व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

पौड रस्त्याचं काम झालंय...

पौड रस्त्यावर चाललेलं कॉंक्रिटीकरणाचं काम बरचसं पूर्ण झालंय. आज सकाळपासून डायव्हर्जनही बंद केलंय. अर्थात पुन्हा एकदा अचानकच झालेल्या या बदलामुळे वाहनांची कोंडी झालीच होती. कॉंक्रिटच्या रस्त्याच्या स्लॅबचं काम थोडं शिल्लक राहिल्यामुळं तिथून जाण्याची अद्याप परवानगी नाही. मोरे विद्यालयाकडून पुढे आल्यानंतर बसस्टॉपपाशी म्हणजे या रस्त्याच्या तोंडाशी वाहनांची गर्दी होत होती. आजचा पहिलाच दिवस असल्यामुळं कदाचित असे झाले असावे. उद्यापासून ही वाहतूक सुरळीत होईल, अशी आशा करूया!

हा "कचरा' कोण काढणार?




महापालिकेपासून दोनशे मीटर अंतरावरचा शांत रस्ता.... त्यावर गेली पन्नास वर्षे सुरू असलेला गादी कारखाना.... सकाळी अचानक महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाची गाडी समोर येऊन थांबते.... खाकी गणवेशातील काही कर्मचारी कारखान्यात येतात आणि तुम्ही फार कचरा करता, तेव्हा दंड भरा, असे दरडावतात... दररोज नियमाने आपला कचरा पेटीत नेऊन टाकणारा मालक गडबडतोच; पण "नोटीस द्या म्हणजे दंड भरतो,' असे या अधिकाऱ्यांना धैर्य एकवटून सांगतो.... "काहीतरी तडजोड करा; जाऊ द्या, असा सल्ला काही झाले तरी ऐकणार नाही,' असेही सुनावतो... त्यावर मग साहेबांना फारच राग येतो... "आता तुम्हाला अद्दलच घडवतो,' असे सांगत ते आपल्या मोबाईलवरून आदेश देतात..... काही क्षणांतच कचरा भरलेला कंटेनर कारखान्यासमोर येतो आणि तो तेथेच ठेवण्याचा आदेश दिला जातो.... "हे काय,' असा प्रश्‍न विचारणाऱ्या कारखानदाराला मग बरेच काही ऐकवले जाते.... "तुम्ही नोटीस मागता का? आम्हाला कळते कोणाला काय द्यायचे ते.... आमच्याशी हुज्जत का घातली,' असे विचारत "साहेब' आणखी आदेश देतात... कोठूनतरी "हॉस्पिटल वेस्ट' आणून या कंटेनरमध्ये ओतला जातो... "आता काय करायचे ते करा,' असे बजावून पालिकेचे अधिकारी निघून जातात. या सर्व प्रकाराने भांबावलेल्या नागरिकांनी आधीच प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपलेला असतो....
किती भयंकर प्रकार आहे हा... आयुक्त सांगतात त्यानुसार अशी शिक्षा करायला हवी का? शिक्षा करण्याआधी चौकशी करायला नको? की, असे प्रकार झाले तरच "पब्लिक' सुधारेल?

रस्ते दुरुस्ती वेगाने...

महापालिकेच्या वतीने रस्तेदुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली असून, पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होण्यासाठी आता क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर कनिष्ठ अभियंता नेमण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आपल्या भागातील रस्ते दुरुस्ती अथवा खड्डे दुरुस्तीसाठी संबंधित अभियंत्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
चौदा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 15 कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी पुरेसा कर्मचारीवर्ग देण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांची क्षेत्रीय नावे आणि दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे
औंध क्षेत्रीय कार्यालय- डी. पी. गवळी आणि नितीन चिमोटे (25897982 /9422306517/ 9823514244)
भवानी पेठ - आर. पी. देवडे (26437040/9823628830)
ढोले पाटील रस्ता- एम. एम. थोपटे (26141470/9923485706)
हडपसर - विक्रांत लहाने (26821092/9923483451)
कर्वे रस्ता- एन. टी. उथळे (25432620/9823190016)
विश्रामबागवाडा-कसबा पेठ - राजेंद्र अर्धापुरे (24431461/9923426088)
वारजे-कर्वेनगर - ए. पी. कोळेकर (25432192/ 9422319195)
टिळक रोड- आदित्य तडवी (25508098/9823235941)
सहकारनगर- व्ही. के. वाघमोडे (25508800/9923482580)
बिबवेवाडी- श्रमिक शेवटे (25508700 / 9823203636 )
धनकवडी- बी. एम. वाघ (24317154 / 9823388925)
घोले रस्ता- हनुमान खलाटे (25501550/ 9850007285)
येरवडा- विजय शिवथर (26630103 /9850092365 )
संगमवाडी- मुस्ताक शेख (25509150 / 9822045786)

पीएमटीच्या थांब्यांना छतच नाही

शहर व परिसरात असलेल्या पीएमटीच्या अठराशे थांब्यांपैकी पावणेसातशे थांब्यांना छत (शेड) नसल्याने हजारो प्रवाशांचे उन्हातान्हात हाल सुरू आहेत. माहितीच्या अधिकारात पीएमटीनेच दिलेल्या उत्तरामध्ये ही माहिती उघड झाली आहे. सजग नागरिक मंचाचे जुगल राठी यांनी याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागविली होती. त्याला पीएमटीने उत्तर दिले आहे. शहर व परिसरात अठराशे बस थांबे आहेत. त्यापैकी ६९० थांब्यांना छत उभारण्यात आले आहे, तर ६६९ थांब्यांना छत नसल्याचे यामध्ये म्हटले आहे."उरलेल्या थांब्यांना छत उभारण्याबाबत "कार्यवाही सुरू आहे,' असे उत्तर त्यांना देण्यात आले आहे. साडेचारशे बसथांब्यांना छत उभारण्यासाठी ही निविदा काढण्यात आली होती. परंतु, त्यांपैकी दहा टक्के म्हणजे केवळ ५० थांबेच पूर्ण झाल्याची कबुलीही पीएमटीने दिली आहे. या अर्जातच पाट्या नसलेल्या थांब्यांबद्दलही माहिती मागविण्यात आली होती. परंतु, त्याची माहिती देण्यात आली नाही.

पाऊस आला.....!!!

बरेच दिवस तगमग होत असतानाच आता दुपारी पावसानं पहिली सलामी दिली. या सरीवर सरींनी मनालाही आल्हाद दिलाय... ऑफिसमध्येच असल्यामुळं खाली उतरून चिंब भिजणं शक्‍य नसलं, तरी मन मात्र ओलं झालंय. त्या भरून आलेल्या आभाळानी आणि बरसलेल्या धारांनी तृशार्त धराही चिंब झाली. तिचं ते चिंब होणं आपल्यापर्यंत पोचवलंय त्या मृद्‌गंधानी... आता खाली उतरून भिजता येत नसलं, तरी चहा आणि भजी मात्र शक्‍य आहे....
सो चिल आऊट विथ टी अँड भजी....
हां... पावसातली तुमची एखादी आठवण किंवा कविता इथे शेअर करायलाही हरकत नाही!

प्रश्‍न सुटू लागलेत...!


वाहतुकीचा प्रश्‍न असो की पाण्याचा, अतिक्रमणाचा विळखा असो वा अंतर्गत रस्त्यांचा प्रश्‍न, सिंहगड रोड परिसरात प्रशासनाकडून फार काही हालचाल होत नव्हती. या विविध समस्यांबाबत गेल्या महिन्यापासून आपण ब्लॉगवर आणि "सकाळ' प्रतिबिंब पुरवणीतून आवाज उठविला. त्यावर या समस्या सोडविण्याचे आश्‍वासन सर्वपक्षीय नगरसेवकांनी दिले. सर्वांनी केलेले प्रयत्न आता प्रत्यक्षात उतरू लागले आहेत. नागरिकांच्या काही समस्या आता सुटू लागल्या आहेत.
मांडलेल्या समस्यांपैकी विठ्ठलवाडी ते आनंदनगर परिसरातील ड्रॅनेज लाईनची झाकणे टाकण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर आता पदपथाचे कामकाज सुरू करण्यात येणार असल्याचे नगरसेवक दादा जगताप यांनी सांगितले आहे. रस्ता दुभाजकामधील जागेत पूर्वी कचरा व राडारोड टाकल्याचे निदर्शनास आणल्यानंतर तेथे माती टाकण्याचे काम सुरू झाले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर मधील जागेत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. ओढ्यांच्या साफसफाईचे कामही सुरू झाले आहे. छोट्या-छोट्या गल्ल्यांमधील कचरा व राडारोडा साफ झाला आहे.

कालच्या पानावरून पुढे...

आपण सिग्नल कधीही तोडू शकतो, याची आता खात्री पटत चालली आहे. सोबतचे क्‍लिपिंग सातारा रस्त्यावरचे आहे. बी.आर.टी., कात्रजकडून येणारी जड वाहने, याची पर्वा न करता सिग्नल तोडून बिनधास्त चाललेला स्कूटरस्वार येथे दिसतो. चित्रणात न आलेली महत्त्वाची गोष्ट अशी, हा स्कूटरचालक पुढे जाऊन एका मिनी ट्रकला धडकता धडकता वाचला! तरीही सिग्नल हे तोडण्यासाठीच असतात, असे आम्हाला वाटते!

सिग्नल कोणाला...?

कोथरूडच्या करिष्मा चौकात सध्या "सिग्नल कोणाला...?' असा खेळ (?) सुरू असतो. करिष्माकडून मृत्युंजयेश्‍वर मंदिराकडे वळणारे, फ्लायओव्हरकडून मृत्युंजयेश्‍वरकडे जाणारे आणि मृत्युंजयेश्‍वरकडून करिष्माकडे वळणारे हे यातले मुख्य खेळाडू! बाटा शोरूमकडून येणाऱ्या रस्त्यावर थांबणारे लिंबूटिंबू! रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे सिग्नलला लागलेल्या लांबलचक रांगा आणि स्वत:ला लाल सिग्नल असतानाही पुढे घुसणारे महाभाग... या साऱ्यामुळे इथे वाहतूकीचा "राडा'च होतो.

बिन पैशाचा दिवस


ही गोष्ट परवाची आहे. सकाळी ऑफिसला आल्यानंतर लक्षात आलं आपण पाकीट घरीच विसरलोय आणि खिशात फक्त दीड रुपया आहे. खिशात पैसेच नाहीत, ही भावना अशी शब्दात सांगण्याजोगी नाही. काहीतरी विचित्र वाटत होतं खरं! नशिबानं लायसन्स वरच्या खिशात होतं. म्हणजे घरी परतताना पोलिसानं पकडलं तरी प्रश्‍न नव्हता. पण आता दिवसभर पैसे नसताना वावरायचं म्हणजे काहीतरी विचित्रच वाटत होतं. आता करायचं काय, असा प्रश्‍न उभा राहिला. आज दुपारी कॅन्टिनमध्ये फक्त डबाच खायचा, इतर काहीही घ्यायचं नाही... असं स्वत:लाच बजवावं लागलं. इतर दिवशी चार-पाच वेळा होणाऱ्या चहालाही काट मारावी लागणार होती... (तसं कॅन्टिनमध्ये "खात्या'ची सोय आहे; पण मला ती आवडत नाही.) सकाळी डोकंच भिरभिरलं. ए.टी.एम. कार्ड असतं तर जाऊन पैसे काढून तरी आणता आले असते. कार्डही पाकिटातच असल्यामुळं तीही सोय नव्हती. छे! वैताग आला. सकाळ गेली, दुपार आली. जेवण्यासाठी कॅन्टिनला गेलो. गरम भजी होती; पण मन आवरलं.
दुपारही ढकलली. आता संध्याकाळ झाली. घरी जाण्याची वेळ झाली. मग मात्र मी घायकुतीला आलो. जाताना गाडी पंक्‍चर झाली तर? बिघडली तर? अचानक पेट्रोल संपलं तर? वेगवेगळे प्रश्‍न समोर उभे ठाकले. हो, ना करता करता ऑफिसमध्ये पाकीट विसरल्याची गोष्ट सांगितली. वैभवीनं "ठेवा' असं सांगून 100 रुपये दिले.
घरी गेल्यावर सगळ्यांना पाकिटाचा किस्सा सांगितला. त्यांनी माझ्या "विसरभोळेपणा'ची यथेच्छ टिंगल उडवली. रात्री सगळा हिशोब केला आणि लक्षात आलं, आज आपल्याला एकही पैसा लागलाच नाही! पैसे नसल्यामुळे मनात जे काही होत होतं, ते सोडलं तर इतर काहीही प्रॉब्लेम आलाच नाही! माझा बिन पैशाचा दिवस नेहमीसारखाच गेला की...
कॉलेजमध्ये असताना "कायमचा महिनाअखेर' असायचा. ते दिवस आठवले. अर्थात तेव्हाची गोष्ट वेगळी होती. "पैसा असणं' म्हणजे काय, हेच माहीत नव्हतं. आता ते समजलंय ना...
असे प्रसंग तुमच्या बाबतीतही घडले असतील ना? मग शेअर कराल?

गुड न्यूज....

आज चार चांगल्या बातम्या आहेत. आपल्या सगळ्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आपल्या ब्लॉगने 100 कॉमेंट्‌सचा आकडा पार केला आहे. हिट्‌स 5900च्या वर कधीच गेल्या आहेत.
आपल्या विविध कॉमेंट्‌स आणि त्याला मिळालेली सकाळ प्रतिबिंब पुरवणीची जोड यामुळे काही कामेही होताना दिसत आहेत.
काल आपण कर्वे रस्त्यावर लावलेल्या गाडीविषयी बोलत होतो. आज ती गाडी हलविण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी नळस्टॉप चौकात पाडळे पॅलेसच्या बाजूला असलेल्या खड्ड्याबाबत चर्चा केली होती. तो खड्डाही बुजविण्यात आला आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पौड रस्त्यावर चाललेले कॉंक्रीटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. आज जवळपास निम्म्या रस्त्यावर कॉंक्रीट घालण्याचे काम झाले आहे.
आपल्या चर्चांचा आणि त्याविषयी सकाळ प्रतिबिंब पुरवणीमध्ये येणाऱ्या बातम्यांचा उपयोग होतो आहे, हे नक्की!

ही गाडी हलविणार कोण ?



कालपासून ही अपघात झालेली गाडी कर्वे रस्त्यावर आहे. उभी लावल्यामुळे वाहनांच्या कोंडीत भर घालते आहे. आधीच या रस्त्याचे काम "3 वर्षे' सुरू आहे. त्यात अशा काही गोष्टींची भर पडली, की नळस्टॉपच्या सिग्नलला लागलेली रांग एस.एन.डी.टी. पर्यंत वाढते; पण फिकीर कोणाला? अशी कोंडी झाली, की इतर वाहन चालक आपली गाडी जमेल तशी आणि जमेल तेथून दामटतात. मग त्यांना फुटपाथचा अडसर नसतो, की बसचा!

मुदतीपूर्वी कामे न झाल्याने पुणेकरांना "अनभूती' येणार

Read this news from eSakal -
एकात्मिक रस्ते विकास योजने'अंतर्गत महापालिकेने हाती घेतलेल्या शहरातील दोन महत्त्वाच्या रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. मुदतीपूर्वी ही कामे होऊ न शकल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन रस्ते म्हणजे कर्वे रस्ता आणि कुमठेकर रस्ता! पावसाळा सोडून काम पूर्ण करण्याची मुदत नऊ महिने असताना या दोन्ही रस्त्यांची कामे अद्याप न झालेली नाहीत. हे दोन्ही रस्ते अत्यंत वर्दळीचे आहेत. त्यामुळे कर्वे रस्ता दुरुस्तीच्या कामाचा तृतीय वर्धापनदिन साजरा करण्याची अभिनव कल्पना सजग नागरिक मंच आणि परिवर्तन ट्रस्टने मांडली आहे. ता. १६ मे रोजी ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमास समस्त कर्वे रस्ता दुरुस्तीग्रस्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहनही मंचाचे विवेक वेलणकर आणि डॉ. शैलेश गुजर यांनी एका निमंत्रण पत्रिकेद्वारे केले आहे, तर कुमठेकर रस्ता दोन कोटी रुपये खर्चून टिळक चौक ते विश्रामबाग वाडादरम्यानच्या रस्त्याचे कामदेखील अपूर्ण आहे. या कामाची मुदतही उलटून गेली आहे. शहरातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या रस्त्यांची ही सद्यःस्थिती.

नो पार्किंग? पाच हजार रुपये दंड भरा...



पुण्यातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी रस्त्यावर नको त्या ठिकाणी उभी राहणारी वाहने हे अतिक्रमण ठरवून वाहनचालकांना पाच हजार रुपये दंड करण्याची योजना महापालिकेच्या मदतीने आखली जात असल्याचे, पोलिस आयुक्त जयंत उमराणीकर यांनी सांगितले आहे.
चुकीच्या ठिकाणी वाहन लावणाऱ्याला जास्तीतजास्त 100 रुपये दंड करण्याचा अधिकार पोलिसांना आहे.
मात्र, महापालिकेला यापेक्षा जास्त अधिकार आहेत. त्यामुळेच चुकीच्या जागी वाहन लावणे, हे अतिक्रमण ठरवून त्याला महापालिका कायद्यानुसार पाच हजार रुपये दंड करण्याबाबत चर्चा सुरू आहे.
पुण्यातल्या 1477 चौकांसाठी केवळ 450 पोलिस उपलब्ध आहेत. पोलिसांची संख्या वाढविण्याची मागणी आम्ही शासनाकडे केली असली, तरीही स्वयंशिस्त असल्याशिवाय वाहतुकीची स्थिती सुधारणार नाही, असेही उमराणीकर यांनी सांगितले आहे.
काय वाटतं तुम्हाला? वाहतूक सुधारण्यासाठी दंडाची रक्कम वाढवणे, लायसन्स जप्त करणे अशासारखे कडक उपाय उपयोगी ठरतील, की आयुक्त सांगतात त्याप्रमाणे स्वयंशिस्त आवश्‍यक आहे?
स्वयंशिस्त आवश्‍यक असेल, तर त्यासाठी आपण काय करायला हवे?

लक्‍झरी बसेस आणि आपण

शहरातून गर्दीच्या वेळी फिरणाऱ्या खासगी बसमुळे वाहतूक विस्कळित होण्याचे प्रकार बऱ्याचदा घडताना आपण
पाहतो. आपल्याला त्याचा त्रासही होत असतो. असे असले तरी या गाड्या हव्याच आहेत. परगावी जाणाऱ्यांसाठी ती चांगली सोय आहे. मग यावर उपाय काय? लक्‍झरी बसेससाठी वेगळे स्टॉप करता येतील का? गोव्यामध्ये पणजी, मडगाव अशा ठिकाणी बस स्टॅंडच्या बाहेरच खासगी गाड्यांसाठी सोय करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीला त्रास होत नाही, आणि प्रवाशांचीही सोय होते. आपण याबाबत गेली कित्येक महिने फक्त विचारत करत आहोत. आता वेळ आली आहे, ती काहीतरी पावलं उचलण्याची.

पाणी साठण्याची ठिकाणे कळवा


पावसाळा सुरू व्हायला आता काही आठवडे राहिले आहेत. पावसाळा म्हटला, की पुणेकरांना सर्वप्रथम आठवण येते ती, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांची! पुण्यातील गेला पावसाळा खड्ड्यांनीच गाजविला होता. त्यानंतर वर्षभर आपण रस्ते चांगले करण्याची आश्‍वासनं ऐकतो आहोत. प्रत्यक्षात त्यादृष्टीने काही झाले आहे का? पावसाळा सुरू होण्यापूर्वीच याची पाहणी झाली, तर त्याचा उपयोग होईल ना! आपल्या परिसरातील पावसाळ्यात हमखास पाणी साठून राहण्याच्या जागा कोणत्या? कुठले खड्डे हमखास अपघात घडवतात? पावसामुळे वाहतूक विस्कळित होणारा भाग कोणता? याची माहिती तुम्हीच आम्हाला कळवा. सोबत छायाचित्र असेल तर तेही पाठवून द्या. आपण सारे मिळून पावसाळ्यातला त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करू...

टिळक रोड आणि दुपारचे दीड...!

टिळक रोडवर कधीही गेलं तरी गर्दी असतेच. ही क्‍लिपिंग्ज दुपारी दीड ते दोनच्या सुमाराला घेतली आहेत. रणरणत्या उन्हात, बाहेर पडावंसं वाटत नसतानाही एवढी गर्दी? नक्की कारण काय असेल या गर्दीचं? स्वारगेटकडून येणारी वाहने, सिग्नल व्यवस्था, बेशिस्त वाहन चालक, की पोलिस? अर्थात ही उत्तरं आपली आपणच शोधायला हवीत. त्रास आपल्यालाच होतो ना?

सिंहगड रस्ता : उत्तरे नगरसेवकांची...

सिंहगड रस्ता : उत्तरे नगरसेवकांची...

काही दिवसांपूर्वी सिंहगड रस्त्याबाबत नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी आणि आपलेच आपल्याला काही प्रश्‍न विचारण्यात आले होते. या विषयावर ब्लॉगवर प्रतिक्रिया आल्या. तसेच आम्ही काही नगरसेवकांनाही बोलते केले. या मंथनातून हे प्रश्‍न सोडवायला दिशा मिळते का, ते बघू या !

प्रसन्न घनःशाम जगताप (हिंगणे-आनंदनगर)भाजीमंडई ः प्रत्येक वॉर्डनिहाय डीपी फायनल झाल्यानंतर भाजी मंडईसाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी काही जागांचे पर्याय उपलब्ध आहेत त्यानुसार प्रयत्न करणार. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणाचा विळखा कमी होण्यास मदत होईल. त्यासाठी सतत पाठपुरावा चालू आहे.
पार्किंग ः यासंबंधी हवेली पोलिस अधिकारी, परिवहन अधिकारी तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केलेली आहे. पार्किंग सुरळीत होण्यासाठी सर्वप्रथम अतिक्रमण पूर्णपणे हटविण्यासाठी प्रयत्न करणार, त्यानंतरच रस्त्याच्या दोन्ही बाजूस सम व विषम तारखेस वाहन पार्किंगचे फलक बसविणार आहे.
पदपथ ः सध्या रस्त्यावरील ड्रेनेजची झाकणे टाकण्याचे काम सुरू केले आहे, तसेच रस्त्याचे कामही 2 ते 3 महिन्यात पूर्ण करणार आहेत. त्यामुळे फुटपाथचे काम पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येईल.
रिक्षा थांबे ः यासंबंधी रिक्षा संघटनांशी मे ते जून महिन्यात चर्चा करून सहा आसनी व तीन आसनी रिक्षा थांबे ठराविक ठिकाणीच करण्यासाठी प्रयत्न करणार.
त्याचबरोबर सिंहगड रस्ता हा बीआरटी करण्यासाठी शिफारस केलेला आहे. त्यासाठी सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता कॅनॉलच्या बाजूने (नांदेड फाटा ते स्वारगेट) बीआरटीसाठी प्रयत्न करणार आहे.

आक्रुर कुदळे (धायरी)भाजीमंडई ः सिंहगड रस्ता नो हॉकर्स झोन करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी महिन्यातून एक-दोन वेळा अतिक्रमण कारवाई करणार. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सकाळी 6 ते 8 या वेळेत भाजीविक्रीसाठी रस्ता उपलब्ध करून देणार.
वाहनपार्किंग ः वाहनपार्किंग यासंबंधी हवेली पोलिस अधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी यासंबंधीची चर्चा सुरू केलेली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस सम व विषम तारखेस वाहन पार्किंगची सोय करणार.
लाईट व्हेईकलसाठी नांदेड फाटा ते स्वारगेट बंद पाईप लाईनजवळून जाणारा रस्ता तयार करणार आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील ताण कमी होण्यास निश्‍चितच मदत होणार आहे.
बीआरटीसाठी सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता कॅनॉलजवळून (नांदेड फाटा ते स्वारगेट) रस्ता बीआरटी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
रिक्षा थांबे ः रिक्षा थांब्यांच्या बाबतीत रिक्षा संघटनांशी या महिन्यात चर्चा करून सहा आसनी व तीन आसनी रिक्षा थांबे विशिष्ट थांबे करण्यासाठी प्रयत्न करणार.

पौड रस्त्याचे पुढे काय...?

पौड रस्त्यावर सुरू असलेल्या खणण्याच्या कामाला आयुक्तांनी स्थगिती दिली. आता या कामाचं होणार काय? रस्ता नीट कधी होणार, या प्रश्‍नांना उत्तरं देताहेत सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर...
गोंधळात गोंधळ
या कामाची निविदा 21.60 टक्‍क्‍यांनी जास्त आहे.
जे. पी. एंटरप्रायजेसची ही निविदा 13 मार्च रोजी स्थायी समितीने मंजूर केली.
काम सुरू करण्याचे आदेश प्रत्यक्षात 28 मार्चला देण्यात आले.
कंत्राटदाराने हे काम महिन्याभरानंतर म्हणजे गेल्या ता. 2 रोजी सुरू केले.
संबंधित कंत्राटदाराने हे काम स्वत: न करता कामदार कन्स्ट्रक्‍शन्स या कंपनीला दिले.
या कंपनीची महापालिकेत कंत्राटदार म्हणून अद्याप नोंद नाही.


हसतील त्याचे दात दिसतील...(?)


उद्या, म्हणजे रविवारी जागतिक हास्य दिन आहे. खरंतर हसण्यासाठी वर्षातील सर्व दिवस ठेवायला हवेत. आजच्या ताणतणावांच्या जमान्यात हसणे हे मोठे औषध आहे. हसण्याचे मानसिक आणि शारीरिक पातळीवर खूप चांगले परिणाम होतात. अनेक शास्त्रज्ञांनी यावर विविध प्रकारे संशोधन करून अनेक निष्कर्ष काढले आहेत. हसण्याचे मानवी शरीरावर तीन प्रकारे परिणाम दिसून येतात.
जैवभौतिकी, जैवरासायनिक, जैवऊर्जित.
जैवभौतिकी परिणाम : हसण्यामुळे शरीरातील लसिका द्रव्य शरीरात वेगाने फिरू लागते. त्यामुळे शरीरातील अनावश्‍यक पेशी, घटक बाहेर टाकण्यास मदत होते. हसण्यामुळे शरीरातील प्रत्येक अवयवाला पेशीला प्राणवायूचा भरपूर पुरवठा होतो. मानवी शरीरात असणारे अनेक विषाणू, जिवाणू, अतिरिक्त प्राणवायूमध्ये जिवंत राहू शकत नाही.
हसण्याच्या प्रक्रियेमुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते.
जैवऊर्जित परिणाम ः
पोट, चेहरा, खांदे, मान इत्यादीच्या स्नायूंना उत्तम व्यायाम मिळतो.
पोट धरून हसल्यामुळे फुफ्फुसाखालील डायफ्राम नावाच्या स्नायूची मोठ्या प्रमाणात हालचाल होते. त्यामुळे श्‍वसनप्रक्रिया सुधारते.
जैवरासायनिक परिणाम ः"इंटरफेरॉन', इंटरल्युकीन या रसायनांचे प्रमाण शरीरात वाढते. त्यामुळे जिवाणू, विषाणूंपासून मानवाचे संरक्षण होते. शरीरातील झीज भरून येण्याची प्रक्रिया वेगाने घडते.
इविनेफ्रिन, कॉर्टिसोल, डोपॅक इत्यादी घातक रसायनांचे शरीरातील प्रमाण कमी होते.
ताणतणाव व त्या अनुषंगाने शरीरावरील दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते.
रक्तवाहिन्यांचे आकुंचन होण्याचे प्रमाण कमी होते.
इतर फायदे ः हसण्याच्या प्रक्रियेमुळे काही काळ का असेना, व्यक्तीला दुःखाचा विसर पडतो, वेदना कमी जाणवायला लागतात, रक्तदाब नॉर्मल राहतो. खळखळून हसण्यामुळे पोटातील स्नायूंना व्यायाम मिळतो. हा व्यायाम "इंटर्नल जॉगिंग' या प्रकारात येतो. ज्या रुग्णांना हृदयविकाराच्या झटक्‍यानंतर धावणं शक्‍य नसतं, त्यांच्यासाठी खळखळून अथवा पोट धरून हसणं, हा रामबाण उपाय आहे.
शरीरावरचे आणि मनावरचे घाव भरून येण्यासाठी हसणं, हा उत्तम उपाय आहे.
हसण्यामुळे कल्पकता वाढते. नवजीवन आणि नवचैतन्य मिळतं. नात्यांमध्ये आपुलकी आणि प्रेम वाढतं.

पारा चढतोय... काळजी घ्या...


पुण्याचे तापमान 40 पर्यंत पोचले आहे. लहान-मोठ्या सगळ्यांनाच उन्हाचा त्रास होतो आहे. थोडी काळजी घेतली, तर हा उन्हाळा काही प्रमाणात तरी सुसह्य होईल.

दररोज कमीतकमी 8 ते 12 ग्लास पाणी घ्यायला हवे.
सकाळी नाश्‍ता करण्यापूर्वी एक ग्लास लिंबूपाणी घ्यावे. यामुळे शरीराला नवा तजेला मिळतोच, पण त्याचबरोबर पित्ताशय व मूत्रपिंड यांची कार्यक्षमताही वाढते. त्यानंतरचा नाश्‍ताही हलकाच असावा.
कलिंगड, द्राक्षे, काकडी, अननस, केळी, लिंबू यांचे ज्यूस पिणे चांगले. हे रस गोड, थंड आणि पचायलाही हलके असतात.
रोजच्या आहारात दही, ताक, दूध यांचा समावेश असावा.
आंबट, तिखट आणि कोरडे अन्नपदार्थ खाऊ नका. त्याऐवजी लस्सी, दूध यांचा समावेश जेवणात करावा. काहीसे तूपही चालेल.
मांस खाणे शक्‍यतो टाळावे. त्याऐवजी सोयाबीनचा वापर करावा. मासे अधिक उत्तम. यामध्ये अ, ब, ड व ई जीवनसत्त्व असते व शिजतातही लवकर.
कॉफी व मद्य यांचेही प्रमाण कमी करावे.
एसीमधून एकदम उन्हात जाऊ नका. थोडावेळ एसी नसलेल्या सावलीच्या ठिकाणी थांबा, म्हणजे शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानाशी जुळवून घेऊ शकेल.

उन्हाळी कपडे

काळपट रंगांचे कपडे म्हणजे काळे, भडक रंगांचे कपडे वापरू नका. त्यामुळे शरीराचे तापमान वाढेल. दुसरी गोष्ट, या ऋतूमध्ये टेरिकॉट किंवा सिल्कचे कपडे वापरू नका. साधारण फिकट रंगाचे कॉटनचे कपडे (ज्यात पांढऱ्या रंगाचा जास्त वापर असेल) वापरणे अधिक चांगले.

मानसिक संतुलन
या काळात मानसिक संतुलन स्थिर ठेवणे तितकेच गरजेचे असते. उकाड्यामुळे चिडचिड वाढलेली असते. त्यासाठी एक दिवसाआड तरी एखाद्या वनराईत किंवा पाणी असलेल्या ठिकाणी फिरायला जा. त्यामुळे तुम्हाला चांगला "ब्रेक' मिळेल.
शक्‍य तेवढे शांत झोपा. मनाला आनंद देईल असा दिवस घालवा. या दिवसात थंड पाण्याने अंघोळ केल्यास अधिक चांगले.
शिवाय फावल्या वेळात थंडगार पदार्थाची चव चाखण्यास काहीच हरकत नाही. फक्त आइस्क्रीम खाताना जरा जपून. खाताना हा प्रकार थंड लागत असला तरी बर्फ उष्ण आहे, हे विसरू नका.

लक्षात असू द्या

अति खाण्यावर नियंत्रण ठेवा
जेवणात विविधता ठेवा
जडान्नापेक्षा पातळ आहार आणि पाणी अधिक चांगले
जेवणात किंवा सरबत-रसात जास्त मीठ वापरू नका
खाता खाताच पेय घेऊ नका.

पौड रस्त्याने जाणार आहात?

पौड रस्त्यावरील उड्डाणपूल ते बॅंक ऑफ बडौदा या दरम्यानच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण कालपासून सुरू झाले आहे. काल संध्याकाळी घरी परतणाऱ्यांना अचानक झालेल्या या बदलामुळे चौकातील कोंडीला सामोरे जावे लागले. बदल अचानक घडल्यामुळे गोंधळही भरपूर होता. पौड रस्त्याकडून डेक्कनकडे जातानाही मोरे विद्यालयाच्या पुढे गेल्यानंतर उजवीकडे वळावे लागते. वळण्यासाठीची जागा लहान ठेवल्यामुळे तेथेही तोंडाशी कोंडी होत आहे. त्यामुळे आता या मार्गाने जाताना आणि येताना थोडा रस्ता बदलायला हवा, तोही 2 सप्टेंबरपर्यंत. (लावलेल्या पाटीनुसार, पुढे किती वाढेल हे सांगता येत नाही...)अर्थात मृत्युंजयेश्‍वर मंदिराजवळचे काम अद्यापही न संपल्यामुळे कोणती कोंडी त्यातल्या त्यात बरी एवढाच विचार करायला वाव आहे...

झळा ज्या लागल्या जीवा...


पारा वर चढतोय, अंगाची काहिली होती आहे... काल थोडा पाऊस पडून गेला असला तरी तापमान खाली यायचं नाव घेत नाहीये... मार्केटिंगवाल्यांना दुपारी बाहेर पडावंच लागतं. मग त्यांनी काय करावं? प्रत्येकाच्या काही ना काही युक्‍त्या असतात, जागा असतात. कोणी प्रभात रस्त्यावरील झाडांच्या सावलीतून जातं, तर कोणी पाताळेश्‍वर लेण्यांचा आश्रय घेतं, काहीजण चक्क एसी असलेल्या सायबर कॅफेचा तर काहीजण छानशा हॉटेलचा आश्रय घेतात.
तुम्ही काय करता? तुमच्याही काही युक्‍त्या असतील ना? चला तर मग "शेअर' करूया... त्यानं इतरांचाही उन्हाळा थोडासा सुसह्य होईल.

पुण्याबाहेरच्या पुणेकरांसाठी....
तुम्ही पुण्यात असताना काय करत होता, हे कळवाल आम्हा सर्वांना? आम्हाला तुमच्या आठवणी वाचायला नक्की आवडतील...

ता.क. : हा विषय प्रेमी जीवांना लागू नाही... त्यांना उन्हाळा काय आणि हिवाळा काय...

वाहतूक सुरळीत? अंहं, थबकत, थांबत...

प्रचंड गर्दीच्या चौकांमध्ये नळस्टॉपच्या चौकाचा क्रमांक बराच वरचा लागेल. सकाळी 10 ते 11 आणि संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत तर इथे "धुमशान' असते. सकाळी पौड रस्ता, कोथरूडहून येणाऱ्या वाहनांचा लोंढा या चौकातून सुरळीतपणे पुढे गेला तर काही प्रश्‍न नसतो. पण सध्या या चौकात हाच प्रश्‍न झाला आहे. ही वाहने "पाडळे पॅलेस'कडे वळताना एके ठिकाणी अडतात आणि थबकत, थांबत हळूहळू पुढे सरकतात. येथे असणारा एक आडवा खड्डा त्यांची वाट अडवतो. काम करण्यासाठी रस्ता खणायचा आणि नीट न बुजवता सोडायचा या परंपरेला धरूनच तो खड्डा तयार झाला आहे...