व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

ई-कचऱ्याचा नवा राक्षस सर्वांच्या मानगुटीवर

मोठे उद्योग आणि श्रीमंत वर्गच नव्हे, तर सर्वसामान्य माणसाच्या मानगुटीपर्यंत ई-कचरा या आधुनिक राक्षसाचे भयावह पंजे येऊन पोचले आहेत. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताज्या अहवालानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात 2015 पर्यंत तब्बल चार हजार टन ई-कचरा गोळा होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. चालू वर्षांत या संपूर्ण परिसरात 3600 टन ई-कचरा जमला आहे. एकूण महाराष्ट्रातील 20,270 टन ई-कचरा ही आकडेवारी थक्क करणारी आहे.
"जुनी वस्तू द्या व नवी सवलतीत मिळवा', तसेच "वापरा व फेका' या विक्रीतंत्रामुळे ई-कचरा नावाचा राक्षस अक्राळविक्राळ होत चाललेला आहे. जागोजागी ढीग अशा स्वरूपात त्याच्या पाऊलखुणा लवकरच दिसू लागल्यास नवल नाही. याचे कारण म्हणजे या कचऱ्याचे विघटन ही समस्या आज आहेच, पण ती भविष्यात मोठ्या स्वरूपात समोर उभी राहील, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
संगणक, त्याच्याशी संबंधित प्रिंटर, स्कॅनर, सीडी इत्यादी सर्व हार्डवेअर उपकरणे बाद झाल्यावर ई-कचरा बनतात. फॅक्‍स, दूरध्वनी संच, व्हीसीआर, व्हीसीडी, रेडिओ, टेपरेकॉर्डर, दूरचित्रवाणी संच, रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह ओव्हन व कपडे धुण्याचे यंत्र वगैरे सारे नंतर ई-कचरा या वर्गात मोडते. मोबाईल फोनची त्यात नव्याने भर पडू लागली आहे. याचाच अर्थ मोठ्या कंपन्यांपासून घरगुती वस्तूंपर्यंत बरेच काही ई-कचऱ्याचे रूप घेऊन आपल्या मानगुटीवर बसायला सज्ज झाले आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड "आघाडी'वर
ई-कचरा निर्माण करणाऱ्या देशभरातील पहिल्या दहा शहरांमध्ये पुणे व पिंपरी-चिंचवडची गणना होते आहे. या कचऱ्यामुळे आरोग्याला थेट धोका संभवतो. कॅडमियमच्या दुष्परिणामाने मूत्रपिंडांमध्ये विष पसरते. शिसे लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम करते. पारा हा मेंदू व मूत्रपिंडांसाठी घातक ठरतो, तर "बीएफआर' शरीराच्या आतील स्रावांमध्ये गंभीर बिघाड निर्माण करतात. यापैकी काही घटक तर मातेच्या दुधातही आढळतात, असे स्वीडन व अमेरिकेतील काही ठिकाणच्या संशोधनांतून लक्षात आले आहे.
यावर काही उपाय शोधता येतील का? भविष्यातला मोठा धोका टाळायचा असेल, तर वर्तमानातच पावले उचलायला हवीत. तुम्हाला काय वाटते? तुमच्या डोक्‍यात आहे का काही उपाय?

तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याचा प्रकार

बाणेर आणि कोथरूड परिसरात भिंत कोसळून ११ जणांना जीव गमवावा लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे पुन्हा नाला आणि ओढ्यातील अतिक्रमणांचा विषय समोर आला. अशी अतिक्रमणे हटविण्यात येतील, अशी घोषणा महापालिका आयुक्तांनी केली. मात्र; "हा तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याचा प्रकार' आहे.
महापालिकेच्या हद्दीतून सुमारे शंभरहून अधिक ओढे आणि नाले वाहतात. परंतु याची नोंद महापालिकेकडे नाही. याचा फायदा बांधकाम व्यावसायिक घेत आहेत. तर ज्या नाल्यांचा समावेश विकास आराखड्यात आहे, त्यावर प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने बांधकाम व्यावसायिकांनी ते बुजविण्याचा धडका लावला. पावसाळा सुरू होऊन दोन दिवस होताच अकरा जणांना आपला जीव गमवावा लागला. पावसाळा अजून चार महिने आहे. आणखी किती जणांचा जीव जाण्याची महापालिका वाट पाहणार ?

पुणे प्रतिबिंब न्यूज बुलेटिन

मित्रांनो,

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी "पुणे प्रतिबिंब'ब्लॉगचं पुढचं पाऊल आहे न्यूज बुलेटिन. उजव्या बाजूच्या आयकॉनवर क्‍लिक केल्यानंतर तुम्हाला निवडक बातम्या ऐकता येतील. (सध्या ई सकाळ वरील न्यूज बुलेटीन आहे) त्या ऐका, तुमची मतं आम्हाला कळवा.
पुण्यातील कोणत्या बातम्या तुम्हाला ऐकायला आवडतील? बातम्या सकाळी अपलोड कराव्या की संध्याकाळी? का दोन्ही वेळेला?
तुमची मतं नक्की कळवा...

शाळांचा नव्हे; शिक्षकांचा दर्जा घसरतोय

काल पुण्यात हुजूरपागा शाळेतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील आले होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी दोन महत्त्वाच्या मुद्‌द्‌यांवर मत प्रकट केले. ते मुद्दे होते मुला-मुलींमधील समानता आणि शिक्षणाची आजची स्थिती. या दोन्ही मुद्‌द्‌यांवर त्यांनी खरोखरच स्पष्ट मत दिले आहे. त्यांचे दोन्ही मुद्दे पुढीलप्रमाणे :

विलासराव देशमुख : ""मुला-मुलींमध्ये केला जाणारा भेद केवळ कायदे करून संपुष्टात येणार नाही. त्यासाठी समाजाची मानसिकताच बदलायला हवी. एकीकडे महाराष्ट्राच्या प्रतिभा पाटील यांच्या रूपाने प्रथमच राष्ट्रपतिपदावर महिला विराजमान होणार असून, हा राज्यासाठी बहुमान आहे; तर दुसरीकडे त्याच राज्यात स्त्रीभ्रूण हत्येमुळे सामाजिक असमतोलही उद्‌भवला आहे. हा असमतोल कमी करण्याकडेही तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.''
आर. आर. पाटील : ""स्त्रीभ्रूण हत्येद्वारे जन्माला येण्याचा हक्कच नाकारला जाणे, ही चिंतेची बाब आहे. लग्नासाठी चांगले स्थळ मिळावे म्हणून मुलींना शिकविणारे अनेक पालक आहेत; पण त्यांच्या कर्तृत्वाचे मोजमाप केले जात नाही. समाजातर्फे आजही मुला-मुलींमध्ये भेद केला जात असून, तो दूर व्हायला हवा.''

शाळांचा नव्हे; शिक्षकांचा दर्जा घसरतोय
""राज्यातील शाळांचा नव्हे, तर शिक्षकांचा दर्जा घसरतोय, ही दुर्दैवी बाब आहे. शिक्षकांचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. कोट्यवधी रुपये खर्च करूनही राज्यातील सर्व मुला-मुलींना समान शिक्षण मिळत नाही. सरकारकडून अनुदान कसे मिळते, यावरच सध्या सर्वांचे लक्ष आहे; पण विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोचविण्याच्या तळमळीकडे दुर्लक्ष झाले आहे. अजूनही राज्यातल्या चौथी उत्तीर्ण असलेल्या काही विद्यार्थ्यांना लिहिता-वाचता येत नाही, हा दोष कोणाचा? सरकारतर्फे अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या असूनही मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत फारशी वाढ झाल्याचे आढळत नाही. जिल्हा परिषद आणि महापालिका शाळांपेक्षा अधिक चांगले शिक्षण खासगी शाळांत मिळेल, असा विचार पालकांतर्फे केला जात असल्याने सरकारी शाळांमधील विद्यार्थीसंख्याही घटली आहे. त्यामुळेच या शाळांमधील शिक्षकांचा दर्जा जास्तीत जास्त सुधारावा लागेल.''

काय वाटते तुम्हाला? तुम्हीही या मुद्‌द्‌यांशी सहमत आहात?

शांत, निवांत (?) प्रभात रोड...

काही दिवसांपूर्वी आपल्या एका मित्रानं ही क्‍लिप पाठवली. एकेकाळी शांत, निवांत असणाऱ्या प्रभात रोडची आजची स्थिती या क्‍लिपमधून दिसते. संध्याकाळच्या "पिक अवर्स'ना होणारी वाहतुकीची कोंडी आता नित्याचीच झाली आहे. हे का होत असावं, याचा शोध घेण्याचा आम्हीही प्रयत्न केला. काय सापडलं? पुन्हा तेच आपलीच बेशिस्त! पोलिस नसणं, वाहतुकीचं नियंत्रण नसणं या नेहमीच्या गोष्टी होत्याच.
तरीही आपली बेशिस्त जास्त खटकत होती. आणि कोणीतरी तिथं उभं असलं, तरच वाहतूक सुरळीत असणं, याला काय अर्थ आहे? वळणाऱ्याला वळू दिलं तर जास्तीतजास्त 30 सेकंद जातात. पण त्याचवेळी आपणही मधे घुसलो, तर किमान अर्धा तास जातो, हे गणित अजून आपल्याच लक्षात येत नाही. खरंच यावर मनापासून विचार करायला हवा. फक्त विचार नको, तर तो विचार कृतीत बदलायला हवा.






Prabhat Road traffic from sakaal papers on Vimeo

आता सामान्यांनी करायचं तरी काय?

लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी या साऱ्यांनी मिळून देशाचा, राज्याचा किंवा शहराचा कारभार चालवायचा असतो. या साऱ्यांवर जनतेचा वचक असावा, अशीही संकल्पना आहे. आपण मान्य केलेल्या "लोकशाही'च्या संकल्पनेतूनच हे मॉडेल तयार झाले आहे. "लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालविलेले राज्य' हे खरे असले, तरी प्रत्येक नागरिकाने कारभार चालवायचा ठरवला तर गोंधळ होईल. यासाठीच लोकनियुक्त प्रतिनिधी आणि त्यांच्या मदतीला प्रशासकीय अधिकारी असे योग्य कॉम्बिनेशन असते. यांनी पारदर्शक पद्धतीने कारभार चालवावा, अशीही रास्त अपेक्षा असते.
सध्या मात्र ही सारी व्यवस्था म्हणजे स्वप्नरंजन असावे असे वाटते. आजच्या तीन बातम्या अशाच धक्का देणाऱ्या आहेत. लोकशाही व्यवस्थेची खिल्ली उडवणाऱ्या आहेत. पहिली बातमी नगरसेवक राजन काची यांची. एका व्यापाऱ्याकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना लाचलुचपत खात्याने पकडले आणि अटक केली.
दुसरी बातमी आहे नेहमीच्याच जकात खात्याची. खुद्द उप महापौरांकडेच या खात्याच्या लोकांनी, म्हणजे जकात कारकुनाने दिमतीला ठेवलेल्यांनी लाच मागितली. त्यांनी ही गोष्ट पालिकेत कळवल्यानंतर "मिटवून टाकू' असा सल्ला देण्यात आला.
तिसरी बातमी आहे समाजमंदिरांची. मनपाच्या खर्चाने बांधलेली ही समाजमंदिरे बहुधा नगरसेवकांच्याच संस्थेला अल्प भाड्याने देण्यात येतात. बरे ही मंडळी त्याचा त्यांना हवा तसा वापर करतात. ज्यांच्यासाठी समाजमंदिरे बांधायची ते त्यापासून वंचितच राहतात. तर अशा संस्थांना समाजमंदिरे भाड्याने देऊ नये, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. निकाल देताना न्यायालयाने ताशेरेही मारले होते. तरीही यावर्षी ही समाजमंदिरे पुन्हा एकदा नगरसेवकांच्याच संस्थांना भाड्याने देण्याचे घाटले. जागरूक नागरिकांनी त्याविषयी आयुक्तांकडे तक्रारही केली आहे. हा न्यायालयाचा अवमान होईल असेही सांगितले आहे. पुढे काय होते, ते मात्र माहीत नाही.
हे सगळे चाललेय तरी काय? त्यांना आपण निवडून दिले ते आणि मदतीला असलेले प्रशासन सगळेच भ्रष्टाचारी असल्याचे दिसत आहेत. काही सन्माननीय अपवाद आहेत. पण ते फक्त नियम सिद्ध करण्या पुरते, असे आता वाटू लागले आहे. बरे हे सारे चालते ते आपण भरलेल्या करांच्या पैशातून.
या परिस्थितीत करायचे तरी काय? आपण काय करू शकतो? का हतबलतेने पाहण्याशिवाय आपल्या हातात काहीच नाही?

तड तड तडम तड तड...

हो.... असे आवाज सध्या आपल्या रस्त्यांवरून ऐकू येत आहेत. खोटं वाटत असेल तर मयूर कॉलनी आणि अजंठा ऍव्हेन्यू इथल्या रस्त्यांवरून एक चक्कर टाकून या. आवाज ऐकून चक्कर येईल. रस्ते दुरुस्त करताना डांबरीकरण करतात हे बहुधा मनपा आणि या रस्त्यांच्या कंत्राटदाराला माहिती नसावं. कारण या दोन्ही रस्त्यांवर फक्त खडी टाकली आहे. त्यामुळे तड तड तडम तड या आवाजांबरोबर उडणारे खडे, धूळ याचा सामनाही करावा लागतो आहे. टू व्हिलर स्लीप होण्याची भीतीही आहेच! या रस्त्यावरून जाताना हे काम झालंय की वाढवलंय? असा प्रश्‍न पडतोय. अजंठा सोसायटीवरून जाणारा कित्येक दिवस खड्ड्यांचा होता. तो नीट झाला, तर अशी दशा. पावसाळ्यात काय काय भोगावं लागणार आहे, ते मनपाच जाणे!






Mayur colony road from sakaal papers on Vimeo

माझं पुणं... स्वच्छ पुणं....

आपलं पुणं स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी एका मोहिमेची आजपासून सुरवात होते आहे. एकेकाळी खरोखरच सुंदर असलेल्या या शहराचं आताचं रूप या क्‍लिपिंगमधून दिसेल. पुण्याविषयी आत्मियता वाटणाऱ्या, शहर स्वच्छ आणि सुंदर असावं, असं वाटणाऱ्या तुम्हीआम्हीच आता खरोखरच जागं व्हायला हवं. कृतीशील व्हायला हवं. आज संध्याकाळी 4.30 वाजता बालगंधर्व रंगमंदीरात पुण्याचा अभिमान असणारे सारे स्वच्छतेची शपथ घेणार आहेत. चला आपणही त्यात सामील होऊयात...

सोबत घेऊन या...
सुका कचरा.
प्रदर्शन पाहण्यासाठी वेळ.
माझे पुणे-स्वच्छ पुणे करण्याचा संकल्प.
स्वच्छतेसाठी आठवड्यात किमान एक तास देण्याची तयारी.

ही जागा पार्किंगसाठीच वापरा!

पुणे शहराच्या वेगाने होणाऱ्या वाढीमुळे दररोज नवीन वाहनांची भर पडते आहे. एकूण वाहन संख्या 13 लाख 50 हजार असून त्यातील दुचाकींची संख्या 10 लाखांहून अधिक आहे. पार्किंगची सोय त्यामानाने नाही म्हणावी एवढी नगण्य आहे. कोथरूड परिसरातील हजारो नागरिक पौड फाट्यावरील उड्डाण पुलाच्या भागात कामानिमित्त येत असतात. दशभुजा गणपतीच्या दर्शनापासून ते खरेदीसाठी या भागात येणाऱ्या नागरिकांपुढे पार्किंग ही मोठी समस्या आहे. एक डोळा देवाकडे तर दुसरा गाडीकडे, अशी वेळ येते. वाहतूक पोलिसांचा ससेमिरा हीदेखील नित्याची बाब आहे. मुंबईत दादरच्या उड्डाण पुलाखालील सर्व जागा "पे अँड पार्क' पद्धतीने वापरली जात आहे. त्याच धर्तीवर पौड फाट्याच्या उड्डाण पुलाखालील सर्व जागा वापरल्यास येथील पार्किंग समस्या सुटण्यास हातभार लागेल. उड्डाण पुलाखाली काही ठिकाणी हिरवळ आहे. ती कडेने तशीच ठेवून मधील जागा वापरता येईल. संबंधित अधिकारी या गोष्टीचा विचार करून लवकरच निर्णय घेतील, ही अपेक्षा.

गजानन मेहेंदळे

आपलं पुणं खरंच सुरक्षित आहे?

काल कोथरूड भागातल्या वेदविहार सोसायटीत दरोडा पडला. तीन-चार दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून घर लुटलं. मोठी सोसायटी, सुरक्षित मानला गेलेला भाग, सोसायटीची सुरक्षा व्यवस्था हे सगळं असूनही दरोडा पडला. यातूनच प्रश्‍न उभा राहतो, खरंच पुणं सुरक्षित आहे?
सुरक्षित नसल्यास काय करता येईल? यापुढे असे दरोडे पडू नयेत, म्हणून काय काय करता येईल. वेळ आलीच तर शेजाऱ्यांना, पोलिसांना कसं कळवणार? आपण साऱ्यांनी मिळून यावर विचार करायला हवा. उपाय पुढे यायला हवेत. फक्त पोलिसांवर अवलंबून राहून चालणार नाही. आपणही युनिफॉर्म नसलेले पोलिस असायला हवं. तुम्हाला काय वाटतं?

गटारांचं पाणी यंदा रस्त्यांवर साचणार नाही

महापालिकेनं पावसाळ्यापूर्वीची तयारी पूर्ण केली आहे. शहरातील पावसाळी गटारं साफ करण्याचं काम संपत आलंय. पाणी साचून राहणाऱ्या ठिकाणांचं सर्वेक्षण करून जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा शहरातील रस्त्यांना तळ्याचं स्वरूप येणार नाही असा दावा महापालिकेने केला आहे.
ज्या रस्त्यांवर पावसाळी गटारांची व्यवस्था नाही, पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही, अशा ठिकाणांची माहिती मध्यंतरी दोन दिवस झालेल्या पावसात घेण्यात आली. अशा ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर पंपिंग यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नैसर्गिक ओढे आणि नाले आहेत. त्यांच्या साफसफाईवरदेखील आता लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
शहरात 1800 किलोमीटर लांबीचे रस्ते
त्यापैकी केवळ 190 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर पावसाळी गटारांची व्यवस्था.
गटारे साफसफाईचे काम अंतिम टप्प्यात
पावसाळी गटारांची व्यवस्था नसलेली ठिकाणे निश्‍चित.
अशा ठिकाणचे पाणी उपसा करण्यासाठी पंपिंग यंत्रणा उपलब्ध करून देणार
रस्त्याच्या समपातळीत नसलेली गटारे समपातळीत आणण्याचे काम सुरू
नाल्यांच्या साफसफाईच्या कामाला सुरवात

काम संपता संपेना....

शहरातील अत्यंत वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या रस्त्यांपैकी एक अशा कर्वे रस्त्याचे काम सुरू होऊन दोन वर्षे उलटली. नुकताच या कामाचा तिसरा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. गेल्या शनिवारी पत्रकारांबरोबर आयुक्त प्रवीणसिंह परदेशी आणि अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केली. तेव्हा हा रस्ता पाच जूनपर्यंत पूर्ण करणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. आज भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्यासह पत्रकारांनी रस्त्याची पाहणी केली. या रस्त्याची सद्यःस्थिती दर्शविणारी ही छायाचित्रे.

कचरा फेकताय?..... सावधान!


रस्त्यावर कचरा टाकत असाल, तर खबरदार! तुमच्यावर आता महापालिकेचीच नव्हे; तर स्वयंसेवी संस्थांचीही नजर राहणार आहे. कचरा टाकताना आढळल्यास तुमच्यावर नोटीस बजावण्याची कारवाईही या संस्थाच करतील. कचरापेट्यांमध्ये व्यवस्थितपणे कचरा टाकण्याचा अनेक पुणेकरांना कंटाळा असल्याचे ठिकठिकाणच्या कचरापेट्या पाहिल्या की दिसून येते. आजूबाजूला पाहत
कोणाची नजर नाही, याची खात्री करून हळूच रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांची संख्याही शहरात काही कमी नाही. इमारतीमधूनच कचऱ्याने भरलेली प्लॅस्टिकची बॅग भिरकावून देण्याची सवय काही गृहिणींना आहे. ही बॅग कधी रस्त्यावर येऊन फुटते; तर कधी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या अंगावर पडून त्यांच्यावर ओल्या-सुकचऱ्याचा वर्षाव करते.
अशा सवयी मोडण्यासाठीच महापालिकेने हे पाऊल उचलले आहे. आपणही आता मागे राहून चालणार नाही. आपले शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. स्वत:ला अशा सवयी असतील, तर त्या मोडणे आणि इतरांमध्ये जागृती निर्माण करणे, हे आता आपण केलेच पाहिजे. तुम्हाला नाही वाटत असे?