळमधील बातमी वाचण्यासाठी इथे क्‍लिक करा

शिक्षकांचंही जरा कौतुक करा...!

शिक्षक नीट शिकवत नाहीत...शिक्षकांवर इतर कामांचं ओझं फार वाढलंय...या आणि अशा चर्चा आपल्याकडं नेहमी सुरू असतात. आपली शिक्षण पद्धतीच मुळी चुकीची, या निष्कर्षापर्यंत येऊन ही चर्चा बहुतेक वेळा थांबते. शिक्षक हा पेशा कधी कधी हेटाळणीचा विषयही बनतो. अशा परिस्थितीत पुण्याच्या राधा योगेश केतकर यांचं लख्ख यश प्रयोगशील शिक्षकांना हुरूप देणारं आहे...

केतकर यांनी अमेरिकेतील अवकाश संशोधन केंद्राच्या (नासा) "यूएस स्पेस ऍन्ड रॉकेट सेंटर' या शिक्षण शाखेतील सहा दिवसांचे प्रशिक्षण नुकतंच पूर्ण केलं. या प्रशिक्षणासाठी वर्षातून दोन तुकड्यांमध्ये जगभरातून शिक्षकांची निवड केली जाते. "हनिवेल कार्पोरेशन'च्या पुढाकाराने झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी भारतातील पाच शिक्षकांची निवड झाली होती. त्यात पुण्याच्या "डी. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूल'मधील केतकर यांचा समावेश होता.

अशा शिक्षकांचं कौतुक करण्यानंच त्यांच्यासारख्या इतर शिक्षकांना हुरूप मिळेल...त्याचा परिणाम अर्थातच एकूण शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर होईल...नाही का ?

(ई सकाळवरील सविस्तर बातमी वाचण्याठी इथे क्लिक करा)

आपण कुठं चाललोय...?

दहा ते पंधरा विद्यार्थ्यांनी हातात तलवारी, काठ्या, लोखंडी गज घेऊन थेट वर्गात घुसून दहावीच्या विद्यार्थ्याला मारहाण करण्याची धक्कादायक घटना पुण्यात सहकारनगरमधील लक्ष्मीबाई शिंदे प्रशालेत घडली.

रस्त्यावर मुलांमध्ये होणाऱ्या मारामाऱ्या शाळेच्या वर्गांपर्यंत पोचल्याचेच ही घटना निदर्शक आहे.भर वर्गात दहा-पंधरा विद्यार्थ्यांच्या गटाने हे कृत्य केले. त्यापैकी काही जणांच्या हातात सत्तूरही होते, असे प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्यांचे म्हणणे आहे.

शिक्षणाचं माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशा विशेषणांनी ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात घडलेल्या या घटनेचा धक्का सर्वसामान्य नागरीकांना निश्‍चित बसलाय. आपण कुठं चाललोय...? ही मुलं अशी कशी बिघडताहेत...? दहावीतल्या विद्यार्थ्यांचं वय पेन हातात घेऊन भविष्य घडविण्याचं की तलवार पाजळत दहशत माजविण्याचं ? खूप प्रश्‍नांचं काहूर मनात उमटतंय...काय उत्तरं आहेत या प्रश्‍नांची ?

(ई सकाळवरील सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा)

पॉटरमॅनिया...

पॉटरमॅनिया सध्या पुणेकरांवरही जादू करून आहे. "हॅरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ द फिनिक्‍स' या पॉटर मालिकेतला आणखी एक चित्रपट आज प्रदर्शित झालाय. पुस्तक मालिकेतील अखेरचा भाग, असे भाकीत वर्तवल्या जाणाऱ्या "हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज'च्या जवळपास सगळ्या प्रती बाजारात येण्यापूर्वीच "आरक्षित' झाल्याहेत..
पुण्यात विविध दुकानांत मिळून या पुस्तकाच्या जवळपास दहा हजार प्रती येतील. २१ जुलैला हे पुस्तक बाजारात येतंय. विशेष म्हणजे पुस्तकाची किंमत ९७५ रुपये असूनही ९० टक्के प्रती आरक्षित झाल्याहेत. त्यामुळे २१ जुलैला पहाटेपासूनच दुकानांबाहेर रांगा लागतील, असे चित्र आहे. हॅरी पॉटरचं पुस्तक म्हणजे यशाची खात्री, हे समीकरण डोळ्यांसमोर ठेवून पुस्तक विक्रेत्यांनी नवनवी "मार्केटिंग गिमिक्‍स'ही सुरू केली आहेत.

हॅरी पॉटरचं यश खरंच अद्‌भूत आहे...या यशापासून शिकण्यासारखं खूप काही आहे. पुस्तकाचं मार्केटिंग कसं करावं, खपवावं कसं इथंपासून ते लहान मुलांना वाचायची सवय पुन्हा लावण्यापर्यंत अनेक गोष्टी हॅरी पॉटरनं दिल्या. तुम्हाला काय शिकता आले...? आणि समजा आपण ठरवंल, मराठीत हॅरी पॉटर तयार करायचा, तर...?




स्वच्छ पुण्याचा ध्यास धरू



हिरव्यागार टेकड्यांचे पुणे शहर गेल्या काही वर्षांपासून लोकांची-वाहनांची गर्दी, नद्यांची भीषण अवस्था व कचऱ्याच्या समस्येसाठी ओळखले जाऊ लागले आहे. आपले वैयक्तिक जीवन, आपले कुटुंब निरोगी राहण्यासाठी आपले शहरच आधी निरोगी झाले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी स्वच्छतेबाबतच्या सवयींमध्ये बदल करणे आवश्‍यक आहे. दैनिक "सकाळ' व काही व्यक्ती, तसेच संस्थांनी पहिले पाऊल टाकले आहे.

सोलापूर रस्त्यावरील "मगरपट्टा सिटी' या विशाल आकाराच्या वसाहतीने मात्र पुणेकरांच्या "चालायचंच,' या वृत्तीला छेद देत "हे चालू देणार नाही,' असा पवित्रा घेतला आहे. या ठिकाणी सदनिका किंवा बंगला विकत घेणाऱ्यांशी स्वच्छतेबाबत आधीच करार करण्याची नवी प्रथा संबंधित मालमत्ता विकणाऱ्यांनी सुरू केली आहे. मॉडेल कॉलनीतल्या "वृंदावनम्‌ अपार्टमेंट्‌स'च्या रहिवाशांनी याबाबत दक्ष राहून सुरवात केली आहे. तेथे तर गांडूळ प्रकल्पाची अंमलबजावणीही सुरू झालेली असून, आता फक्त कोरडा कचराच ते बाहेर देतात. बिबवेवाडी व धनकवडी परिसरातल्या नव्या वसाहतींनी मुद्दाम जाऊन बघावेत, असे काही प्रकल्प त्या परिसरात चाललेले आहेत. कोथरूड, पौड रस्ता, मध्य वस्तीतला नवी पेठसारखा भागही यात मागे नाहीत.

शिवाजीनगर परिसरातील विद्यार्थी सहायक समितीच्या लाजपतराय भवनमधील विद्यार्थ्यांनी केलेली साफसफाई इतरांना बरेच काही शिकवून जाणारी आहे. पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी पालखीच्या वेळी संबंधित मार्गाची स्वच्छता ठेवली; तसेच पावसानंतर नदीची स्वच्छता करण्यासाठी विशेष प्रयत्न केले ते, त्यांना पाठ्यक्रमापलीकडे खूप काही देऊन गेले असणार. भोसरीतील सुंदरबाई मराठे विद्यालयातील विद्यार्थीही परिसरसफाई हा महत्त्वाचा धडा रोज गिरवीत आहेत.

हे सारे केले नाही, तर पुण्यात आपल्याला राहायला जागा उरणार नाही, अशी भीती वाटण्याजोगे कोरड्या कचऱ्याचे ढीग नव्याने उभे राहत आहेत.

तुम्ही व्यक्तिगत किंवा सोसायटीच्या पातळीवर स्वच्छतेसंदर्भात काही करता आहात ? असल्यास तो इथं जरूर शेअर करा. स्वच्छतेसंदर्भात तुमच्या सूचनाही मांडा. शिवाय आपल्या भागातल्या कचऱ्याची छायाचित्रही द्या.


अमोद साने यांचा उपक्रम पाहण्यासाठी इथे क्लिक करा

गढूळ पाणी येतंय...? तुरटी फिरवा !

"हल्ली आमच्याकडे नळ सुरू केला की पाण्याऐवजी चहाच येतो,'' ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे सिंहगड रस्ता, कात्रज, धनकवडी या परिसरातील नागरिकांची. या मागचे कारण आहे, ते या परिसरात गेल्या आठ दिवसांपासून होणारा गढूळ पाणीपुरवठा. गढूळ पाण्यावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी केवळ तुरटी वापरून पाणी शुद्ध करण्याचा सल्ला नागरिकांना देऊन पुणे महापालिका बाजूला झाली आहे. महापालिकेतील गैरव्यवहार आणि अकार्यक्षमतेमुळेच या परिसरातील सुमारे चार लाखांहून अधिक नागरिकांना गढूळ पाणीच प्यावे लागत आहे. वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा वेळेत उभी राहू न शकल्यामुळे ही समस्या निर्माण झाली. यापूर्वी या केंद्राच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी महापालिकेने संबंधित कंत्राटदारास नोटीस बजावली होती. त्याविरुद्ध त्याने न्यायालयात जाऊन स्थगिती घेतली. त्यामध्ये काही महिने गेले. स्थगिती उठल्यानंतर हे काम प्रशासनाने दुसऱ्या कंत्राटदाराला दिले. मात्र, ते देताना स्थायी समितीचा आदेश धुडकावला. त्यामुळे त्या कंत्राटदाराचे बिल अदा केलेले नाही. बिल न मिळाल्यामुळे कंत्राटदाराने पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा उभारण्याचे काम अर्धवट ठेवले. या सर्व गोष्टी स्थायी समितीच्या निदर्शनास आणून केवळ मान्यता घेऊन काम सुरू करावयाचे आहे. ते करण्यासाठी प्रशासनाला "मुहूर्त' सापडत नाही. या परिसरातील नागरिकांना तुरटीचे वाटप करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ही तुरटी क्षेत्रीय कार्यालय आणि संपर्क कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. आयटी, उद्योग क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर झेपावणाऱ्या पुणे शहरातील नागरीकांना शुद्ध पाणी मिळत नसेल, तर केवळ तुरटीचे वाटप करून महापालिकेला हात झटकता येतील का...?

नाल्यांवरची अतिक्रमणं तपासणार...



शहरातल्या नाल्यांरवच्या अतिक्रमणांची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, या अतिक्रमणांची तपासणी आजपासून तातडीने हाती घेण्याचे आदेश विभागीय आयुक्त नितीन करीर यांनी दिले आहेत. अतिक्रमणांच्या विळख्यात हरवलेली रामनदी आणि आंबिल ओढ्यापासूनच ही तपासणी सुरू होईल. या अतिक्रमणांविरुद्ध महापालिका, भूमी अभिलेख आणि महसूल यंत्रणा यांच्या वतीने एकत्रित कारवाई करण्यात येणार आहे.
"नदीने तारले; पण ओढ्या-नाल्यांनी मारले,' अशी परिस्थिती कालच्या मुसळधार पावसानंतर निर्माण झाली होती; त्यामुळे पुणेकरांचे काल मोठे हाल झाले. या ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमणे; त्यामुळे वळविलेले प्रवाह, मध्येच घातलेल्या भिंती यामुळे काल अनेक उपनगरांत हाहाकार उडवून दिला होता. याची आज सर्वच यंत्रणांनी गांभीर्याने दखल घेतली आहे.
या तपासणीतून काय निष्पन्न होणार? अतिक्रमणे हटविली जाणार का? मुळात ती होताना सगळ्यांनी डोळे का बंद केले होते? असे प्रश्‍न आता उभे राहात आहेत.
रस्त्यांची स्थिती आतापासूनच वाईट व्हायला लागली आहे. रविवारी रात्री पौड रस्त्यावर न्यू फ्रेंड्‌स सोसायटीच्या पुढच्या चौकात रस्त्याची नदी झाली होती. पाण्याचा निचरा होण्यासाठीची व्यवस्था अपुरी आणि जिथे तिथे झालेल्या कॉंक्रीटीकरणामुळे पाणी जमिनीत मुरत नाही. आता ही परिस्थिती पुढे काय होणार?