व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

स्वयंशिस्त म्हणजे काय रे भाऊ?

आपण पुणेकर गाड्या चालवताना एखाद्या योध्याच्या आवेशात असतो. कुठल्याही सिग्नलला किंवा चौकात पाहा "पळा पळा कोण पुढे पळे तो' अशी शर्यत सुरू असते. काही सेकंद जागेवर थांबलो तर इतर वाहनांना जागा मिळेल, रस्ता मोकळा होईल, असे आपल्याला बहुधा कधीच वाटत नाही. आपण काही सेकंद न थांबल्यामुळे इतरांना आणि कधीकधी स्वत:लाही बराच वेळ थांबावं लागतं. पेट्रोल आणि वेळेचा अपव्यय होतोच, पण त्यापेक्षा महत्त्वाचा असलेला आपला जीव धोक्‍यात येण्याची शक्‍यता असते...

"एक चिडियॉं, अनेक चिडियॉं...'

फक्त दूरदर्शन असण्याच्या काळात "फिल्म डिव्हिजन'ने विविध विषयांना धरून सुंदर प्रयोग केले होते. आपल्या कायम आठवणीत राहिलेली आणि त्या जमान्यात घेऊन जाणारी ही एन.सी.आर.टी.ने तयार केलेली "फिल्म' "अनेकतामें एकता'! "एक चिडियॉं, अनेक चिडियॉं...' आठवलं ना...!

कुमठेकर रस्त्याचे काम संपणार तरी कधी?

साधारणपणे गेल्या तीन वर्षांपासून कुमठेकर रस्त्याचे काम संपण्याची वाट येथील नागरिक पाहात आहेत. आधी रस्त्याचे काम, मग बाजूच्या गटारांचे काम, अशी वेगवेगळी कामे संपतच नाहीत. ही कामे, त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी, पादचाऱ्यांचे हाल संपणार कधी याची वाट नागरिक पाहात आहेत. पावसाळ्याच्या आत काम संपेल, असे आश्वासन तीन पावसाळे मिळत आले आहे. आता या पावसाळ्यात काय होणार, असा प्रश्न पुढे उभा आहे.


घराजवळ वाहन सुरक्षित?


विचार करा!आपले वाहन घराजवळ किंवा सोसायटीत अत्यंत सुरक्षित असते, असा सर्वसामान्य नागरिकांत असलेला समज खोटा ठरला आहे. उलट तेथेच ती वाहने सर्वाधिक असुरक्षित आहेत; त्यामुळे आपल्या वाहनाची आपल्यालाच अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गेल्या तीन महिन्यांतील गुन्ह्यांचा अभ्यास करून निष्कर्ष सादर केला आहे. त्यानुसार यंदाच्या जानेवारी ते मार्चदरम्यान ६१४ वाहने चोरीला गेली. त्यातील अवघी १०८ वाहने हस्तगत झाली. शहरात गेल्या तीन महिन्यांत ३८६ दुचाकी वाहने, बारा तीनचाकी व तेरा चारचाकी, अशी एकूण ४११ वाहने सापडली आहेत. मात्र, त्यांचे मालक अद्याप सापडलेले नाहीत. इंजिनच्या चासी क्रमांकाद्वारे प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्या मालकांची ओळख पटविण्याचे सध्या काम सुरू आहे.

प्रश्न माझे, मीच मला विचारलेले, उत्तर तुम्ही द्याल?

अहो नगरसेवकदादा, अहो कारभारी, अहो बंधुभगिनींनो, द्या ना माझ्या प्रश्नांची उत्तरे... सिंहगड रस्त्यावर राह्यला आलो, त्याचे एक कारण माझ्या खिशाला परवडेल अशा दरात मला येथे जागा मिळाली. घरापर्यंत पोचण्याचा माझा मार्ग खडतर, प्रचंड वेळखाऊ, मनस्ताप देणारा होता; पण कृपा झाली. एके दिवशी सर्व अतिक्रमणे हटली आणि दांडेकर पूल ते सणस शाळेपर्यंत रस्ता रुंदीकरणास सुरवात झाली. थोडे कुरकुरत का होइना रुंदीकरण झाले आणि माणिकबागेपर्यंत कॉंक्रीटचा रस्ताही झाला. प्रश्न सुटला असे वाटेपर्यंत नवे समस्यांचे डोंगर उभे राहिले. विचार केला तर असे वाटते, की या प्रश्नांना उत्तरे आहेत का? सगळ्याच प्रश्नांना उत्तरे प्रशासनाकडे मागायची, का काही उत्तरे आपणही द्यायचीत?


नाटक नाटक

नाटक हा पुणेकरांच्या खरोखरचा जिव्हाळ्याचा विषय. अगदी लहानपणापासूनच पुणेकर नाट्यरंगी रंगू लागतो. पुण्याबाहेर किंवा अगदी देशाबाहेर गेलेले पुणेकर नाटक सोडत नाहीत. जमेल तिथे आणि जमेल तसं एखादं तरी नाटक बसवण्याचा प्रयत्न करतातच. सध्या पुण्यात "बालनाट्यां'ची धूम आहे. परीक्षा संपल्या आहेत ना!
भरत नाट्य मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर, यशवंतराव चव्हाण रंगमंदिर सध्या लहानांच्या आवाजानं गजबजून गेले आहेत. या रस्त्यांवरून चक्कर टाकली तरी फुललेला रस्ता दिसतो. प्रा. जयंत तारे, प्रकाश पारखी, दिलीप नाईक, राहुल खोकले, राजा राणा, आदित्य नाझरे, विनोद खेडकर, धनश्री देशमुख, सचीन जेस्ते आदी मंडळी छोट्या दोस्तांना बरोबर घेऊन धमाल बालनाट्यं सादर करत आहेत.
जरा लहानपण आठवून बघा.... सुट्टीत तुम्हीही बालनाट्यात रंगला असाल.... काहींनी तर कामंही केली असतील... मग तुमच्या आठवणी आमच्याशीही "शेअर'करा!


निसर्ग सज्ज झाला आहे....

पुण्यात पहाटे फिरायला जाणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. आतातर सुट्ट्याही लागल्यात. आपल्या नव्या मित्रांच्या स्वागताला निसर्गही सज्ज झाला आहे. सारी सृष्टी वेगवेगळे रंग लेऊन उभी आहे. कुठे गुलमोहोर तर कुठे चाफा.... सगळीकडे रंगांची उधळण! आपल्या बंगल्यांच्या आवारात, इमारतीजवळ लावलेली झाडे जणू माणसांचे आभार मानण्यासाठी फुलून आली आहेत.ही दृष्ये आहेत पौड रस्त्यावरील परमहंसनगर मधील गणेशकृपा सोसायटी व त्यामागील टेकडीची. टेकडी हिरवी करण्याचा वसा घेतलेली, त्यासाठी रोज फिरायला येताना पाणी घेऊन येणारी आणि ती या झाडांना घालणारी मंडळीही दिसत आहे. विविध रंगांनी नटलेला निसर्ग, त्याची जपणूक करणारी माणसं पाहिली, की टेकडीपेक्षा उंच झालेल्या इमारतींमुळे काळजी वाटणं कमी होतं...


कर्वे रस्ता सहा पदरी झाला तर?




कर्वे रस्ता सहा पदरी झाला तर? पुण्यातील अनिल कवडीकर यांनी हे स्वप्नं पाहिलं आणि ते ऍनिमेशनच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलं आहे. पादचारी मार्ग, सायकलसाठी वेगळा ट्रॅक, त्याच्याशेजारी बस आणि जड वाहनांसाठी जागा, नंतर इतर वाहनांसाठीचा रस्ता, असा रस्ता असावा, असं त्यांना वाटतं. त्यांनी वाहनतळाची जागा रस्त्याच्या मध्ये ठेवली आहे. खरंच कर्वे रस्ता असा असावा का, होऊ शकेल का?तुम्हाला काय वाटतं? का तुम्हाला काही वेगळं सुचतंय?

Pune Univercity Circle Traffic Problem, and the answer




मंगळवारी पुणे विद्यापीठ, परिहार चौक, ब्रेमेन चौक येथे वाहतुकीची मोठ्ठी कोंडी झाली. अगदी अल्प कालावधीत मिळालेली सूचना आणि नियोजनातील गोंधळ, हे या मागचे कारण होते. इतर वेळी १० मिनिटांचा असणारा प्रवास मंगळवारी सकाळी चक्क एक तासाचा झाला. मंगळवारच्या गोंधळानंतर, आता काय, असे वाटत असतानाच बुधवारी चित्र पालटले. वाहतूक सुरळीत झाली. याला कारण होते पोलिसांनी गर्दीची ठिकाणे शोधून त्यावर केलेले उपाय आणि वाहन चालकांची सजगता! पोलिस आणि वाहन चालकांनी अशी सजगता नेहमीच दाखवली तर पुण्यातील वाहतूक नक्कीच सुरळीत होईल.विद्यापीठ-परिहार आणि ब्रेमेन चौकातील वाहतूक टिपली आहे वैभवी भिडे आणि अभिजित थिटे यांनी.



पुणेकरांचं व्यासपीठ

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!